ताज्या घडामोडी

अक्षय साहित्याचा अर्क :’कागदावरची माणसं ‘

सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अर्थातच ए आय चे युग आहे. मुलांना अँड्रॉइड मोबाईल, कम्प्युटर, टॅब ,इंटरनेट इत्यादी आधुनिक वस्तूंचे अक्षरशः वेड लागलेल आहे.एखाद्या मुलाला जेवायला मिळालं नाही तरी चालेल परंतु सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वात अत्यावश्यक अशी जर कुठली गोष्ट झाली असेल तर ती म्हणजे त्याच्या हातातील स्मार्ट फोन.या व्यसनामुळे मुलांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ खुंटत चालली आहे. मुलं अतिशय एकाकी, स्वार्थी, अबोल, अनियंत्रित व हिंस्र वृत्तीची होत चाललेली आहेत. मुलांमधील बालपण,प्रेमळपणा खोडकरपणा, बोलघेवडेपणा, हसरेपणा लुप्त होत चाललेला आहे.एखाद्या विषयावर चर्चा करणे त्यावर आपले मत मांडणे इत्यादी सर्व गोष्टी आता कालबाह्य होत आहेत व त्या स्वप्नवत वाटणार आहेत. खरं तर आपल्या या संस्कृतीचा कणा म्हणजे वाचन .दुर्दैवाने आजच्या या काळात वाचन संस्कृती जवळ जवळ बंदच होत चालली आहे. अगदी दहा पंधरा वर्षांपूर्वी अगदी गजबजुन असणारी ग्रंथालय,वाचनालय आता अतिशय ओसाड,शांत दिसत आहेत. पुस्तकांवरची धूळ वरचेवर जशीच्या तशी साचत चाललेली आहे. माणसाच्या मानसिक, बौद्धिक,वैचारिक उन्नती करिता वाचन अतिशय महत्त्वाचे आहे. याही काळात आपला वाचन छंद जोपासणारी, त्यासाठी धडपडणारी काही माणसे अनेक क्षेत्रात आहेत.

स्त्रीरोग तज्ञ असलेल्या डॉ वृषाली माधव किन्हाळकर यांचं नावं यामध्ये आवर्जून घ्याव लागेल. डॉ वृषाली किन्हाळकर ह्या एक सिद्धहस्त कवयत्री,लेखिका आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी आपलं एक स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेल आहे. आतापर्यंत डॉ वृषाली किन्हाळकर यांचे वेदन, तारी व मुक्तमाय हे कविता संग्रह प्रसिद्ध असून सहजरंग, संवेद्य हे ललित लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत.

नुकतंच त्यांचं ‘कागदावरची माणसं’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन झालेले आहे. स्त्रीमन, स्त्रीच्या मनातील भावना, स्त्रीयांच्या मनातील येणारे असंख्य विचार त्याचबरोबर स्त्री वेदना याविषयी स्वतः एक स्त्रीरोग तज्ञ असलेल्या डॉ वृषाली किन्हाळकर या व्यक्त होताना ऐकतच राहावे असे वाटते.आईच्या संस्कारामुळे अगदी लहानपणापासून लागलेली पुस्तक वाचनाची आवड व त्यातील झपाटून टाकणारी पात्र त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता व त्याविषयी स्वतः व्यक्त होण्याची इच्छा यातूनच निर्माण झालेली आस्वादात्मक समीक्षा म्हणजेच हा लेखसंग्रह. लेखक मरत असतो पण लेखकाने आजरामर केलेली पात्र मात्र जिवंत असतात ती कायमची. बालपणापासून आजपर्यंत वाचलेल्या अनेक कथा कादंबऱ्यातील पात्र लेखिका डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या मनामध्ये,त्यांच्या डोळ्यासमोर अक्षरशः जिवंत असतात या पात्रांमुळेच.

‘अनुबंध प्रकाशनाने’ प्रकाशित केलेली 256 पानांची ही अद्भुत कलाकृती असुन मागील जवळपास 100 वर्षातील 38 ग्रंथांचे सूक्ष्म वाचन व समीक्षन लेखिकेने केले असून त्यातील घुसळून काढलेले ‘नवनीत ‘ आपल्यासारख्या अनेक वाचकांसाठी आयते दिलेले आहे .

