मुख्यमंत्र्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन बळी – डॉ. विठ्ठल पावडे
नांदेड प्रतिनिधी –
मागील दोन वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पासदगाव येथील आसना नदीच्या पुलाचे भूमिपूजन केले होते. परंतु अद्याप काम न झाल्याने मागच्या वर्षी पावसाळ्यात एक आणि आज असे दोन बळी निष्काळजीणामुळे गेले आहेत. लवकरच या निषेधार्थ जनआंदोलन उभे करू असा इशारा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी दिला आहे.
२०२२ मध्ये या पुलाचे उद्घाटन केले गेले, मागील वर्षी एक बळी गेल्यानंतर युवक काँग्रेसच्या वतीने वर्षपूर्तीचे आठवण करून देणारे ‘ नारळ फोडो आंदोलन ‘ केले होते. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला दिवसभर मुख्यमंत्र्यांचा दोरा संपेपर्यंत अटक केली होती. तद्नंतर तरी त्यांना ईश्वर सद्बुद्धी देईल आणि पुलाचे काम लवकर होईल असे वाटले होते. परंतु जुमलेबाज सरकारने दोन वर्ष लोटले तरी अद्याप काम सुरू केले नाही. परिणामी याही वर्षी रस्ता ओलांडत असताना एक बळी नाहक गेला.
जर वेळीच या पुलाचे काम झाले असते तर दोन जीव वाचले असते. आणखी किती जीव जावे लागतील म्हणजे मुख्यमंत्र्यांना जाग येईल. अशी टीका डॉ. विठ्ठल पावडे यांनी केली आहे.