ताज्या घडामोडी

स्वारातीम विद्यापीठाचा ‘ज्ञानतीर्थ -२०२४ ‘युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर रोजी होणार

नांदेड :प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे भूषविणार असून, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील विनोदी अभिनेत्री मा. प्राजक्ता हनमघर उपस्थित राहणार आहेत. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे असणार आहेत.
या महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभ दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा. होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे व प्रसिद्ध सीने अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि झी टीव्ही वरील सा रे ग म प विजेते मा. अनिकेत सराफ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
लोककला, नृत्य, नाट्य, वाङ्मय व ललित कला या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत एकूण ३० कला प्रकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार असून, त्यामध्ये संगीत विभागातील शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, समूह गायन भारतीय, समूह गायन पाश्चात्य, कव्वाली इत्यादी, नृत्य विभागांतर्गत लोक नृत्य/ आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य तर नाट्य विभाग अंतर्गत एकांकिका ,उपरोधिक/ विडंबन अभिनय, मूक अभिनय, नक्कल व वांग्मय विभागांतर्गत वादविवाद, वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धा तर ललित कला विभागांतर्गत चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, मृदमुर्तीकला, व्यंग्यचित्रकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, मेहंदी, इन्स्टॉलेशन इत्यादी कलाप्रकार तर महाराष्ट्राच्या लोककला या विभागांतर्गत पोवाडा, लावणी, लोकवाद्यवृंद व जलसा इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. सदर युवक महोत्सवात ज्या विविध मंचावरून कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे त्या मंचांना १) कै. मारोतराव हंबर्डे मुख्यमंच २) जयवंत दळवी नाट्यमंच ३) प्रभा अत्रे स्वरमंच ४) कविवर्य ना. धों. महानोर विचार मंच आणि ५) सुधा मदन कलामंच अशी नावे देण्यात आलेली आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील संलग्नित ९९ महाविद्यालयातील जवळपास १५१० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.
‘ज्ञानतीर्थ’ या युवक महोत्सवासाठी शोभा यात्रेकरिता ‘मराठवाड्याची कला व संस्कृती’ हा विषय देण्यात आलेला असून, विष्णुपुरी येथील मारुती मंदिराजवळून ही शोभायात्रा दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वा. निघणार आहे. वादविवाद स्पर्धेसाठी ‘महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी वर्तमान कायदे पुरेसे सक्षम आहेत/नाहीत’ हा विषय दिला आहे. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी १) भारतीय संविधान: जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, २) जाणावया वेदना, जागवू संवेदना, ३) असाध्य ते साध्य करिता सायास, ४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० :संधी व आव्हाने हे विषय देण्यात आलेले आहेत.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा त्या दृष्टीने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयांनी या महोत्सवातील शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर यांनी केले आहे.
सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या युवक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ आणि आयोजक महाविद्यालयाकडून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून युवक महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.