डॉ वृषाली किन्हाळकर या स्वतः एक स्त्री असून प्रेमळ स्वभावाच्या असल्याकारणाने बहुदा त्यांनी 38 पैकी जवळपास 21 लेख हे प्रेम हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले आहेत. त्याचबरोबर आई वरील चार लेख व तेरा लेख हे मानवी मनाच्या भावना, मानवीय नातेसंबंध, स्त्री-पुरुष मुक्तसंबंध, आत्मकथन, वऱ्हाडी जीवनपद्धती, विणकर समाजातील यातना, चर्मकार समाजातील भावना, भटजींचे आयुष्य,गुन्हेगारी जगत, अपंगत्व,स्त्री-पुरुष समानता, अशा वेगवेगळया विषयावर लिहिलेले आहेत. योगायोगाने या लेख संग्रहातील बहुतेक कादंबरी ह्या मौज प्रकाशन व मॅजेस्टिक प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या आहेत.

डॉ वृषाली किन्हाळकर यांनी या लेखांमध्ये पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक वि स खांडेकर त्याचबरोबर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक रणजीत देसाई, गो नी दांडेकर,विश्राम बेडेकर,व्यंकटेश माडगूळकर, प्रादेशिक कादंबरीकार श्री ना पेंडसे आदींसारख्या मराठी साहित्य विश्वातील अतिशय दिग्गज लेखकांच्या कादंबरीवर अतिशय समर्पक अशी चिकित्सक मांडणी केलेली दिसते.

गीतरामायणाचे रचियते,मराठी विश्वातील एक महान कवी, लेखक, कथाकार ,संगीतकार तथा अभिनेता असलेले ग दि माडगूळकर,मानदेशाचे जीवनमान व्यक्त करणारे व्यंकटेश माडगूळकर, साने गुरुजी,मालती बेडेकर,राजकीय कादंबरीकार अरुण साधू , ह मो मराठे,अशा बगे,अनिल बर्वे,रंगनाथ पठारे,जयंत दळवी, राजनखान, वसंत फेणे पासून ते आताच्या अंबिका सरकार, सानिया आदी मान्यवर लेखक,कवी यांच्या लेखनाचा अभ्यास केलेला आहे. यातील बरेच कवी,लेखक हे माझ्यासारख्या वाचकासाठी जुने असूनही अगदीच नवे आहेत. आपण वाचलेली परंतु सध्या सहजतेने उपलब्ध नसलेली अतिशय अजरामर असे साहित्य समाजापुढे, नवीन पिढी पुढे देण्याचा हा लेखिकेचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्याच्या व्यस्त जगात माणूस एवढी पूर्ण पुस्तके वाचणे शक्य नसून त्या बऱ्याच लोकांना माहिती नसलेल्या कादंबरीचा सार, तिचा थोडक्यात परिचय या निमित्ताने वाचकाला मिळाला आहे.

मालतीबाई बेडेकर यांच्या ‘हिंदोळ्यावर ‘या कादंबरी पासून डॉ वृषाली किन्हाळकर यांनी आपली समीक्षा सुरू केलेली आहे. जवळपास शंभर वर्षांपूर्वी स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीच्या भावना, स्त्रीची विचार करण्याची पद्धत,स्त्रीचे अस्तित्व याविषयी हि कादंबरी आहे. या कादंबरीत स्त्रीचे मन, तिचे स्वप्न, तिच्या आकांक्षा यांना समाजापुढे धीटाइने ठेवले आहे हे सुखावह आहे . थोडक्यात स्त्री ही तिच्यावरील संकटांमुळे दुःखामुळे बदलून जाते. तिच्यामध्ये प्रगल्भतेची, विवेकाची उणीव जाणवते असे लेखिका सांगते.

‘श्यामची आई ‘हे पुस्तक म्हणजे आयुष्य कळून घेण्यासाठीची एक अमृत गाथा आहे, देवळाच्या गाभार्‍यात बसून मूर्तीच्या भव्य दिव्य दर्शनाने मन जसे निर्मल, नीरज होते तसा अनुभव हे पुस्तक देते. मराठी साहित्यातील ही एक शुद्ध, प्रशांत अशी अजरामर ‘आई ‘आहे असे लेखिका सांगते. यातून लेखिकेचे श्यामची आई या पुस्तकावरील प्रेम व नवीन पिढीतील मुलांनी हे पुस्तक वाचावे याविषयीची तळमळ स्पष्ट दिसते.

श्री ना पेंडसे च्या ‘गारंबीचा बापू’ या पुस्तकातील बापू चे चित्र व्यक्त करताना आपल्या प्रिय विठोबाने ज्या विहिरीवर आयुष्यभर पाणी भरलं त्याची आठवण म्हणून तो गावकऱ्यांसाठी नवी मोठी विहीर बांधतो हा प्रसंग म्हणजे लेखिकेच्या मते दिवार चित्रपटातील स्वाभिमानी विजयची भूमिका करणाऱ्या अमिताभची आठवण करून देतो व तरुणांना एक नवी प्रेरणा ऊर्जा देतो.

