ताज्या घडामोडी

नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ रामेश्वर बोले व डॉ मोहित सोलापूरकर यांनी त्याच्या *मन दर्पण हॉस्पिटल* च्या उद्घाटनानिमित्त त्याच बरोबर जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहच्या निमित्ताने ‘तोरा मन दर्पण.

*’

नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ रामेश्वर बोले व डॉ मोहित सोलापूरकर यांनी त्याच्या *मन दर्पण हॉस्पिटल* च्या उद्घाटनानिमित्त त्याच बरोबर जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहच्या निमित्ताने ‘तोरा मन दर्पण..’ नावाचा , मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या सुरेल गाण्यांच्या कार्यक्रम आयोजित केला होता.हा कार्यक्रम कुसुम सभागृहात पार पडला.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मृदुला दाढे जोशी यांनी यावेळी हिंदी चित्रपट गीतातील अतिशय अजरामर अशी गाणी गायली व सर्व श्रोत्यांचे कान तृप्त केले.

मराठवाड्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, अतिशय व्यासंगी लेखक, कवी, व्याख्याते तथा ‘मन सुद्ध माझं’ या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या नाटकाचे पटकथाकार व खऱ्या अर्थाने नांदेड भूषण डॉ नंदू मुलमुले यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.

डॉ नंदू मुलमुले म्हणजे नांदेडच्या सांस्कृतिक वैभवातील एक रत्न होय. एमडी मानसोपचार तज्ञ परंतु साहित्य क्षेत्रातील योगदान असे अद्वितीय की, भल्याभल्यांना त्यांचं लेखन ,त्यांचं वाचन त्यांचं चिंतन निशब्द करत. एक अभ्यासू लेखक,थोर तत्वज्ञ,विचारवंत व सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढे सार यश एवढं सार ज्ञान असूनही अतिशय जमिनीवर राहणारा साधा माणूस. एखादा कार्यक्रम हा त्या कार्यक्रमाच्या शीर्षकावरून किंवा तिथे येणारे कलाकार,गायक यांच्या वरून किंवा वक्त्यावरून ओळखला जातो.पण माझ्यासारखी शेकडो माणसं फक्त डॉ नंदू मुलमुले यांचं अभ्यासपूर्ण निवेदन/सूत्रसंचालन ऐकायला मिळणार म्हणजे एक वैचारिक मेजवानी मिळणार.कान तृप्त करून घेण्याची संधी मिळणार एवढं मनात घेऊन त्यांचा कार्यक्रम ऐकतात.

डॉ नंदू मुलमुले यांचे निवेदन हे अतिशय वेगळे व विशेष.चेहऱ्यावर कसलेही वेडे वाकडे भाव न आणता किंवा उगाचच सूत्रसंचालक म्हणून नको तिथे आवाजावर जोर देऊन जोरजोरात न किंचाळता अतिशय सहज, साध्या, सौम्य, सात्विक भाषेत सांगितलेलं त्यांचं गहन तत्वज्ञान,शब्दांची फेक व मध्येच श्रोत्यांना मिश्किल हास्यविनोद करुन मन तृप्त करणारे अनुभव हे एक वेगळीच अनुभूती ऊर्जा देऊन जातात.

मागील वीस पंचवीस वर्षापासून डॉ नंदू मुलमुले म्हणजे नांदेडच्या या अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं एक मुख्य आकर्षण .मागील दोन दशकांपासून दिवाळी पहाट हा गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बंदा घाट येथे होणारा कार्यक्रम.डॉ नंदू मुलमुले यांची संकल्पना व निवेदन ऐकण्यासाठी दरवर्षी जवळपास दोन ते तीन हजार लोक भल्या पहाटे साडेपाच वाजता अभ्यंग स्नान करून येतात. दरवर्षी वेगवेगळे दिग्गज गायक या कार्यक्रमासाठी हजेरी लावतात.डॉ मुलमुले यांचे बहारदार व संगीतातील अभ्यासपूर्ण निवेदन ऐकून हि मंडळी चकित होऊन आश्चर्य व्यक्त करतात.

एखाद्या निवेदकाला ऐकण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाला जाणे हा प्रकार बहुधा फक्त आमच्या नांदेडमध्येच घडत असावा व तोही फक्त डॉ नंदू मुलमुले यांच्या बाबतीतच. तरुण मुलं असो,लहान मुलं असो,मध्यमवयीन असो अथवा वृद्ध असो सर्वच डॉ नंदू मुलमुले यांच्या संचलनाचे दिवाने.

