ताज्या घडामोडी

भारतातील संगणक क्रांतीचे जनक: डॉ विजय भटकर

भारतातील पहिल्या परम महासंगणकाचे निर्माते, संगणक तज्ञ, जागतिक कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ तथा जागतिक आयटी क्षेत्रातील एक मान्यता प्राप्त वैज्ञानिक, संगणक क्षेत्रातील ज्ञानेश्वर, महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पदव्या मिळवणारे डॉ विजय भटकर सर यांचा 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवसआहे.या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.

1980 च्या दशकात जगामध्ये महासंगणक निर्मिती केलेले फक्त दोनच देश होते व ते म्हणजे अमेरिका व जपान. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे त्यावेळी अमेरिकेला गेले होते .राजीव गांधीनी त्यावेळेस अमेरिकेकडे परमसंगणकाची मागणी केली होती. परंतु अमेरिकेने ते अमान्य केले. त्यानंतर पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी भारतीय वैज्ञानिकांना एक भावनिक आवाहन केले व त्यावेळेस त्यांचे हे आवाहन डॉ विजय पांडुरंग भटकर यांनी स्वीकारले.

11 ऑक्टोबर 1946 या दिवशी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मुरंबा या छोट्याशा गावी डॉ विजय पांडुरंग भटकर यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे जगातील पहिला संगणक सुद्धा 1946 मध्येच निर्माण झाला हा एक दैवी योगायोगच होय. डॉ भटकर सरांच्या आई-वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत काम केलेल आहे.भटकर सरांनी विश्वेश्वरय्या इंजीनियरिंग कॉलेज नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांची आय आय टी मुंबई व महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा येथे एम टेक करण्यासाठी निवड झाली. परंतु भटकर सरांनी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, वडोदरा येथून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. डॉ विजय भटकर सरांनी त्यांची पीएचडी आयआयटी दिल्ली येथून पूर्ण केली. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा संगणक पाहिला होता.

यानंतर भटकर सरांना जगभरातील अनेक देशांकडून नोकरीची संधी मिळाली होती. पण, भटकर सरांनी भारतातच राहून देशसेवेचे कार्य करण्याची ठरवले होते. डॉ विजय भटकर सर हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र व तल्लख बुद्धिमत्तेचे होते. भटकर सरांना वाचनाची प्रचंड आवड होती. आपल्या शिक्षणाच्या काळात त्यांनी पन्नास हजारावर पुस्तके वाचली होती. डॉ भटकर सरांनी तरुणपणीच स्वतः सहा महिने एकांतवासात राहून घरीच एक रेडिओ बनविला होता व त्यावर विविध स्टेशन्स ट्यून केले होते व त्यांनी त्यावर अनेक गाणी ऐकली. डॉ विजय भटकर सर अतिशय आनंदाने सांगतात की तेव्हाचा ‘स्वतःच्या पहिल्या नवनिर्मितीचा आनंद हा परम संगणकाच्या निर्मिती पेक्षा जास्त होता’.

विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘इलेक्ट्रॉनिक्स कमिशन’वर भटकर सरांनी दहा वर्षे काम केले. इंदिरा गांधींनी ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ या महत्त्वाच्या समितीवर त्यांची नियुक्ती केली. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. डॉ विजय भटकर सर या संस्थेचे 1980 ते 1987 या काळात संचालक होते. डॉ भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा प्रकल्प उभारले गेले. 1982 च्या एशियाड गेम्सच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे अशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची इच्छा होती. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही जबाबदारी डॉ विजय भटकर यांच्यावर सोपवली. यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकर सरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा केली व हे उद्दिष्ट पूर्ण केले. भारतात पहिल्यांदाच रंगीत टीव्हीचं तंत्रज्ञान निर्माण झाले. अशाप्रकारे भारतातील रंगीत टेलिव्हिजनचे जनक म्हणून सुद्धा डॉ विजय भटकर सर यांना म्हणता येईल.

