माझे आई बाबा माझे विठ्ठल-रुक्मिणी
आई-वडिलां विषयी लिहायला बसावे आणि शब्द अपुरे पडावेत, यापेक्षा मोठे भाग्य कोणते. आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झिजलेल्या, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाचा विचार केलेल्या आणि आपल्या कृतीतून माणुसकी, प्रामाणिकपणा, अध्यात्म, परोपकार आणि संस्कार यांचा अर्थ शिकविणाऱ्या आई-वडिलांविषयी लिहिताना मन भरून येते. अनेकदा वाटले आई बाबांन बद्दल लिहावे पण पुन्हा वाटते आपल्या आई वडिलांचे वर्णन करण्यासाठी शब्दच कमी पडतील अणि शब्द कशाला हवेत. त्यांचे संपूर्ण आयुष्यच एक पुस्तक असते. त्या पुस्तकातील प्रत्येक पानावर प्रेम आहे, त्याग आहे,काही प्रमाणात संघर्ष आहे, श्रद्धा आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणुसकी आहे.आज माझे वडील श्री. नागोराव रामचंद्रराव भोसले अमृतमहोत्सव पूर्ण करून 77 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, तर माझी आई सौ. मनकर्णिका नागोराव भोसले यांनीही आयुष्याची जवळपास सात दशके प्रेम, सेवा, श्रद्धा आणि कुटुंबासाठी समर्पित केली आहेत. या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्याविषयी काही लिहिणे हा केवळ कौतुकाचा प्रयत्न नाही, तर त्यांच्या ऋणाची जाणीव व्यक्त करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे.खरे तर माझे बाबा म्हणजे माझ्यासाठी केवळ वडील नाहीत,तर ते एक संस्था आहेत, एक विचार आहेत, एक संस्कार आहेत आणि एक चालता-बोलता जीवनग्रंथ आहेत. आणि माझी आई,काय बोलु. माझी आई या जीवनग्रंथाची न बोलता प्रत्येक पानाला अर्थ देणारी शांत, सात्त्विक, सहनशील, आणि प्रेमळ शक्ती आहे.
माझ्या वडिलांचा जन्म माझे आजोबा कै. श्री. रामचंद्र पाटील भोसले आणि कै. सोनाबाई रामचंद्र पाटील भोसले यांच्या पोटी वाघी या छोट्याशा गावात झाला. चार भाऊ आणि दोन बहिणी असे मोठे कुटुंब. परिस्थिती मध्यमवर्गीय. आमचे आजोबा एक प्रेमळ, रूबाबदार व्यक्तिमत्व. शिक्षणाला आजच्यासारखे महत्त्व नसलेला तो काळ. घरची शेती, कुटुंबाची जबाबदारी आणि त्यातून शिक्षणाचा ध्यास .या सगळ्यांचा समतोल साधत,शेतात काम करत माझ्या वडीलांनी आपले शिक्षण पूर्ण केले.लहानपणापासूनच बाबा अत्यंत शिस्तबद्ध, स्वाभिमानी, आणि गुणवान . पुढे नांदेडला आल्यानंतर त्यांनी यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या काळात उच्च शिक्षण घेणे हीच मोठी गोष्ट होती. परंतु परिस्थितीला शरण न जाता शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द कायम राहिली. व शिक्षण चालु असतानाच पुढे ते एस.टी. महामंडळात मुख्य कार्यालयात सेवेत रुजू झाले.तेव्हा पद सामान्य होते. परंतु त्यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. नोकरी किती मोठी आहे यापेक्षा ती किती स्वाभिमानाने करायची, हे बाबांनी दाखवून दिले.