व्यंकटेश माडगूळकरांची अजरामर ‘बनगरवाडी ‘ही कादंबरी म्हणजे एका प्रामाणिक शिक्षकाने तळमळीने धनगरांच्या मुलांसाठी शिक्षणाची गोडी लावण्याचा अनोखा प्रवास वर्णन आहे असे लेखिका म्हणते.त्याचबरोबर ‘उभे धागे आडवे धागे ‘या कादंबरीत गदिमांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील विणकर समाजाचे कष्टमय जीवन, त्यांची भाषा,एका धडपड्या मुलाची गोष्ट व त्याची कणखर आणि निर्भीड आई याचे केलेले चित्रण वाचून लेखिका बैचेन होते. समाजातील जातीयता,अंधश्रद्धा नष्ट होऊन माणसाने माणसाशी माणसासारखे प्रेमाने वागावे असे लेखिकेला वाटते.

श्री ना पेंडसे यांची ‘रथचक्र ‘ही कादंबरी लेखिकेने वीस वेळा वाचली आहे.एका आईने मुलाच्या शिक्षणाकरता केलेली अथक धडपड. नियती आणि नायिका यातील अटल युद्ध आणि नाइकेच्या पदरात पडणारी हार . अशी ही अभागी, अनाम नायिका लेखिकेला वेदना देऊन जाते व प्रचंड अस्वस्थ करून टाकते.

रणांगण, फकिरा,बळी, माचीवरला बुधा, बालकांड, पूर्णा मायची लेकर, मुंबई दिनांक, लव्हाळी, अजून उजडायच आहे, काळोखाच अंग, थँक्यू मिस्टर ग्लँड, देव चालला,टोकदार सावलीचे वर्तमान, स्थलांतर या कादंबऱ्यात प्रेम, स्त्री पुरुष संबंध इत्यादी गोष्टी नाहीत, तरीसुद्धा एकही पान न टाळता, एक क्षणभर न थांबता आपण ती कादंबरी वाचत जातो ही या लेखकांची असामान्य प्रतिभा आहे हे लेखिका आवर्जून सांगते.

शांता गोखलेंची ‘रिटा व्हेलनकर ‘ ही कादंबरी म्हणजे स्व ओळखीचा प्रवास आहे. या कादंबरीवर लेखिकेने लिहिलेले लेखन वाचून मलाही ही कादंबरी वाचण्याची तीव्र इच्छा झालेली आहे. मला हा लेख अतिशय जास्त आवडलेला आहे.विवाहबाह्य नात्याला असणारा चोरटेपणाचा चिंतन शाप व त्यातील गुंतागुंत अतिशय प्रभावी पद्धतीने मांडलेली ही कादंबरी म्हणजे चिरंजीवी आहे असे लेखिका सांगते.प्रभावी संवाद चित्रमय शैली आणि अल्प अक्षरातून महानगरीय जीवनातील समग्राचा वेध यामुळे सर्वांगाने ही कादंबरी अतिशय वाचन प्रिय आहे असे लेखिका डॉ वृषाली किन्हाळकर सांगतात.

डॉ वृषाली किन्हाळकर यांचा जिवंत माणसाला प्रेम देणारा, दिशा देणारा एक मार्गदर्शक असा लेखसंग्रह म्हणजे ‘कागदावरची माणसं ‘. खरंतर या पुस्तकातील प्रत्येक लेख अतिशय वाचनप्रिय असून सध्याच्या समाज मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारा असा आहे. अतिशय सुंदर अशा या लेख संग्रहामध्ये काही ठिकाणी काही प्रसंग किंवा वाक्याची पुनरावृत्ती झाल्याचे जाणवले. वैयक्तिक मला हा लेखसंग्रह म्हणजे 38 पुस्तके वाचल्याचे समाधान व आनंद देऊन गेला. एकदा हातात घेतल्यावर शेवटपर्यंत न सोडावे वाटणारे,मनामध्ये वाचनाची आवड निर्माण करणारे असे हे पुस्तकातील लेखन आहे, ते सर्वांनी अवश्य वाचावे.

डॉ वृषाली किन्हाळकर स्वतः डॉक्टर असून फक्त पुस्तकं प्रेमामुळे त्यांनी एवढी ही अनमोल पुस्तके वाचून त्यावरील चिंतन त्यांनी लेख स्वरूपात या काळातील समाजासाठी लिहिलेली आहेत. यापुढेही डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या हातून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळ्या लेखांचे अतिशय अजरामर अशा दुर्लक्षित कादंबरीवर लेखन होऊन त्याचा लाभ आमच्यासारख्या साहित्याचा विद्यार्थी नसलेल्यांना मिळो हिच त्या जगत विधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना.🙏🙏

*डॉ विजय भोसले* , यशवंत महाविद्यालय,नांदेड.
भ्रमणध्वनी:9403067352.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.