ताज्या घडामोडी

मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि परिश्रम आवश्यक डॉ. दीपक वाघमारे

*
नांदेड(दि.१३ ऑक्टोबर २०२४)
महाविद्यालयीन विद्यार्थी व अभ्यासाचं नातं अतूट असतं. आपण नेहमी मोठी स्वप्न बघितली पाहिजेत; परंतु बघितलेली मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीची गरज असते; असे प्रतिपादन प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.दिलीप वाघमारे यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रशासन विभागाद्वारे आयोजित अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे होत्या.
प्रारंभी प्रास्ताविक लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मिरा फड यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी प्रतिपादन केले की, अभ्यास मंडळांतर्गत भित्तिपत्रक, पोस्टर प्रेसेंटेशन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास व विषयाशी संबंधित गेस्ट लेक्चर आयोजित केले जातात.
प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ. दीपक वाघमारे यांचे स्वागत उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन केले.
यावेळी अभ्यास मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ.दीपक वाघमारे पुढे बोलताना म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, हे एक शास्त्र आहे. सर्वात प्रथम ध्येय निश्चित करणे आणि नंतर ध्येयाला अनुसरून कृती करणे, हे त्याचा एक भाग आहे. प्रशासनात अधिकारी होण्यासाठी पात्रता, कार्यक्षमता व गुणवत्ता ही त्रिसूत्री महत्त्वाची असते, हीच आपल्या यशाची खरी गुरुकिल्ली असते. त्यावेळी त्यांनी प्रशासनामध्ये यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनकथा विद्यार्थ्यासमोर अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखवल्या. आपल्या उद्बोधनपर भाषणामध्ये डॉ. दीपक वाघमारे यांनी अनेक वेळा विद्यार्थ्यांना भावुक बनवून त्यांच्या मनातील परीक्षेच्या संदर्भातली भीती अगदी अलगद व सहजपणे दूर केली.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी, विद्यार्थ्यांनी पालकाच्या व गुरुजनाच्या परिश्रमाची जाणीव ठेवून आचरण केलं पाहिजे तसेच प्रशासकांनी आपल्या अंगी असलेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाच्या संविधानाला अपेक्षित असणारी व्यवस्था टिकवून प्रशासन संविधानवादी बनवले पाहिजे, असे परखड मत व्यक्त केले.
सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांद्वारे संपादित डीबीटी पोर्टलचा उद्देश, फायदे व कार्यप्रणाली संदर्भातील भित्तिपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी लेफ्टनंट डॉ.आर.पी.गावंडे यांनी उपस्थितांचे आणि प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांचे सदोदित आणि अखंडपणे शैक्षणिक मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.