बाबांनी नोकरी एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने काम करावे अशा ऐटीत ,पण स्वाभिमानाने, निर्भयपणे आणि प्रामाणिकपणे केली.एस.टी. महामंडळाच्या इंटक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. शेकडो लोकांना नौकरी ला लावले, शेकडो कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते धावून गेले. प्रसंगी अधिकाऱ्यांशी संघर्ष केला. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठविला. कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत. आयुष्यात त्यांनी कधीही कुणाला घाबरणे शिकले नाही. मात्र, याचा अर्थ उद्धटपणा नव्हता. त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध संताप आणि माणसाविषयी अपार प्रेम होते. त्यांची एक विलक्षण सवय होती स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण समोरच्या माणसाचे काम झाले पाहिजे.अनेक वेळा लोकांच्या कामासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. परंतु आयुष्यभर कुणाकडूनही एका पैशाची अपेक्षा केली नाही. उलट त्यांच्या कडे आलेला माणूस काहीतरी खाऊन-पिऊनच परत गेला पाहिजे, हा आमच्या घरचा जणू नियमच होता.माझ्या आई बाबांच्या घराचे दार हे फक्त घराचे दार नव्हते,ते माणुसकीचे दार होते.गावाकडून कोणी नांदेडला आले, विद्यार्थ्याला राहण्याची गरज पडली, एखाद्याला नोकरीसाठी मदत हवी होती, कुणाला आर्थिक अडचण आली, कुणाच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न होता.त्यावेळेस नांदेड येथे आमचेच घर होते. कुणीही दवाखान्यात आला की सर्व मदत आमच्या घरूनच. आई-बाबांनी शक्य ते सर्व केले.त्या काळात नांदेडमध्ये आमचे घर म्हणजे अनेकांसाठी आश्रयस्थान होते. अनेक पाहुणे आमच्या घरी राहिले, शिकले, मोठे झाले. आईने कधीही त्याला ओझे मानले नाही. ‘नाही’ हा शब्द च आईच्या शब्दकोशात नाही.लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला मानाने वागवायचे. समोरच्या माणसाला आपण आपलेच आहोत, असे वाटले पाहिजे, ही तिची वृत्ती.माझी आई सौ. मनकर्णिका भोसले म्हणजे अत्यंत शांत, साधी, भोळी, प्रेमळ, सात्त्विक,जणु प्रेमाचा सागरच आणि कष्टाळू स्त्री.बाबांचा स्वभाव स्पष्टवक्तेपणाचा, काहीसा रागीट,पण आईने तो राग आयुष्यभर प्रेमाने सांभाळला. बाबांच्या प्रत्येक निर्णयामागे आईची शांत शक्ती उभी राहिली.आईने कधीही बाबांची इच्छा मोडली नाही. बाबांचा शब्द तिच्यासाठी अंतिम. पाहुणे, मुलांचे शिक्षण, नातेवाईक, समाजातील लोक सर्वांची जबाबदारी तिने अत्यंत सहजतेने व उत्साहाने पेलली.आईला रिकामे बसणे आवडत नाही. स्वच्छता, काम, पूजा, वाचन आणि सतत काहीतरी करण्याची तिची सवय आजही कायम आहे.वय वाढले, पण तिच्या मनातील उत्साह मात्र तसाच आहे.
