https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

हक्काच्या लाभासाठी विश्वासाने पुढे या – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्हा परिषदेत जागतिक दिव्यांग दिन संपन्न

नांदेड (जिमाका) दि. 3 :- दिव्यांगावर मात करुन आत्मविश्वासाने उभे राहण्याची जिद्द सर्वच दिव्यांग व्यक्ती करतात. दिव्यांगांनाही विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला असून त्यांनाही समान संधी, संरक्षण आणि हक्क देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या हक्काच्या योजनांसाठी आत्मविश्वासाने पुढे यावे. आपल्याशी संपर्क साधण्यासाठी ‘शासन दिव्यांगाच्या दारी’ ही अभिनव योजना आपण हाती घेतल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जागतिक दिव्यांग दिन सोहळा व दिव्यांग मतदार नोंदणी उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात केले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, मनोविकार तज्ञ डॉ. दि.भा. जोशी, वाचा उपचार तज्ञ डॉ. क्षितीज निर्मल, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

आपल्या हक्कासमवेत मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येक पात्र व्यक्तीला बजावता यावे यासाठी व्यापक प्रमाणात मतदार नोंदणी अभियान सर्वत्र सुरु आहे. यासाठी ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांच्यापर्यत पोहोचून त्यांना मतदान ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत आहे. शासकीय योजना व इतर बाबींचे संनियंत्रण अधिक सुकर व्हावे, पारदर्शकता वाढावी यादृष्टीने दिव्यांग ॲपची निर्मिती केली आहे. यात ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दिव्यांग संघटनानी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रत्येकाजवळ युडीआयडी कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीसमवेत मानसिक आजार असलेल्या व्यक्तींनाही समान न्यायाची हमी, त्यांच्या अधिकाराचे संरक्षण हे कायद्याने बहाल केले आहे. एखाद्या दिव्यांग व्यक्तीवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योग्य ते सहाय्य करण्यासाठी तत्पर आहे. आपल्या अधिकारांना ओळखून शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांनी केले.

दिव्यांगत्वाची अनेक कारणे आहेत. बरीचशी कारणे ही विज्ञानानी स्पष्ट केली आहेत. एका गोत्रात (जवळच्या नातेसंबंधात) लग्न न करणे हा त्यावरचा पर्याय आहे. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. याही पलिकडे जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याऐवजी अंधश्रध्दा ना खतपाणी घालतात. यातून समाजाने अधिक जागरूक होवून निर्णय घेण्याचे आवाहन मनोविकार तज्ञ डॉ. दि.भा. जोशी यांनी केले. अलिकडच्या जीवन शैलीमुळे प्रत्येक गरोदर स्त्री बाळाला नैसर्गिकरित्या जन्म देईलच असे होत नाही. बरेचजण दवाखान्यात न जाता बाळांतपणासाठी इतर पर्याय निवडतात. यामुळे मेंदू अथवा इतर अवयवावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे डॉ. दि.भा. जोशी यांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींना कुणाच्या सहानुभुतीची गरज नसते. त्यांच्या हक्काचे त्यांच्यापर्यत पोहचावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सुध्दा कर्तव्य भावनेतून पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. कर्णदोषाची लक्षणे व त्यावर करण्यात येणारे उपचार याबाबत डॉ. निर्मल दिक्षित यांनी मार्गदर्शन केले.

इतर नागरिकाप्रमाणे दिव्यांग व्यक्तीना आपले अधिकार व हक्क आहेत. त्याच्या हक्क व अधिकारासाठी अनेक कायद्याची तरतूद आहे. दिव्यांगासाठी असलेल्या कायद्याबाबत मार्गदर्शन ॲड . मनिषा गायकवाड केले.

नांदेड जिल्ह्यात दिव्यांग ॲपवर 20 हजार दिव्यांगाची नोंदणी झाली असून राज्यात नांदेड मध्ये सर्वात जास्त नोंदणी झाली असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मान्यवरांच्या हस्ते नितीन रोडे, कृष्णा दिडशेरे, नागेंद्र बलीकोंडावार, विजय सोनकांबळे, काळबा सातपुते, चंद्रकांत इबितदार यांना स्मार्ट केन तर गौरी रासरकर यांना सीपी चेअरचे वितरण करण्यात आले. तर कैलास सोनवणे, सम्यक कदम, शे. निहाल अहेमद, मोहन इरपे, फैजल खान पठाण, शे. सोहल, ज्ञानेश्वर भरकडे, प्रतीक केकाटे, सय्यद जुबेर, शेख बुरहान, रुपेश मेकलवाड, पंकज सोनटक्के, संस्कार पतंगे या नवनिर्वाचित दिव्यांग मतदार नोंदणीकृत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निर्मल सर तर आभार मुरलीधर गोडबोले यांनी मानले.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704