ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात छायाचित्रणासाठी २८, तर मेहंदीसाठी ६६ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
निसर्गातील सौंदर्य टिपण्याची अनोखी दृष्टी, कॅमेऱ्याच्या माध्यमातून साकारलेली सर्जनशीलता आणि मेहंदीच्या नाजूक रेषांमधून उमटणारा कलात्मक आविष्कार अशा उत्साहपूर्ण वातावरणात ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्मिता पाटील मंचावर स्थळ छायाचित्रण व मेहंदी या कलाप्रकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही कलाप्रकारांत एकूण ९४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ-२०२६’युवक महोत्सवात विविध कलाप्रकारांची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्मिता पाटील मंचावर आयोजित स्थळ छायाचित्रण स्पर्धेसाठी ‘नॅचरल फोटोग्राफी’ हा विषय देण्यात आला होता. या विषयाच्या माध्यमातून निसर्गातील विविध रंगछटा, सौंदर्य, सूक्ष्म निरीक्षण आणि कल्पक छायाचित्रण कौशल्याला वाव मिळाला.
या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील २८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये लातूर येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचा रोहन रसाळ, दयानंद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लातूरचा वेद लोभे, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीची प्रियदर्शनी फड, सरस्वती कॉलेज ऑफ फार्मसी, वारंग्याचा ऋषिकेश मोरे, कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगावचा प्रथमेश बोचणे तसेच श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेडची रुहमा पठाण यांच्यासह विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांचा सहभाग होता.
मेहंदीच्या नाजूक रेषांमधून साकारला कलात्मकतेचा सुंदर आविष्कार
याच मंचावर आयोजित मेहंदी स्पर्धेलाही स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. ‘दुल्हन मेहंदी’ या विषयावर आधारित या कलाप्रकारात तब्बल ६६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक मेहंदी कलेला आधुनिक कल्पकतेची जोड देत स्पर्धकांनी आपल्या कलात्मक कौशल्याचे दर्शन घडविले. आकर्षक नक्षीकाम, सूक्ष्म रेखाटन, रेषांची सुरेख गुंफण आणि वैविध्यपूर्ण कलाकुसरीच्या माध्यमातून मेहंदी कलेतील सौंदर्य व सर्जनशीलतेचा आविष्कार पाहायला मिळाला
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.शिंदे, उप-प्राचार्य एकनाथ खिल्लारे, सतिश बैनवाड यांच्यासह सल्लागार समितीच्या सदस्यांनी या स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यी कलावंताचे कौतूक केले.
छायाचित्रणातून निसर्गाचे सौंदर्य टिपण्याची स्पर्धकांची धडपड आणि मेहंदीच्या माध्यमातून पारंपरिक कलेला मिळालेली कल्पकतेची जोड यामुळे स्मिता पाटील मंचावर कलात्मक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यातील निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला चालना देण्याच्या दृष्टीने हे दोन्ही कलाप्रकार महत्त्वपूर्ण ठरले.
स्मिता पाटील मंचावरील विविध कलाप्रकारांचे नियोजन व व्यवस्थापन डॉ. सुनील कदम आणि डॉ. व्ही. एन. नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यासाठी शैलेजा वडजे, प्रवीण मुळे, स्नेहा गायकवाड, पाटील, कृष्णा हंबर्डे, उत्तम पावडे, विजय कदम आणि स्मिता चालीकवार हे परिश्रम घेत आहेत.
एकूणच, स्थळ छायाचित्रण आणि मेहंदी या दोन्ही कलाप्रकारांतील उत्स्फूर्त सहभागामुळे ज्ञानतीर्थ युवक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला कलात्मकतेची अनोखी झळाळी प्राप्त झाली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, प्रतिभेला आणि कलाविष्काराला मिळालेले हे व्यासपीठ युवक महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.