माझ्या बाबांच्या जीवनाचा खरा केंद्रबिंदू म्हणजे पंढरीचा पांडुरंग.गेल्या जवळपास पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी पंढरपूरची वारी केली. जवळपास वीस वर्षे त्यांनी आईला सोबत घेऊन पायी वारी केली.पंढरपूर म्हणजे त्यांच्यासाठी केवळ तीर्थक्षेत्र नाही तर पांडुरंग म्हणजे त्यांचे जीवनच.वर्षातून अनेक वेळा पंढरपूरला जाणे,आम्ही रहात असलेल्या विजय नगरातील श्री हनुमान मंदिरात न चुकता दर्शन घेणे, नियमित पूजा करणे, ज्ञानेश्वरी आणि गाथेचे वाचन करणे या गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.ते दररोज एक-दोन तास अध्यात्मिक वाचन करतात. त्यात कधी खंड नाही.त्यांची भक्ती ही प्रदर्शनासाठी नाही. कोणाला दाखविण्यासाठी नाही. ती अंतर्मनातून आलेली, निस्सीम आणि निर्व्याज आहे.बाबांकडून आम्ही अध्यात्माचा खरा अर्थ शिकलो.मंदिरात जाणे, पूजा करणे, वारी करणे हे अध्यात्माचे एक अंग आहे पण दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणे, गरजवंताला मदत करणे, गरीबाला आधार देणे आणि कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता माणुसकी जपणे हेच खरे अध्यात्म, हे आई बाबांनी आम्हाला आपल्या कृतीतून शिकविले.वारीमध्ये गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, दरवर्षी द्वादशीच्या दिवशी पंगत देणे, वारकऱ्यांना जमेल ती मदत करणे , यातून त्यांना विलक्षण आनंद मिळतो.त्यांच्या संस्कारामुळे आम्हीही वारीला जाताना वारकऱ्यांसाठी काहीतरी घेऊन जावे, त्यांना मदत करावी, अशी त्यांची आम्हाला नेहमीच सूचना असते.बाबांना संत-सज्जनांच्या सह वासाची प्रचंड ओढ आहे. आमच्या घरी अनेक संत येवून गेले. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार-पाच दशकांत जेवढे आध्यात्मिक कार्यक्रम झाले, त्यातील जवळपास प्रत्येक कार्यक्रमात आई-बाबांचा सहभाग असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.आळंदी येथील विद्वान तपस्वी संत, वैकुंठवासी गुरुवर्य किशन महाराज साखरे हे माझ्या आई बाबांचे गुरू. त्यांच्या विषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा .कधीही ते आपल्या गुरूचे नाव घेणे टाळतात. गुरू महाराज असाच ते उल्लेख करतात. महाराजांविषयी त्यांची निष्ठा पाहून आम्ही मुलंही अनेकदा थक्क होतो.त्याचबरोबर ह भ प बाबा महाराज सातारकर, ह भ प चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, वै. मारोतराव महाराज दास्तापूरकर महंत जीवनदास महाराज जमानदास महाराज , मामा महाराज मारतळेकर, भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर,महान भागवतकार श्री रमेशभाई ओझा, रामकथेचे मर्मज्ञ श्री मोरारी बापू, माता कनकेश्वरी देवी,श्री सुधांशुजी महाराज अशा विविध संत-महात्म्यांच्या कार्यक्रमांना आई-बाबा आवर्जून उपस्थित राहिले आहेत.भागवत कथा ऐकण्यासाठी ते नैमिषारण्यापर्यंत गेले.जगन्नाथ पुरी,पंढरपुर,देहू ,आळंदी शेगाव, यवतमाळ, पुणे, लातूर, नागपूर, उमरखेड अशा असंख्य ठिकाणी ते मित्रपरिवारासह आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी गेले आहेत.नैमिषारण्यात श्री व सौ डॉ. शिवाजी शिंदे यांच्यासोबत ऐकलेली रमेशभाई ओझा यांची भागवत कथा ते आजही तितक्याच उत्साहाने सांगतात.
आई-बाबांनी देशभर प्रवास केला.पण त्यांनी केवळ ठिकाणे पाहिली नाहीत तर सर्वत्र माणसे जोडली.त्यांचे मित्र श्री. माधवराव जोगदंड, श्री. एकनाथराव भारसावडे, श्री. विश्वनाथ भारसावडे,श्री जाधव साहेब, श्री राठोड साहेब,श्री बेंद्रीकर काका तसेच सुगाव, वाघी, निळा आणि परिसरातील असंख्य आध्यात्मिक मित्र-नातेवाईक यांच्यासोबत ते यात्रेत गेले.त्यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे.प्रवासात प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणे, सर्वांची काळजी घेणे, कुणाला काही कमी पडू न देणे हा आई-बाबांचा स्वभाव.म्हणूनच त्यांच्या सहवासात गेलेला प्रत्येक माणूस त्यांचा होऊन जातोबाबांच्या आयुष्यातील एक प्रसंग मला विशेष अभिमान देतो.आमचे एक नातलग यांची किडनी निकामी झाली होती. तेव्हाचा काळ आजसारखा मोबाईल, इंटरनेट आणि सहज उपलब्ध माहितीचा नव्हता.लोकांकडे पैशाची कमतरता होती. साधारण 1990 च्या काळात अशा संकटात एखाद्या सामान्य माणसाने किती धावपळ करावी लागली असेल, याची कल्पना करता येते.