आजच्या कार्यक्रमाचे शीर्षकच ‘तोरा मन दर्पण…’ हे होते. मन हा विषय म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा गाभा होता. डॉ मुलमुले यांचे मन व बुद्धी या विषया वर गहन तत्वज्ञान व डॉ मृदुला दाढे जोशी मन हया विषयासी निगडित गाणं गायन मनाला भावून गेले. खर तर मन हा विषय अनंत आहे. मन ही संकल्पना अतिशय व्यापक, गहन व गुंतागुंतीची आहे. मानवी मन हि जगातील सर्वात अनकलनिय गोष्ट आहे. आनंद, दुःख ,राग, द्वेष, प्रेम,विचार, चिंतन, समन्वय,निर्णय हे मनाचे कार्य होत. आजच्या या मोबाईल व इंटरनेटच्या काळात माणसाचे मन अतिशय अस्थिर झालेले आहे.पूर्वीच्या तुलनेत सध्याचा माणूस हा फार कमी काळ एका विषयावर स्थिर राहु शकतो. हे सांगताना डॉ मूलमुले यांनी माणसाच्या मनाचे अवधान फक्त 8.5 सेकंद एका गोष्टीकडे रहाते हे सांगुन माशाच्या अवधानाशी केलेली तुलना खुपचं अद्भुत वाटली.तंत्रज्ञानाचा वेग आनिर्वाद,आनिर्बंध झालेला आहे . यामुळे माणसं एकाकी पडत आहेत.यासाठी माणूस विवेकी झाला पाहिजेत.विवेकच माणसास विचाराचे संतुलन शिकवतो.मन व बुद्धी हा विषय सर्वात महत्वाचा झाला असुन भावनिक मेंदु, वैचारिक मेंदु इत्यादी विषयांवर बोलताना डॉ मुलमुले सर्वांना एका वेगळ्या विश्वास घेवुन गेले.मनाचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो. मनाच्या स्थितीचा किंवा मनाच्या अस्थिरतेचा समाजातील अनेक गोष्टीवर सुद्धा खूप प्रभाव पडतो.मन जसा विचार करत तसा मनुष्य आपले कर्म सुद्धा करतो. मनावर जो विजय मिळवतो त्याचे मन त्याचा मित्र बनते आणि जो मनावर नियंत्रण मिळवू शकत नाही त्याचे मन त्याचा शत्रू बनते. एक शायर म्हणतो मन व वानर दोघेही सारखेच. दोघेही चंचल,दोघेही अस्थिर. फरक एवढाच वानर झोपेत तरी शांत शांत राहते.पण, मानवी मन झोपेतही उड्डाण घेत रहाते. मनातील उत्कट भावनांमध्ये प्रेम ही सर्वात उत्कट भावना आहे.

डॉ रोहित सोलापूरकर यांनी प्रास्ताविक करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनानंतर संत ज्ञानेश्वरांच्या ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला…’ या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मग मेलडी क्वीन आशा भोसले यांनी गायलेल्या, तोरा मन दर्पण कहलाए….या कार्यक्रमाचे टायटल सॉंग ने हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या अजरामर गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. या पहिल्याच गाण्याने गायिका डॉ मृदुला दाढे जोशी यांनी आपल्या अद्भुत स्वरांची छाप टाकली . आजच्या गायिका डॉ मृदुला दाढे जोशी या सुद्धा एक उत्कृष्ट लेखिका असल्यामुळे त्यांनी व डॉ मुलमुले यांनी मनावर अतिशय चांगले चिंतन मांडले. गमन चित्रपटातील शहरयार यांची ‘सीने मे जलन आखो मे तुफान सा …’ गझल गाऊन कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. त्यानंतर ‘कुछ दिल ने कहा कुछ भी नही ,’कोई चुपके से आके सपने सुलाखे मुझको’, ‘मेरी जान मुझे जान ना कहो मेरी जान, तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो, यु हसरतो के दान मोहब्बत मे रो लिये, अभी ना जाओ छोड कर के दिल, तुमसे मै जुदा नही मुझे है तुम जुदा नही, तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू मे, मेरी आखो से कोई नींद लिये जाता है इत्यादि गाणी त्यानी गायली.सध्याच्या काळतील चित्रपटामधून लोरी, भक्ती गीते व देशभक्ती गीत नसल्याची खंत डॉ मुलमुले यांनी व्यक्त केली व मग गायिकेने ‘धीरे से आजा रे अखियो मे निंदिया अब… हि लोरी गायली.यानंतर मग यमन रागातील मेडली गायली गेली.मन रे तु काहे ना धीर धरे…, जब दीप जले आना…इस मोड पे आते है कुछ… रहे ना रहे हम… इत्यादी गाणी त्यांनी गायली.तत्त्वज्ञान या विषयावर आधारित ‘ छोड दे सारी दुनिया किसी के लिये…’ हे गीत अतीशय सुंदर गायले.
यानंतर मग तरुण पिढीसाठी एखाद्या गाणं म्हणुन स्वर सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवडता पुरिया धनश्री रागावर आधारित ‘ ए मोह मोह के धागे..’ हे गाणे गायले.कार्यक्रमाचा शेवट लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘नाम न जाणे..तुम आशा तुम विश्र्वास हमारे, तुम धरती आकाश हमारे…’ या भजनाने झाला. या कार्यक्रमासाठी ऋषिराज साळवी यांचे तबला वादन व नरेंद्र चिपळूणकर यांची पेटीवर साथ लाभली. बैचेन झालेल्या अस्थिर मनाला हा कार्यक्रम काही काळाकरीता का होईना एका शांत, स्थिर, समाधानी दुनियेत घेवुन गेला. डॉ रामेश्वर बोले, डॉ मोहित सोलापूरकर व डॉ नंदू मुलमुले यांचे खुप खुप आभार….

डॉ विजय भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो नं 9403067252

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.