विद्यापीठातील तीनही गुणवत्ताधारक ‘यशवंत ‘च्या प्राणिशास्त्र विभागातील

नांदेड:(दि.२४ डिसेंबर २०२२)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील एम.एससी.द्वितीय वर्षातील प्रशांत दुरनाळे, दुर्गा तीरनगरवार आणि शिवानी सातपुते हे तीनही विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी:२०२२ परीक्षेत क्रमनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गुणवत्ता यादीत आलेले आहेत.
या सुयशाबद्दल प्राणिशास्त्र विभागाद्वारे आयोजित गुणवत्ताधारकांचा सत्कार आणि झूलॉजिकल प्रदर्शनामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी गुणवंतांचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.संजय ननवरे, डॉ.मंगल कदम, डॉ.धनराज भुरे, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.बी. बालाजीराव, डॉ.एच.एल.तमलुरकर, प्रा.अश्विनी जगताप, प्रा.नारायण गव्हाणे, प्रा.अस्मा जुही, प्रा.एकनाथ पावडे आदींची उपस्थिती होती.
सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, कठोर परिश्रमाला निश्चितच सुयशाचे फळ लागत असते. कोणत्याही यशाच्या पाठीमागे इच्छाशक्ती, योग्य नियोजन, तत्परता, सकारात्मक दृष्टी, गुणवत्तापूर्ण रीतीने कार्य करण्याचा स्वभाव दडलेला असतो. हीच वृत्ती कायम ठेवल्यास जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशाची प्राप्ती होत असते; असे मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ.संजय ननवरे यांनी, सर्व संतांनी प्राणिमात्रावर दया करा; हा संदेश दिलेला आहे. निसर्ग व विज्ञान यांनी देखील या पृथ्वीवर केवळ मनुष्य प्राणी राहत नसून इतरही प्राणी, पक्षी, वृक्ष, फुले आहेत आणि त्यांच्या अस्तित्वावरच मानवी अस्तित्व अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ.आर.एम.धोंडगे, लोहा, डॉ.जयवर्धन बलखंडे, भोकर, डॉ.डी.व्ही.जामकर, डॉ.अनिल माने, शंकरनगर, डॉ.ममता मालविया,नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज, नांदेड, संशोधक विद्यार्थिनी पूजा मनुरकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली देशमुख व विनय मोरे यांनी केले तर आभार दिपाली कानोले यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विष्णुपंत शेजुळ, परमेश्वर राठोड, सम्रत तिडके आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात ५० पोस्टर्स व मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच जवळपास १०० प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
———————————————–