पण बाबा जवळपास तीस दिवस स्वतःची नोकरी, स्वतःची कामे बाजूला ठेवून त्यांच्यासाठी धावत राहिले.आमदार, मंत्री, विविध संस्था, ट्रस्ट यांच्याकडे जाऊन आर्थिक मदतीची विनंती केली. स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम दिली. आणि त्या व्यक्तीला अक्षरशः जीवनदान मिळवून दिले.या कार्याची दखल घेऊन त्या गावातील ग्रामस्थांनी बाबांचा मोठा नागरी सत्कार केला.मुलगा म्हणून त्या प्रसंगाची आठवण झाली की माझी मान अभिमानाने उंचावते.आज मी प्रवास करतो, विविध कार्यक्रमांना जातो. एस.टी. महामंडळातील अनेक जुनी मंडळी भेटतात.मी माझी ओळख सांगण्यापूर्वीच कधी कधी ते विचारतात
“तुम्ही नागोराव भोसले साहेबांचे चिरंजीव ना”आणि मग बाबांच्या आठवणी सुरू होतात.
“भोसले साहेबांनी माझे काम केले होते”“भोसले साहेबांनी मला त्या वेळी मदत केली होती”“भोसले साहेब खूप मोठ्या मनाचे माणूस आहेत …”असे ऐकताना माझे मन भरून येते.कारण माणूस किती मोठा आहे हे त्याच्या कडे असलेल्या पैशावरून किंवा घराच्या आकारावरून किंवा पदावरून ठरत नाही. तर ते त्याच्यामागे उभ्या असलेल्या माणसांच्या प्रेमावर, आठवणींवरून ठरते.बाबांना राजकारणाची आवड आहे. आदरणीय डॉ. शंकररावजी चव्हाण यांना ते राजकारणातील आदर्श मानतात. त्यांच्यासोबत त्यांनी काम केले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि श्री. डी. पी. सावंत ,सौ अमिता भाभी चव्हाण, मा.भास्करराव पाटील यांच्याविषयी त्यांच्या मनात आजही प्रचंड आदर आणि विश्वास आहे.परंतु राजकारण असो वा सामाजिक जीवन बाबांनी माणूस कधीच पक्ष, पद किंवा प्रतिष्ठेने मोजला नाही.त्यांच्यासाठी माणूस म्हणजे माणूस. माझे मामा श्री आनंदराव कदम यांच्यावर बाबांचे विशेष प्रेम. मामा साठी सुद्धा बाबांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच.डॉ कर्मवीर, डॉ शिवाजी शिंदे,कै डॉ सनत गांधी, श्री राजीव किवळेकर , डॉ मधुकर क्षीरसागर, श्री बाबूराव पावडे, डॉ अनिकेत कदम, श्री सोपान काळे, श्री हिप्परगेकर काका,श्री मुखेडकर काका, श्री सोळंके काका ईत्यादी वर बाबांचे विशेष प्रेम व आदर.
