नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात तरुणाईच्या जल्लोषासोबतच कौटुंबिक आणि सर्व पिढ्यांच्या सहभागाचे एक अनोखे आणि हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले. एरवी केवळ महाविद्यालयीन तरुणांपुरता मर्यादित वाटणाऱ्या या महोत्सवात यंदा ज्येष्ठ मंडळींपासून ते अगदी तान्हुल्या बाळांपर्यंत सर्वांनीच हजेरी लावून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
महोत्सवाच्या प्रांगणात जिथे अनुभवी ज्येष्ठ व मार्गदर्शक (Gen-X) हसतमुखाने कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसले, तिथेच स्पर्धांच्या धावपळीत विश्रांती घेत जमिनीवर खेळणारे चिमुकले बाळ (Gen-Beta) सर्वांचे लक्ष वेधून घेतल होते. सदरील छायाचित्र युवक महोत्सवाच्या मीडिया समिती चे प्रमुख डॉ. उल्हास पत्की यांनी घेतले.
एका बाजूला मंचावर विविध स्पर्धा आणि कलागुणांचा आनंद घेणारे प्रेक्षक व प्राध्यापक वर्ग, तर दुसऱ्या बाजूला झाडाच्या सावलीत मोकळ्या जागेवर बसून एकमेकांशी संवाद साधणारे विद्यार्थी आणि कुटुंब असा सुखद उत्साह पाहायला मिळाला.
युवा महोत्सवाचे रूपांतर केवळ एका स्पर्धेत न राहता एका भव्य स्नेहमेळाव्यात झाले असून, विविध वयोगटातील लोकांच्या या सहभागामुळे महोत्सवाला एक वेगळाच जिव्हाळा प्राप्त झाला आहे.
