‘
ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवात लावणीच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली
पारंपरिक गाण्यांच्या ठसक्यावर रसिकांची उत्स्फूर्त दाद
नांदेड: डॉ.प्रवीणकुमार सेलूकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लावणीच्या ठेक्यावर तरुणाई अक्षरशः थिरकली. महोत्सवातील साने गुरुजी मुख्य मंचावर सादर झालेल्या बैठकीच्या व नृत्याच्या पारंपरिक लावण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिट्ट्या आणि टाळ्यांच्या अखंड गजरात सादरकर्त्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लोकप्रिय लावण्या आणि त्यांतील पदलालित्य विशेष लक्षवेधी ठरले.
स्पर्धकांची रंगतदार नांदेड येथील एम.जी.एम. महाविद्यालयाच्या करुणा कंधारे हिने ‘गोऱ्या गोऱ्या पायात काटा रुतला’ ही लावणी अस्सल मराठमोळ्या ठेक्यात सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील अंजू कांबळे हिने ‘जाळीमंदी पिकली करवंद’ या लावणीतून आपल्या नृत्याची चुणूक दाखवली.
सिडको (नांदेड) येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या सुप्रिया मोरे हिने सादर केलेल्या शृंगारिक लावणीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
दयानंद महाविद्यालय, लातूर येथील तनुजा शिंदे हिने ‘पाडाला पिकलाय आंबा’ ही लावणी सादर करताच अवघा साने गुरुजी मंच ताल धरून डोलू लागला.
लोकप्रिय कडव्यांवर रंगली मैफल :
स्पर्धेत एकापेक्षा एक सरस लावण्यांची रेलचेल पाहायला मिळाली. ‘पाडाला पिकला आंबा, जरा थांबा, तोडून खावा जी…’, ‘मला एकांतात भेटणे, डोळे मिटणे आणि लुटणे गडे साजणा…’, ‘घालू का हो राया, शालू बनारसी…’, तसेच ‘नटले तुमच्यासाठी, सजले तुमच्यासाठी, माझ्या रूपानं बहरली रांगडी माती…’ या ओळींवर विद्यार्थिनींनी दाखवलेले नखरेल भाव आणि नजाकत रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.
त्याचप्रमाणे, ‘या रावजी, बसा भावजी, कशी चाललीये पाव्हणी?’ या संवादात्मक लावणीने सभागृहात हशा पिकवला, तर ‘हात नका लावू माझ्या साडीला, साडी सुटून जाईल गं राया…’ आणि लोककलेचा वारसा सांगणाऱ्या ‘कलावंत मी जन्मा आले, रसिकांच्या दरबारात रुजू झाले…’ या लावणीने प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, संस्थेचे सह -सचिव ऍड. प्रदीप नागपूरकर, प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. सुकाळे, अधी सभा सदस्य डॉ. ए. टी. शिंदे संयोजन सचिव डॉ. प्रशांत सुतकर, तसेच संयोजन समितीचे सदस्य डॉ. शंकर विभुते, डॉ. बालाजी भंडारे, डॉ. शिल्पा शेंडगे, डॉ. गणेश जोशी, डॉ. शरद वाघमारे, डॉ. शिवाजी भदर्गे यांच्यासह अधीसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ए. पी. बोरीकर, डॉ. माया राऊत, डॉ. पी. एस. बोरकर, डॉ. आर. व्ही. सांगवीकर, डॉ. ए. के. घाडगे, डॉ. व्ही. एन. नरवाडे, डॉ. रेखा वाडेकर, स्नेहा गायकवाड यांच्यासह विजय सोने, मोहम्मद खुलेत, सुकूर आणि बैतकर यांनी परिश्रम घेतले.