आज आम्ही तिन्ही भावंडे आयुष्यात ज्या ठिकाणी यशस्वी उभे आहोत, त्यामागे आमच्या आई-बाबांचे कष्ट, त्याग आणि संस्कार आहेत.मी यशवंत महाविद्यालया सारख्या मराठवाड्यातील नामांकित महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत असून माझा धाकटा भाऊ सुनील नागोराव भोसले हा न्यायाधीश आहे.माझी पत्नी डॉ. सौ. जया विजय भोसले हिने लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवून पीएच.डी. मिळविली, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ग-२ पदावर नियुक्ती मिळविली आणि इंग्रजीसारख्या विषयात SET उत्तीर्ण केली.या सर्व यशामागे आमच्या आई बाबांचा सिंहाचा वाटा आहे. माझी पत्नी व आई यांचे नाते अतिशय निर्मळ, निर्मोही व दृष्ट लागल्यासारखे आहे. आई बाबानी आम्हाला केवळ शिक्षण दिले नाही, शिक्षणाचा अर्थ समजावून दिला.त्यांनी आम्हाला संपत्ती देण्यापेक्षा सद्सद्विवेकबुद्धी दिली.त्यांनी आम्हाला मोठे होण्यापेक्षा चांगले माणूस होण्याची शिकवण दिली.पुढच्या पिढीतही आम्ही तेच संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहोत. माझी मुले कृष्णा जो भारतातील एका नामांकित मोठ्या महाविद्यालयात इंजीनियरिंगचे शिक्षण घेत आहे आणि लहान सर्वेश हुशार असून संस्कारी आहेत. बाबांचा सर्वेश वर विशेष जीव आहे.माझ्या भावाची पत्नी स्वरदा आणि त्यांच्या दोन गुणवान मुली सानवी व शर्वरी या सर्वांवरही आई बाबांचे प्रेम आणि संस्कार आहेत.माझी बहीण सौ. सुषमा गोविंद पाटील आपल्या संसारात आनंदी आहे. तिचा मुलगा अथर्व ऊर्फ राम नुकताच इंजिनिअर झाला आहे, तर मुलगी गायत्री फिजिओथेरपी डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहे. आमचे भाऊजी श्री गोविंद पाटील यांच्या प्रति आई बाबांना खुप आदर आहे. ही सारी फळे केवळ आमच्या कष्टांची नाहीत,ही आमच्या आई-बाबांनी आयुष्यभर पेरलेल्या संस्कारांची फळे आहेत.माझ्या आई-बाबांकडे पाहिले की मला नेहमी विठ्ठल-रुक्मिणीची जोडी आठवते.माझे बाबा निर्भय, स्पष्टवक्ते, परखड, धडाडीचे आहेत तर माझी आई अतिशय शांत, संयमी, प्रेमळ, सात्त्विक, भोळी आहे. बाबांच्या धडाडीला आईचा संयम लाभला.बाबांच्या संघर्षाला आईचे प्रेम लाभले.बाबांच्या अध्यात्मिक वाटचालीत आई खंबीरपणे सोबत राहिली.म्हणूनच त्यांचा संसार केवळ संसार राहिला नाही; तो एक संस्कारकेंद्र बनला. आम्ही अनेकदा बाबांना म्हणतो“तुम्ही स्वतःसाठीही काहीतरी करा. तुम्ही इतक्या लोकांसाठी केलेत, पण अनेकांनी तुमचे पैसे बुडविले, तुमचा गैरफायदा घेतला, तुम्हाला मानसिक त्रास दिला.”बाबा हसतात. त्यांना त्याचे फारसे दुःख नसते.कारण त्यांनी आयुष्यभर व्यवहारापेक्षा माणुसकीला महत्त्व दिले.त्यांच्या मुलांपैकी एक प्रोफेसर आहे, दुसरा न्यायाधीश आहे, सुना उच्चशिक्षित आहेत.याचा त्यांना कधीही अहंकार वाटला नाही.आजही ते गोरगरीब माणसांमध्ये सहज मिसळतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात.माणसाला पदाने नाही, तर मनाने मोठे व्हायचे असते, हे त्यांचे जीवनच सांगते.