https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कार्यसंस्कृतीचे आग्रही : डॉ.बी.एस. ढेंगळे*

लेखक :डॉ. अजय गव्हाणे*

प्राचार्य डॉ.बी.एस. ढेंगळे हे नाव शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येकाने आदराने
घ्यावे असे नाव आहे. शिस्त, संयम, उत्कृष्ट प्रशासन, संशोधक, हाडाचे
शिक्षक तसेच कार्यसंस्कृतीचे कठोर आग्रही म्हणून त्यांचा आवर्जून
उल्लेख करावा लागेल. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी
निभावलेली भूमिका सुवर्णकाळ म्हणून गणल्या जाईल. यशवंत महाविद्यालयाला शिस्तीच्या पटलावर आणून त्याला योग्य रचना व आकार देण्याचे बहुतांशी श्रेय डॉ.बी.एस. ढेंगळे यांना द्यावे लागेल. त्यांच्या कामाचा आवाका अचंबित करणारा आहे. प्रशासक व अभ्यासक या
दोन्ही भूमिका एकाच वेळी पार पाडणारे बी.एस. ढेंगळे हे एक विरळ व्यक्तिमत्त्व म्हणावे लागेल.
डॉ. बी. एस. ढेंगळे यांनी शिक्षण क्षेत्राला आपले संपूर्ण आयुष्य समर्पित
केले. विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य आदी भूमिका निभावताना त्यांनी शिक्षण क्षेत्र अधिक कसदार व विद्यार्थीकेंद्री करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यशवंत महाविद्यालयात सकाळी ७ ते रात्री ७ असे बारा व कधी कधी त्यापेक्षाही जास्त तास थांबून इथल्या प्रत्येक कृतीवर व घटकांवर आपली अमिट अशी छाप सोडलेली आहे. ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम’ हे त्यांचे विशेष तज्ज्ञतेचे क्षेत्र. प्रशासक म्हणून भूमिका पार पाडताना या अभ्यास विषयाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केलेले नाही.
एकाच ठिकाणी बसून प्रशासन करणाऱ्यांपैकी डॉ.बी.एस.ढेंगळे नव्हते.
ए.सी. ऑफिसमध्ये बसून आदेश देणारे कागदी प्रशासक नव्हते तर
जमिनीशी नाळ जुळलेले शिक्षक व प्रशासक होते. तासिका सुरू असताना
ते नित्य राऊंडस् घेत असत. त्यामुळे कामाचे टोपले टाकण्याची प्रवृत्ती
त्यांनी नष्ट केली. प्राध्यापक वेळेवर तासिकेला जातात का नाही,
तासिकेमध्ये काय शिकवतात, त्याचे निरीक्षण नित्य होत असल्यामुळे
प्राध्यापकांवर त्यांचा प्रचंड नैतिक दबाव होता आणि सगळ्यात महत्त्वाची
बाब म्हणजे प्रशासक म्हणून त्यांनी कधीही कुणाच्या पोटावर लेखनीचा
फटकारा मारला नाही. फारच गरज पडली तर कर्मचाऱ्यांच्या पाठीवर
लेखनीचा फटकारा मारण्यास मागेपुढे पाहिले नाही. प्राचार्य पदाच्या
खुर्चीवर डॉ.बी.एस. ढेंगळे बसलेले असताना कुणीही त्यांच्या जवळचे व
दुरचे नसत. त्यांची नैतिक भिती, दडपण, आदर व दरारा असल्यामुळे
त्यांच्या जवळ जाण्यापेक्षा कर्तव्यपूर्ततेला सर्वचजण महत्त्व देत असत.
हीच बाब त्यांना जास्त आवडत असते. नियोजित नियंत्रणाबरोबरच
अचानक भेट देऊन कार्यालय, विभाग, स्टाफ रूम, वर्गखोल्या यांची
परिस्थितीते पाहत असत व तात्काळ संबंधितांना कठोर शब्दात सुचना
देत. त्यामुळे प्राध्यापक व कर्मचारी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे
सदैव दक्ष राहत असत.
डॉ.बी.एस. ढेंगळे यांचा ‘इतिहास’ हा विषय असला तरीही त्या काळातही आंतरविद्याशाखीय अभ्यास पद्धतीचे ते समर्थक होते. त्यांचे सामाजिक शास्त्रातील इतर विषय, भाषा, वाणिज्य, विज्ञान आदी क्षेत्रातील ज्ञान वादातीत होते. मुलाखतीच्या वेगवेगळ्या प्रसंगी उमेदवारही त्यांच्या प्रश्नांना ऐकून अचंबित होत असत. ‘नैसर्गिकता’ हा त्यांच्या
स्वभावाचा स्थायी भाव होता. आव आणणे, दिखाऊपणा करणे,
आवश्यकतेपेक्षा जास्त सांगणे, विनाकारण इतरांची अनावश्यक व
अवाजवी स्तुती करणे, अहंकार दर्शवणे याची त्यांना मनस्वी चिड होती.
‘अशांची’ वेळप्रसंगी सर्वांपुढे खरडपट्टी काढण्यासहीते मागेपुढे पाहत
नसत. विचारांनी, कृतीने, मनाने व वर्तनाने ते वास्तववादी आहेत. त्यांचे
पाय नेहमी जमीनीवर असत. फाजीलपणा, नियमांच्या विरोधी कृती,
