ताज्या घडामोडी

सर्वसामान्यांप्रती समर्पित:डॉ.गौतम दुथडे – लेखक:डॉ.अजय गव्हाणे

डॉ.गौतम दुथडे एक जातीनिरपेक्ष व्यक्तिमत्व. डॉ.गौतम दूथडे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व. डॉ.गौतम दुथडे सर्वसामान्यांप्रती समर्पित व्यक्तिमत्व.
कोणताही बहुजन, सर्वसामान्य व्यक्ती संकटात असेल तर त्याची सावली म्हणून त्याच्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणारे डॉ.गौतम दुथडे हे भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून यशवंत महाविद्यालयात कार्यरत आहेत.
एक विरळ समाजसेवक. कधीही त्यांना भेटण्यासाठी संपर्क केला तर एक तर इतरांच्या मदतीसाठी पोलीस स्टेशन किंवा सरकारी हॉस्पिटल किंवा रजिस्ट्री ऑफिसमध्ये (आंतरजातीय विवाह संपन्न करण्यासाठी साक्षीदार म्हणून) सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदोदित धडपडत असतात.
सर्व प्रकारची वेतनश्रेणी, आर्थिक लाभ, रिफ्रेशर, ओरिएंटेशन कोर्स व पीएच.डी. याकरिता डॉ. गौतम दुथडे यांनी कधीही वेळ दिला नाही. गरिबांच्या, वंचितांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, हीच त्यांची वेतनश्रेणी, बहुजनांच्या चेहऱ्यावर हसू उमलने, हीच त्यांची पीएच.डी.
बहुजन एम्प्लॉईज संघटनेच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गेली अनेक वर्ष विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जिल्हा परिषद परिसरात डॉ.गौतम दुथडे यांनी सन्मानाने साजरी केली. रक्तदान, अन्नदान व वैचारिक मेजवानींनी सज्ज असणाऱ्या भीमजयंती कार्यक्रमात तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आदी प्रशासकीय अधिकारी आणि माननीय लोकप्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती दर्शविली आहे.
डॉ.गौतम दुथडे सामाजिक न्याय, परिवर्तन व समतेप्रती कटिबद्ध आहेत. या तत्त्वासाठी ते कसल्याही प्रकारची तडजोड कोणत्याही परिस्थितीत करू इच्छित नाहीत. यशवंत महाविद्यालय परिसरात स्टाफरूममधील चर्चा असो, व्याख्यान किंवा इतर महाविद्यालयीन उपक्रम असो किंवा चहापान असो; चर्चेचा ओघ व दिशा ते सामाजिक समतेकडे वळवित असत.
स्त्री-पुरुष समता प्रस्थापित व्हावी, यासाठी त्यांचा अट्टाहास कायम असतो. महिलांना सदोदीत संधी प्राप्त व्हावी. मुख्य म्हणजे महिलांना प्रतिष्ठापूर्ण व सन्मानजनक वागणूक मिळावी, याचा आग्रह ते कधीही सोडत नाहीत. इतर सर्वांचा आदर व प्रतिष्ठेला आपसूकच त्यामुळे ते निसर्गतः प्राप्त होतात. कोणतेही मोठे पद व खुर्ची नसतानाही इतरांनी मनाच्या सिंहासनावर ज्यांना आढळ स्थान दिले आहे ते मनाने व हाडाचे शिक्षक म्हणजे डॉ.गौतम दुथडे होय.
समाजसेवेच्या अविरत, अविश्रांत कार्यामध्ये मग्न असल्यामुळे आता आत्ता शैक्षणिक सेवेच्या उत्तरार्धात त्यांना पीएच.डी. प्राप्त झाली आहे. स्वतःचा खिसा व बँक अकाउंट सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व वेदना दूर करण्यासाठी सदैव खुले असणारे दिलदार प्राध्यापक म्हणजे डॉ.गौतम दुथडे.
प्रसिद्धीपासून, पुरस्कारापासून व बोलघेवडेपणापासून कोसो दूर असणारे डॉ.गौतम दुथडे नेहमी म्हणत असत की, सर्वच महापुरुषांना आपण सर्वांनी कृतीशील अभिवादन करायला हवे.
महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. गौतम दुथडे यांच्या समवेत विविध जयंती मंडळात व गावांमध्ये एकत्र व्याख्यान देण्याचा योग आला. शब्दापेक्षा व भाषणांपेक्षा कृतीला, व्यवहाराला, आचरणाला महत्त्व देणारे डॉ. गौतम दुथडे, हे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व.
त्यांची महत्त्वपूर्ण विशेषतः म्हणजे डॉ.गौतम दुथडे एक जातीनिरपेक्ष व्यक्तिमत्व. फक्त आपापल्या जातीच्याच कोशात राहणारे डॉ.गौतम दुथडे नाहीत. आपापल्या जातीच्या माणसासोबत फिरणारे व फक्त जातीच्या माणसांनाच हृदयाचे दार मोकळे आणि इतरांसाठी बंद या गटातले डॉ.गौतम दुथडे नाहीत.
जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी ‘भारतीय संविधान’ आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ तसेच इतरही अनेक क्रांतिकारी ग्रंथ देणारे, अहोरात्र प्रयत्न करणारे, रक्ताचे पाणी करणारे, भारत या राष्ट्राची निर्मिती करणारे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे डॉ.गौतम दुथडे हे आधुनिकता, विज्ञानवाद, परिवर्तनवाद व निसर्गवादाचे पाईक आहेत. कोणत्याही चुकीच्या गैर बाबीला कडाडून विरोध म्हणजे विरोध ते करत आहेत. तथागत बुद्धाच्या, सत्याला सत्य व असत्याला असत्य म्हणून जाणा, या तत्त्वांची ज्यांच्या मनात व नसानसात रुजूवणुक झाली आहे, ते प्राध्यापक म्हणजे डॉ.गौतम दुथडे.
वेळ पडल्यास तडजोड करावी, ऍडजेस्ट करावे, याची त्यांना मनस्वी चीड.
सदाबहार फाउंडेशन, नांदेडच्या वतीने ‘कार्यकर्ता गौरव पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गौतम सहादू दुथडे यांना दि. ३ मार्च २०२५ रोजी नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज, नांदेड येथे माजी खासदार डॉ.व्यंकटेश काबदे यांच्या हस्ते प्राप्त होत आहे.
डॉ.गौतम दुथडे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व वैचारिक सुगंधाने परिपूर्ण असलेल्या, नीती व तत्वाचा सुवास सगळीकडे पसरविणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात व परिसरात सदैव अखंडित सामाजिक सेवा घडतच राहील, ती घडत राहावी, या शुभेच्छा!
*-डॉ.अजय गव्हाणे,*
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.