स्व. माधवराव पाटील शेळगावकर: स्वच्छतेचा जागर रुजविणारे स्वच्छतादूत
संत गाडगेबाबा स्वच्छता समितीचे महाराष्ट्राचे प्रथम अध्यक्ष स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांच्या निधनाने स्वच्छता चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे.
जवळपास २००० गावांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छतेचा जागर त्यांनी केला. संत गाडगेबाबा यांचा, “स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे”, हा संदेश घेऊन ते महाराष्ट्रभर फिरले आणि निर्मल ग्राम योजनेमध्ये महाराष्ट्राला अव्वल स्थान माधवराव पाटील शेळगावकर यांच्यामुळे प्राप्त झाले.
जपानमध्ये लहान मुलांना दोन गोष्टी प्राथमिकतेने, प्राधान्याने आवर्जून शिकवल्या जातात. त्या म्हणजे स्वच्छता आणि शिस्त. स्वच्छता प्रदीर्घ आणि निरोगी आयुर्मान, आनंदी जीवन याची मूलभूत गरज आहे. स्वच्छता चळवळीमध्ये माधवराव पाटील शेळगावकर यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या निधनाची वार्ता मनाला खिन्न करून गेली.
यशवंत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पांदणमुक्त गाव: काळाची गरज या विषयावरील सात दिवसीय शिबिरामध्ये त्यांचे व्याख्यान कायम स्मरणात राहिले. ग्रंथालयाच्या सेमिनार हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी यांच्याकरिता या व्याख्यानाचे आयोजन होते. व्याख्यानामध्ये प्रमुख मार्गदर्शक माधवराव पाटील शेळगावकर होते. सूत्रसंचालन करताना मी नेहमी….. पांदणमुक्त गाव…… पांदणमुक्त रस्ता….. असा उल्लेख करत होतो. त्यांच्या व्याख्यानाचा प्रारंभच त्यांनी माझ्याकडे बघून व उपस्थितांना संबोधून, अहो पांदणमुक्त गाव, रस्ता असे काय उच्चारता. वास्तव बोला. खरा शब्द वापरा. हागणदारी मुक्त गाव म्हणा….. हागणदारी मुक्त रस्ता म्हणा….. वेगवेगळ्या खेड्यामध्ये जात असताना खेडे आले; हे खिशातून तोंडाला आणि नाकाला रुमाल लागल्याबरोबर लक्षात येते. ही सर्व अस्वच्छता करायला जर माणसं लाजत नसतील तर हागणदारीमुक्त गाव हा शब्द उच्चारायला का लाजता? का घाबरता? असा परखड विचार देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली.
व्याख्यानाची ही सुरुवात त्यांच्या स्पष्ट व परखड वक्तव्याची साक्ष होती. आपण अतिऔपचारिकता जपत असताना सत्य आणि वास्तव का लपवतो? हा आत्मपरीक्षणरुपी प्रश्न देखील मनात निर्माण झाला. व्याख्यान हे प्रभावी, उत्कृष्ट आणि पथदर्शक होते. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचा तास त्यांनी आवर्जून ठेवला आणि विद्यार्थ्यांना; जे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत; प्रश्न विचारण्यास भाग पाडले. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, मायभगिनी मायमाऊली हातामध्ये लोटा घेऊन शौचालयासाठी उघड्यावर जातात. गावातले पुरुष सुद्धा उघड्यावर शौचास जातात. अशा वेळेस रस्त्यावरून कुणी जात असेल तर माय माऊलीला ऊठून उभे राहावं लागतं. पुरुष का उभ राहत नाही? एका विद्यार्थ्याने मध्येच कॉमेंट केली की, पुरुष हा निर्लज्ज असतो; म्हणून उभे राहत नाही. त्यांनी ही कॉमेंट खोडली आणि असं सांगितलं की, प्रत्येक माणसाला लाज असते. मायमाऊली माय भगिनींना जशी लाज असते; तशी पुरुषांना सुद्धा लाज असते; मात्र त्यावर पुरुषांनी एक उपाय शोधून काढला आहे की, कुणी रस्त्यावरून जात असेल तर ते दोन पायांमध्ये तोंड खूपसून बसतात. या विधानाने संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ झाला; मात्र लगेच माधवराव पाटील शेळगावकर यांनी उपस्थितांना शॉक दिला की, तुम्ही जोक म्हणून, विनोद म्हणून याकडे पाहता; मात्र मायमाऊलींना पोटाचे आणि इतर विकार होतात. घराची इभ्रत रस्त्यावर शौचास जाते, याबद्दल माणसाला काहीच वाटत नाही, याचे मला खूप वाईट वाटते.
अशा प्रकारे हे व्याख्यान खूप गाजले, स्मरणात राहिले. आज माधवराव पाटील शेळगावकर यांच्या दुःखद निधनाने या स्मृती जाग्या झाल्या. असा स्वच्छतादूत, स्वच्छतेच्या चळवळीला प्राण म्हणणारा समाजसेवक पुन्हा होणे नाही. नंतरही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये माधवराव पाटील शेळगावकर दिसत असत. मार्गदर्शन करत असतात. आता इथून पुढे एक पहाडासारखे व्यक्तिमत्व, करारी बाणा असलेला समाजसेवक पुन्हा दिसणार नाही. आपल्यामध्ये पुन्हा उठणार बसणार नाही; ही खंत, हा चटका सदैव मनात लागून राहील. महात्मा गांधी यांच्या ग्रामराज्य, ग्राम स्वराज्य, ग्राम स्वच्छता या तत्त्वाला आयुष्यभर उराशी जोपासणारे माधवराव पाटील शेळगावकर यांचा अंत्यविधी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे एक ऑक्टोबरला व्हावा आणि गांधी विचारांना पाईक असलेले सेवक आपल्या मधून निघून जाणे, ही समाजाची खूप मोठी हानी आहे.
स्व. माधवराव पाटील शेळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचा स्वच्छतेचा वसा आणि वारसा आपण सर्वांनी, येणाऱ्या पिढ्यांनी पुढे चालवावा आणि घर, नगर, गाव, खेड, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र आणि भारत देश स्वच्छतेच्या सौंदर्यामध्ये खुलून दिसावा, अशी कृतिशील प्रतिज्ञा घ्यावी. हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
-डॉ.अजय गव्हाणे, नांदेड.
