एम सी आर

महात्मा गांधींची पत्रकारिता लोकशाही आणि समाजहिताला बळ देणारी

Uncategorized

सत्य, समाजहित आणि जनजागृतीला केंद्रस्थानी ठेवून पत्रकारितेचा आदर्श घालून दिला

भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रांच्या प्रभावी माध्यमातून राष्ट्रप्रेम, जनजागृती आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गांधीजींनी केले. पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून सत्याची सेवा, लोकशिक्षण आणि समाजहित साधण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केल.
इंग्लंडला गेल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षी त्यांना वृत्तपत्र वाचनाची सवय लागली. गांधीजी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना, 1888–1891 या काळात त्यांनी द व्हेजिटेरियन या इंग्रजी साप्ताहिकातून शाकाहार, धार्मिक विषय आदींबाबत लेखन केल. दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात पत्रकारितेचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तेथील अन्याय, भेदभाव आणि भारतीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा प्रभावी वापर केला.
४ जून १९०३ रोजी दक्षिण आफ्रिकेत इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक सुरू झाले. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या या वृत्तपत्राचे उद्दिष्ट दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्र आणणे, त्यांना मार्गदर्शन करणे, सामाजिक दोषांवर भाष्य करणे आणि मानवी भेदभावाविरोधात जनमत तयार करणे हे होते. सत्याग्रहाच्या चळवळीचे तपशीलवार वृत्तांकनही या माध्यमातून करण्यात आल आहे.
गांधीजींच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे साधी, स्पष्ट, अचूक आणि वाचनीय भाषा. शेतकरी, कामगार आणि सामान्य वाचकांपर्यंत विचार पोहोचला पाहिजे, यावर त्यांचा विशेष भर होता. पत्रकारितेचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी न करता समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व्हावा, अशी त्यांची भूमिका होती. वृत्तपत्राने सरकारच्या धोरणांवर स्वतंत्रपणे जनमत व्यक्त केले पाहिजे आणि राष्ट्रहित लक्षात घेऊन तटस्थ भूमिका मांडली पाहिजे, असे गांधीजी मानत.
गांधीजींनी इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन या वृत्तपत्रांचे संपादन केल. अस्पृश्यता निर्मूलन, सत्याग्रह, अहिंसा, हिंदू-मुस्लिम ऐक्य, खादी, स्वदेशी, दारूबंदी, निसर्गोपचार आदी विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. हरिजन आणि यंग इंडियाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा आणि वंचितांच्या प्रश्नांचा आवाज त्यांनी बुलंद केला.
गांधीजींच्या पत्रकारितेतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जाहिरातींपासून वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य. वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींना अधिक जागा दिल्यास संपादकीय विचारांसाठीची जागा कमी होईल, तसेच निरर्थक किंवा फसव्या जाहिरातींना महत्त्व मिळू नये, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी जाहिरातींशिवाय वृत्तपत्रे चालविण्याचा प्रयोग केला आणि वर्गणीदारांच्या माध्यमातून आर्थिक आधार निर्माण करण्यावर भर दिला.
वृत्तपत्राचे व्यवस्थापन, छपाई आणि वितरण याबाबतही गांधीजी अत्यंत दक्ष राहत.स्वतंत्र विचार मांडण्यासाठी त्यांनी स्वतःचे छापखाने सुरू केले. नवजीवन मुद्रणालयातून वृत्तपत्रांसोबतच विविध भाषांतील पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली. पुस्तकांची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी असावी, यावर त्यांचा आग्रह होता. मुलांच्या पुस्तकांमध्ये मोठी अक्षरे, चांगला कागद, आकर्षक चित्रे आणि कमी किंमत असावी, असा विचारही त्यांनी मांडला.
गांधीजींच्या मते पत्रकारितेचे तीन प्रमुख उद्देश होते—सार्वजनिक भावना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जनजागृती निर्माण करणे आणि सार्वजनिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे. त्यामुळे त्यांची पत्रकारिता ही केवळ वृत्तपत्र प्रकाशनापुरती मर्यादित राहिली नाही; ती सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनली.
सत्य, अहिंसा, स्वदेशी, सामाजिक समता आणि लोकहित या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून गांधीजींनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे ते केवळ पत्रकार नव्हते, तर प्रभावी संपादक, प्रकाशक आणि वृत्तपत्र व्यवस्थापनाचे जाणकार म्हणूनही भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.

प्रा. डॉ.भगवान सूर्यवंशी.
महात्मा गांधी पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड.
मो. न 9975468057.

Share

Related posts

विकसित भारत २०४७ : आत्मनिर्भरतेतून महासत्तेकडे वाटचाल शक्य” – प्रा. डॉ. सुभाष पाटील

Chief Editor

शिक्षणावर खर्च न केल्यास तुरुंगावर करावा लागेल -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

बारावीनंतर करिअरची नवी दिशा; स्वावलंबी होण्यासाठी विद्यापीठाची सुवर्णसंधी

Chief Editor

*ए बी फॉर्म* चुकीचा निघाल्याने (जोडला ) वंचितच्या उमेदवाराला पक्षापासून वंचित राहणाची पाळी

Chief Editor

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

Chief Editor

ऊध्दव हरकाळ यांचा अल्काताई सोळंके, सोरेकर यांच्या हस्ते सत्कार.

Chief Editor

Leave a Comment