आज बाबा सत्याहत्तराव्या व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आईही सत्तरीच्या आसपास आहे.पण त्यांचा उत्साह पाहिला की वय हा केवळ आकडा आहे, याची जाणीव होते.सुमारे दीड वर्षापूर्वी बाबांनी आपल्या मूळ गावी वाघी येथे स्वतःचे छोटेसे घर असावे, ही इच्छा मनात धरली आणि चार खोल्यांचे सुंदर घर उभे केले.ऊन, वारा, पाऊस, कडक एप्रिल-मेची उष्णता कशाचीही पर्वा न करता त्यांनी स्वतः त्या कामात लक्ष घातले. फक्त त्यानीच हे घर बांधले असून त्यांनी यासाठी या व यात घेतलेली मेहनत शब्दातीत आहे. आजच्या तरुणांनीही थक्क व्हावे अशी त्यांची मेहनत आहे.गावी गेले की कामगारांना पाणी मिळाले का. चहा झाला का. कुणाला काही गरज आहे का याची ते स्वतः काळजी घेतात. माझ्या बाबांनी वाघी या गावी बांधलेले घर म्हणजे जणु त्यांचा ‘ स्वप्नमहल ‘ च होय. आम्हाला त्यांचा खुप अभिमान वाटतो. आई बाबांनी आयुष्यात जोडीने चार धाम ,बारा ज्योतिर्लिंग, अष्टविनायक दर्शन घेतले. पण त्यांचा आध्यात्मिक प्रवास अजून थांबलेला नाही.ते काशीला चार-पाच वेळा जाऊन आले आहेत. चारधामाची यात्रा झाली आहे. गोदावरीत स्नान, अमावस्या-पौर्णिमा, विविध तीर्थक्षेत्रे, श्रावणातील प्रत्येक सोमवार वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरात दर्शन.औंढा नागनाथ येथे तर श्रावण सोमवारी ते मागील चाळीस पेक्षा जास्त वर्षापासून अखंड जातात. आमचे कुलदैवत श्री शिखर शिंगणापूर, काशी विश्वनाथ, कधी घृष्णेश्वर, कधी परळी, काळेश्वर, मरळकचा महादेव, वाघीचा महादेव ही त्यांची नियमित आध्यात्मिक वाटचाल . मागील वर्षी ही कोणाला दाखविण्यासाठी केलेली गोष्ट नाही.
पांडुरंगावरची श्रद्धा आणि माणसांवरचे प्रेम या दोन गोष्टींवर त्यांचे आयुष्य उभे आहे.त्यांच्या आयुष्याची खरी कमाई काय असा मी जेव्हा विचार करतो, कि त्यांनी किती पैसा कमावला,किती जमीन घेतली,किती मोठे घर बांधले?यापेक्षा मोठा विचार करायला लावणारी गोष्ट आहे,त्यांनी किती माणसं कमावली.आणि या प्रश्नाचे उत्तर देताना माझ्या बाबांचे आयुष्य खरोखरच समृद्ध दिसते.त्यांच्याकडे देशभर माणसे आहेत.नांदेडमध्ये माणसे आहेत,वाघीत माणसे आहेत.एस.टी. महामंडळात माणसे आहेत.वारीत माणसे आहेत.संतांच्या सहवासातील माणसे आहेत.गोरगरीब, शेतकरी, वारकरी, मित्र, नातेवाईक, अधिकारी,आध्यात्मिक राजकीय व्यक्ती सर्व स्तरांतील माणसे त्यांना आपले मानतात.आई-बाबांच्या पुण्याईच्या या सावली मुळेच आज आम्ही तिन्ही भावंडे आपल्या क्षेत्रात उभे आहोत. आमच्या पुढच्या पिढीतील मुले शिक्षण घेत आहेत, प्रगती करत आहेत.पण या सर्वांच्या मुळाशी जाऊन पाहिले तर एकच गोष्ट दिसते व ती म्हणजे आई बाबांचे आम्हाला दिलेले संस्कार.त्यांनी आम्हाला कधीही “मोठे व्हा” एवढेच सांगितले नाही तर त्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितले,खरा “माणूस व्हा.”त्यांनी आम्हाला शिकविले,“तुमच्याकडे जे आहे त्यातील थोडे दुसऱ्याला द्या.”त्यांनी शिकविले,“कुणाचे वाईट करू नका.”आणि सर्वांत महत्त्वाचे,“कुणी तुमच्यावर उपकार केले तर लक्षात ठेवा, पण तुम्ही कुणावर उपकार केला तर विसरून जा.”