कायद्याचा अनादर वरिष्ठांची खिल्ली या गोष्टींमुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जात असे. भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या परिपूर्ण संस्कारांनी व विचारांनी त्यांचे व्यक्तिमत्व घडलेले आहे. म्हणूनच हा बाणेदारपणा व करारीपणा प्रकट होत
आहे.
आजचा काळ काही प्रमाणात विलक्षण व विचित्र असा झालेला आहे.
विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे त्याला नियमानुसार सौम्य शिक्षा शाळेत असताना
दिल्यावरही पालक भांडण्याच्या आविर्भावात शाळेकडे कूच करताना
दिसत आहेत. डॉ.बी.एस.ढेंगळे प्राचार्य असताना वेगवेगळ्या परिक्षांमध्ये
विद्यार्थ्याची कॉपी सापडल्यास किंवा विद्यार्थ्याने एखादे असभ्य व
असंस्कृत वर्तन
केल्यास झोपडून काढत असत. तेव्हा ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ या विधानाची जवळपास असणाऱ्या सर्वांनाच आवर्जून आठवण येत असे.
त्यांच्या अशा शिस्तीबाबतच्या कृती योजनेमुळेच यशवंत महाविद्यालयात
विद्यार्थीनी भगिनींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. आजही विद्यार्थ्यांपेक्षा
प्रवेशीत विद्यार्थीनींची संख्या जास्त आहे, याचे निर्विवाद श्रेय साहजिकच
आजही सर्वजण डॉ.बी.एस.ढेंगळे यांनाच देतात. एकेकाळी यशवंत
महाविद्यालयाच्या मैदानावरून शुक्रवारच्या बाजारात जाणाऱ्या जनावरांचे चित्र व आज युनिफॉर्म परिधान केलेले विद्यार्थी ओळखपत्र धारण करून
महाविद्यालयात प्रवेश करणारे पाहिले की. काय होते आणि आज काय आहे.
याची तुलना करताना बदललेले यशस्वी,
आशादायी, शैक्षणिक विकासमय चित्र काढणारे चित्रकार डॉ.बी.एस. ढेंगळेच आहेत. सुर्याची उंची, प्रखरता व महत्त्व कितीही नाकारलेतरी सत्य हे सूर्यप्रकाशाइतकेच प्रखर असते. सुर्यावर धुळ फेकणाऱ्यांची संख्या कमी नसते. मात्र सरते शेवटी धुळही
फेकणाऱ्यांच्याच डोळ्यात जात असते, हे सिद्ध होण्यास फार मोठ्या तर्काची गरज नाही.
डॉ.बी.एस.ढेंगळे हे प्रशासनातील विकेंद्रीकरणावर विश्वास ठेवणारे
आहेत. प्रत्येकाला त्याची भूमिका, कर्तव्य यांची विभागणी करून स्वातंत्र्य
देणारे प्रशासक आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मुल्यमापन त्या
व्यक्तीचे पद गेल्यानंतर केल्यास त्यामध्ये अधिक सत्यता असते. कारण
‘उगवत्या सूर्याला तर सगळेच नमस्कार करतात’ त्या नमस्कारामागे
स्वतःचा छुपा निहीत स्वार्थ दडलेला असतो. स्वतःच्या पदरात खूप काही
ओढून घ्यायचे असते. त्यामुळे व्यक्तिपेक्षा पदाला महत्त्व देणाऱ्यांची संख्या
वाढत आहे. निर्व्याज, निष्पाप, निरहंकारी भावना जवळपास लुप्तच
झाल्यात की काय, अशी शंका मनात आल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
डॉ.बी.एस. ढेंगळे यांच्याबद्दल विचार करताना, माघारीदेखील बोलताना
आदराचेच शब्द फुटतात. ही त्यांची खरी शिदोरी आहे. विरोध करणाऱ्याने, शत्रुनेदेखील आदरभाव व्यक्त करावा असे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व.
काळ येतो आणि जातो. काळाच्या पटलावरची पात्रे येतात व जातात.
हा निसर्गाचा नियमही आहे. त्याला कुणी कितीही नाकारले तरीही तेच
वास्तव आहे. मात्र काळावर अमिट छाप सोडून जाणे हे मात्र मानवी
कर्तृत्वाच्या क्षमतेत लपलेले रहस्य आहे. हेच रहस्य डॉ.बी.एस. ढेंगळे
यांना उमगलेले आहे. त्यांच्या कर्तृत्वाची छाप स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातच नव्हे तर मराठवाडा व महाराष्ट्रातही निनादत असते.
यशवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान कार्यकारणी सदस्य आदरणीय डॉ.बी.एस.ढेंगळे सरांना जीवन साधना गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
*प्रा.डॉ.अजय गव्हाणे*
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
यशवंत महाविद्यालय,
नांदेड
भ्रमणध्वनी:८३२९२५६६३६
————————————————–

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704