पंतप्रधान राजीव गांधी यांच्या इच्छेनुसार पहिला परम महासंगणक बनवताना पुणे विद्यापीठांमध्ये ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग’सी-डॅक ची निर्मिती करण्यात आली. विशेष म्हणजे या वेळेपर्यंत डॉ विजय भटकर सर किंवा त्यांच्या कोणत्याही सहकार्याने परम संगणक पाहिलेला नव्हता.परम महासंगणक निर्मितीच्या वेळी निर्माण झालेले आव्हान व त्यावर केलेले कार्य याविषयी सांगताना डॉ विजय भटकर सर अतिशय भावनिक होतात. परम संगणकाच्या निर्मितीचे हे कार्य करताना अनेक आव्हाने समोर होती, अनेक अडचणी होत्या असे भटकर सर सांगतात. याच काळात राजीव गांधींची हत्या झाली होती. राजीव गांधीच्या सहीचे ओरिजनल डॉक्युमेंट मिळत नव्हते. त्यामुळे सहा महिने कामच सुरू करता आले नाही. या वेळेला सर्वप्रथम भटकर सरांना ईश्वरीय अनुभूती आल्याचे ते सांगतात व योगायोगाने पंतप्रधान कार्यालयात ते महत्त्वाचे डॉक्युमेंट मिळाले. सहा महिने त्यांच्या सहकाऱ्यांना सॅलरी नव्हती. त्रिवेंद्रम कलकत्ता चेन्नई, बेंगलोर आदी ठिकानहून शंभरच्या वर त्यांचें मित्र डॉक्टर भटकर सरांच्या बोलवण्यावरून आलेले होते. ते स्वतःच्या पैशाने पुण्याला आलेले होते. याच काळात अमेरिकेने भारतावर निर्बंध घातले होते. साध्या चिप्स,सॉफ्टवेअर सुद्धा मिळत नव्हते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सुरुवातीपासून सुरुवात करण्यात आली व त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.खऱ्या अर्थाने आम्ही आत्मनिर्भर झालो होतो आणि अशाप्रकारे 1991 मध्ये परम संगणक 2008 ची निर्मिती झाली व भारत देश हा जगातील परम संगणक बनवणारा तिसरा देश झाला.

परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतातच आहे हि आपल्या देशासाठी व आपणा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर 1998 मध्ये डॉ विजय भटकर सरांनी परम- 10000 या अधिक चांगल्या क्षमतेच्या परम संगणकाची निर्मिती केली.परम – 10000 ने त्या काळात संगणक क्षेत्रात क्रांती केली.परम – 10000 ची क्षमता दर सेकंदाला 1 लाख कोटी (1000,000,000,000) गणिती क्रिया करण्याची आहे.

येथेच भटकर सरांची गुरुवर्य किसन महाराज साखरे यांची भेट झाली व त्यानंतर डॉ भटकर सर अध्यात्म ज्ञानाकडे वळले.त्यांनी भगवद्गीता,ज्ञानेश्वरी ,गाथा, वेद शास्त्र आदींचा अभ्यास केला व किसन महाराज साखरे यांचे मार्गदर्शन घेतले.
‘अध्यात्म आणि विज्ञान’ या विषयावर बोलताना भटकर सर म्हणतात, मानवाच्या जीवनासाठी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. अध्यात्म हे मनुष्याच्या आंतरिक तसेच मानसिक समाधानासाठी अत्यावश्यक आहे तर दुसरीकडे विज्ञान हे मानवाच्या बाह्य विकासासाठी,उन्नतीसाठी अतिशय गरजेचे आहे.2004 मध्ये नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना डॉ विजय भटकर सर म्हणाले होते की, मानवाच्या मुक्तीसाठी धर्म व संस्कृतीचे शिक्षण महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर देण्यात यावे. त्यांचे हेच विचार आता नव्याने रुजू झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणात त्याची प्रचिती आलेली आहे असे दिसून येते.आपणास ज्ञाननिष्ठ संस्कृती पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान हा यासाठीचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे असे भटकर सर सांगतात. विज्ञान हे नेहमी बदलणारे ज्ञान आहे. संगणकाची क्षमता दर 14 महिन्यांनी दुप्पट होते. म्हणजेच विज्ञानाचे ज्ञान हे शाश्वत नाही तर अध्यात्म व विज्ञानाचा संगम केल्यास शाश्वत ज्ञान मिळू शकते हा विचार डोक्यात घेऊन डॉ विजय भटकर सरांनी त्यांचे अध्यात्मिक गुरु ह भ प किसन महाराज साखरे आळंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी व गाथा इंटरनेटवर आणून अनमोल असा ज्ञानाचा ठेवा फक्त भारतीयांसाठीच नाही तर सर्व जगासाठी दृकश्राव्यरूपात निर्माण केला. ही एक अलौकिक अशी घटना होती. ‘तीर्थक्षेत्र ही केवळ स्नानाची क्षेत्रे न बनता ती ज्ञानाची क्षेत्र बनावीत’हा ध्यास डोक्यात ठेवून डॉ भटकर सरांनी साखरे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी आळंदी पासून सुरुवात केली.

माझ्या सुदैवाने मला अनेक वेळा डॉ विजय भटकर सरांची भेट झाली. डॉ विजय भटकर सर अनेक वेळा त्यांचे गुरु किसन महाराज साखरे व त्यांचे मित्र एमआयटी चे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड यांच्यासोबत पंढरीच्या वारीमध्ये आले होते. मला तेथे त्यांच्यासोबत भेटण्याचा बोलण्याचा योग आला. त्यानंतर 2015 मध्ये नाशिक येथील कुंभमेळ्यात महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंची एक परिषद डॉ विश्वनाथ कराड यांनी आयोजित केली होती. या परिषदेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ विजय भटकर सर व नांदेडचे प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ, नांदेड भूषण डॉ शिवाजी शिंदे सर हे होते. डॉ शिवाजी शिंदे सरांच्या माझ्यावरील असलेल्या प्रेमामुळे व सहकार्यामुळे मला डॉ विजय भटकर सरांसोबत सोबत निवांत बोलण्याचा योग आला. जागतिक स्तरावरील हा एवढा मोठा वैज्ञानिक जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असलेले स्मितहास्य, अतिशय साधेपणा, चेहऱ्यावरील निरागसता, बोलण्यातील नम्रता हे पाहून मी अक्षरशः गदगद झालो. डॉ विजय भटकर सर म्हणजे ‘अध्यात्मातून उत्तर शोधणारा एक विज्ञानवादी विचारवंत’.