आमच्यासाठी हा अमृतमहोत्सवपूर्तीचा हा सोहळा म्हणजे कृतज्ञतेचा क्षण.आज त्यांच्या अमृतमहोत्सवपूर्तीचा सोहळा आम्ही साजरा करीत आहोत.याच निमित्ताने आई-बाबांचे पूजन आणि तुलादानाचा संकल्प आम्ही केला आहे.हा केवळ एक धार्मिक विधी नाही.ज्यांनी आयुष्यभर आम्हाला दिले, त्यांच्यासाठी आम्ही काय देणार.त्यांनी आम्हाला आयुष्य दिले.
शिक्षण दिले.संस्कार दिले.प्रेम दिले.माणुसकी दिली. आत्मविश्वास दिला.माणसांवर विश्वास ठेवायला शिकविले.आणि सर्वांत महत्त्वाचे ,देण्याचा आनंद दिला.त्यांच्या या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होऊ शकत नाही.आज या मंगल प्रसंगी माझ्या मनात एकच प्रार्थना आहे कि,
हे पांडुरंगा,ज्या आई-बाबांनी आयुष्यभर तुझी सेवा केली,ज्यांनी तुझ्या नामस्मरणातून शक्ती घेतली,ज्यांनी तुझ्या भक्तीतून माणुसकी शिकली,ज्यांनी हजारो माणसांच्या सुख-दुःखात स्वतःला झोकून दिले,त्या माझ्या आई-बाबांना तू दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य दे.
त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम ठेव.त्यांच्या पायांना अशीच वारीची ओढ दे.
त्यांच्या हातांना अशीच सेवा करण्याची शक्ती दे.त्यांच्या मनातील माणुसकीचा झरा कधीही आटू देऊ नकोस.आणि एक इच्छा माझी वैयक्तिक आहे,“पांडुरंगा, प्रत्येक जन्मी मला हेच आई-बाबा मिळू दे.”कारण या जन्मात मला जे मिळाले आहे, त्यापेक्षा मोठी संपत्ती मी कल्पनेतही मागू शकत नाही आणि ती असूही शकत नाही.
आज माझे बाबा सत्याहत्तराव्या व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या आयुष्याकडे पाहताना मला वाटते हे केवळ वर्षांचे आयुष्य नाही तर उत्सव आहे आणि माझी आई, तिने बाबांच्या प्रत्येक पावलामागे शांतपणे उभे राहून या जीवनप्रवासाला दिशा दिली, अर्थ दिला आहे.म्हणूनच माझ्या दृष्टीने माझे आई बाबा हे विठ्ठल-रुक्मिणीची चालती-बोलती जोडी आहेत.आई-बाबा, तुमच्या आयुष्याची सावली आमच्या डोक्यावर अशीच राहू दे. तुमचे आशीर्वाद आमच्या पुढच्या पिढ्यांना लाभू देत. तुमचे प्रेम आमच्या घरात अखंड वाहत राहू दे.तुम्ही शतायुषी व्हा, निरोगी व्हा,आनंदी व्हा आणि पांडुरंगाच्या चरणी तुमची भक्ती अशीच अखंड राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
आई-बाबांना अमृत महोत्सवपूर्तीच्या आणि 77 व्या वर्षातील पदार्पणाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा!
आपला पुत्र ,
डॉ. विजय नागोराव भोसले,
रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड .
मो क्रमांक 9403067252
