सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाने रुजविले 3500 सीड बॉल्स
औचित्य 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे

नांदेड : प्रतिनिधी
350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या हेतूने विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण व साडेतीन हजार सीड बॉल्स रुजविण्याचा उपक्रम सारथी संस्थेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संशोधन केंद्रात Ph.D करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आला हा उपक्रम छत्रपती संभाजी नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथील गोगाबाबा टेकडीवर 16 जून रोजी सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी राबवून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेचे संचालक व व्यवस्थापक आय.ए.एस अशोक काकडे सर यांनी लाभार्थी संशोधकांच्या सहभागातून शिवकालीन गडकोट किल्ले, टेकड्या, आदि हिरवेगार करून पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्याच्या पूर्णत्वासाठी सारथी संशोधक विद्यार्थी अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने छत्रपती संभाजी नगर येथील गोगाबाबा टेकडी येथे सदर उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला असून त्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोगा बाबा टेकडी परिसरात, या उपक्रमांतर्गत स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून त्यांना मातीच्या व कोकोपीटच्या मिश्रणामध्ये लाडूच्या आकाराचे बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण अगोदरच देण्यात आले होते अशा मिश्रणामध्ये झाडांच्या बिया सुरक्षित राहतील व पावसाच्या मदतीने त्यांना तिथे रुजण्यास मदत होईल. यासंबंधी स्थानिक झाडे जसे की शिरस, आंबा, जांभूळ, करंजी, बेल, बाभूळ, बोर, हिरडा, मोहा, चिंच, सीताफळ शेवगा कडूलिंब शिकाकाई आवळा इत्यादी बहुगुणी वृक्षांचे तब्बल साडेतीन हजार सीट बॉल्स रुजविण्यात आले. विशेषतः सिडबॉल टाकल्यानंतर पावसाची हजेरी ही महत्त्वाची ठरली असून त्या सर्व सीट बॉल चे झाडात रूपांतर होण्यास त्यांना मदत होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गडकिल्ले, टेकड्या व इतरही ठिकाणी या उपक्रमाअंतर्गत सीड बॉल ची लागवड केली गेली. छत्रपती संभाजीनगर येथील सीड बॉल अभियानाचे गटप्रमुख सारथी संशोधक विद्यार्थी श्री श्रीकांत सरवदे यांनी गोगा बाबा टेकडी वरती येणाऱ्या सर्व गिर्यारोहकांना सीड बॉल बनविण्याची प्रक्रिया व महत्त्व समजावून सांगितले. श्री. श्रीकांत सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण 10 संशोधक विद्यार्थ्यांच्या टीम ने गोगा बाबा टेकडीवर 3500 सीड बॉल्स रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी संशोधक विद्यार्थी अंकुश अंभोरे, अनुरथ शिंदे, अविनाश कवारखे, गोविंद मोरे, कैलास टेमकर, महेश आवटे, विशाल मगर, योगेश बिडवे, सुवर्णा बुऱ्हाण या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक येथे महाराजांना माणवंदना देऊन व शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगून, सीड बॉल उपक्रमाची सांगता करण्यात आली.