डॉ विजय भटकर सरांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावे यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी 1998-99 मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश व्हावा अशी डॉ भटकर सरांची इच्छा आहे. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना त्यांनी संगणक शिक्षण दिले. आपल्या घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ‘ब्रॉडबँड प्रणाली’ विकसित केली. विजय भटकर सरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, (एम के सी एल), डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या. 1989 साली सी-डॅकने डॉक्टर भटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली‘जिस्ट ही संगणकीय आज्ञाप्रणाली (ग्रफिक्स अ‍ॅन्ड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी)तयार केली. या’जिस्ट’ने भारतीय उपखंडात संगणक क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती केली आहे .आजवर इंग्रजीची मक्तेदारी असलेल्या संगणकावर जिस्टमुळे कोणत्याही भारतीय भाषेचा उपयोग करणे सहज शक्य झाले. डॉ भटकर सरांनी आतापर्यंत बारा पुस्तके संपादित केली असून जवळपास 100 शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. ‘सुपर कॉम्प्यूटिंग’,’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटर कन्ट्रोल’,’व्हेरिएशनल थियरी’ हे त्यांच्या शोधनिबंधांचे विषय आहेत.कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया; भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी, दिल्ली; महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स, पुणे; इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स, दिल्ली या विविध संस्थांचे ते फेलो आहेत. ते न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्स, न्यूयॉर्कचे सदस्य आहेत. डॉ भटकर सर बराच काळ भारत देशाच्या प्रधानमंत्री यांचे वैज्ञानिक सल्लागार होते.ते सी एस आय आर च्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य सुद्धा होते.त्याचबरोबर 2016 मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एस ई आर बी चे अध्यक्ष होते. नालंदा विश्वविद्यालयाच्या कुलगुरूपदी सुद्धा त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे.डॉ विजय भटकर सर हे सध्या भारत सरकारच्या विज्ञान भारती चे अध्यक्ष आहेत.आपल्या भारत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यामध्ये डॉ विजय भटकर सर यांचा सिंहाचा वाटा आहे.

भारतीय सॅटॅलाइट संशोधनात डॉ भटकर सरांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारताचे मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम व डॉ विजय भटकर सर हे अतिशय चांगले मित्र होते. दहा हजार सॅटलाईट लॉन्च करण्याची इच्छा असल्याचे विजय भटकर सरांनी एका कार्यक्रमात सांगितलेल आहे.2011 आणि 2014मध्ये डॉ विजय भटकर यांना डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी आणि गुजरात टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे .नागपूर विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी प्रदान केली आहे.

डॉ विजय भटकर सरांना जेव्हा त्यांच्या या कार्याविषयी विचारलं जातं तेव्हा ते अतिशय नम्रतेने सांगतात की मला अजून काम करायचं आहे व आपल्या भारत देशाला जगामध्ये खऱ्या अर्थाने महासत्ता बनवायचे आहे. आज पर्यंत मी जे काही कार्य करू शकलो त्यासाठी मला अनेक महान वैज्ञानिक,महान संत, गुरु यांचे मार्गदर्शन लाभले व त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो.अजूनही मला बरच काही शिकायचं आहे ‘ज्ञानाच्या तीर्थयात्रेचा मी एक छोटा वाटसरू आहे’. मी कोण आहे हा प्रश्न मला सोडवायचा आहे .माझ्या जीवनाचे प्रयोजन काय याचाही मला अध्ययन करायचा आहे.अनुभवजन्य ज्ञान प्राप्त करणे हे माझे ध्येय आहे असे डॉ विजय भटकर सर नेहमीच सांगतात. असा हा महान वैज्ञानिक खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक अमूल्य असा हिरा आहे.

डॉ विजय भटकर सरांना देश-विदेशातील अनेक सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत.डॉ विजय भटकर सर हे खऱ्या अर्थाने भारतीय संगणक युगाचे जनक आहेत. डॉ विजय भटकर सरांना भारत देशातील सर्वोच्च असा नागरी सन्मान ‘भारतरत्न’मिळावा व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी त्यांच्या वाढदिवशी मी जगतविधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.

डॉ विजय भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो नं 9403067252

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.