ताज्या घडामोडी

शिक्षण म्हणजे मानसिक शक्तींचा विकास.:डॉ. शिरीष लिमये

*
नांदेड:( दि.१९ ऑगस्ट २०२४)
शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचे प्रगटीकरण असून शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वृद्धिंगत झाली पाहिजे. ज्ञान हे माणसात अंतरनिहीत असते. या ज्ञानाच्या आधारे मानसिक शक्तींचा परिपूर्ण विकास घडवून आणणे म्हणजेच शिक्षण होय; असे प्रतिपादन सिम्बॉयसिस महाविद्यालय, पुणे येथील अकाउंटन्सी विभागातील माजी विभागप्रमुख डॉ.शिरीष लिमये यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी आणि यशवंत महाविद्यालयाच्या वतीने संस्थेतील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि महाविद्यालयीन प्राचार्य आणि प्राध्यापकांसाठी ‘माणूस घडविणारे शिक्षण’ या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख बीजभाषक म्हणून ते दि. १७ ऑगस्ट रोजी कुसुम सभागृहात बोलत होते.
त्यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे शिक्षणाचा उद्देश, ध्येय, तत्वे अत्यंत प्रभावी रीतीने उपस्थितांसमोर सादर केली तसेच कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेली ‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ ही कविता गीतकार गुलजार यांनी हिंदीमध्ये सादर केल्याची क्लिप सभागृहाला दर्शविली.
याप्रसंगी विचारमंचावर महाराष्ट्राचे माजी शिक्षण राज्यमंत्री व संस्थेचे सचिव मा.श्री.डी. पी.सावंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
स्वागत संभाषणात श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, समाजाचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकाची कर्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण असून समर्पित आणि बांधिलकीच्या भावनेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविणे, हा समाज उन्नतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असतो. शिक्षकांनी कौशल्यपूर्ण होणे, हे केवळ शिकविण्याच्या पद्धतीमध्ये दर्जा व गुणवत्तेमध्ये वृद्धीबरोबरच त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर सुद्धा सर्वदूर परिणाम होत असतो, असे भाष्य केले.
अध्यक्षीय समारोपात मा.श्री.डी. पी.सावंत यांनी, शिक्षणाचा खरा उद्देश हा केवळ ज्ञानाशी संबंधित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित आहे तसेच विद्यार्थ्यांची नैतिक मूल्य आणि विवेकशीलतेशी देखील संबंधित आहे, असे मनोगत व्यक्त केले.
प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांच्या प्रश्नांना डॉ.शिरीष लिमये यांनी समर्पक उत्तरे दिली.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले तसेच आभार देखील मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक आणि मुख्य आयोजक माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी सहकार्य केले आणि या कार्यशाळेस अधिक व्यापक आणि तंत्रज्ञानात्मक स्वरूप दिले.
संघटक सचिव आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पदमारानी राव, सहसमन्वयक डॉ.साहेब शिंदे, सहाय्यक समन्वयक प्रा.माधव दुधाटे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेस श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक आणि शिक्षकांचा सहभाग होता.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.