जग समजून घेण्याचे कुतूहल आत्मसात करा!’* – आसाराम लोमटे

नांदेड :(दि.३१ जानेवारी २०२५)
विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्त गुणांना ओळखून घेण्याबरोबरच जग समजून घेण्याचे कुतूहल आत्मसात केले पाहिजे, असा महत्त्वाचा सल्ला विद्यार्थ्यांना देतांनाच मराठी भाषेमध्ये असलेल्या रोजगारांच्या अनेकविध संधीची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त,चिंतनशील लेखक श्री.आसाराम लोमटे यांनी दिली.
मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय (मुंबई) आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ‘मराठी भाषा: रोजगार संधी’ या विषयावर यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी भूषविले होते तर कार्यक्रमासाठी भाषा संचालनालय अधीक्षक विभागीय कार्यालय (छत्रपती संभाजीनगर) येथील लक्ष्मण जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आसाराम लोमटे म्हणाले की ‘मराठी भाषेमध्ये रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. चित्रपटासाठी गीत लेखन, कथालेखन करण्याबरोबरच जाहिरात लेखन, माध्यमांसाठी लेखन यासारख्या असंख्य संधी मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या नव्या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उभे करावे, असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पुढील काळात या भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी रोजगारांच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या देखील मराठी भाषेच्या माध्यमातून हजारो संधी उपलब्ध आहेत. भाषा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच मराठी भाषेची चांगली जाण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चार भित्तीपत्रकांचे पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय जगताप यांनी प्रास्ताविकात ‘मराठी भाषेमध्ये अन्य अनेक भाषेतील शब्दांचा भरणा झाला असून त्याला मराठी भाषेतील पर्यायी शब्द देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विश्वाधार देशमुख यांनी तर आभार डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचन कट्ट्याच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.शुभम राठोड, कृष्णा वाघमारे, गणेश विनकरे, कृष्णा गव्हाणे, सुमित ठाकरे, आयुष्य सोनकांबळे, गोदावरी कानशुक्ले, आदिती भालेराव, पूजा तोटेवाड, शिवानी कार्लेकर, शिवानी क्षिरसागर गायत्री पत्रे, आशा धाबे या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.