एम सी आर
Uncategorized

शब्दांच्या उत्सवात न्हालेला अविस्मरणीय सोहळा “शब्द शब्द तुझाच आहे” कविता संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन.

नांदेड:

नांदेडच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात रविवार दि 7 जून रोजी एक संस्मरणीय कार्यक्रम अनुभवायला मिळाला. कवी, आणि जीएसटी चे प्रशासकीय अधिकारी श्री. निलेश शेवाळकर लिखित “शब्द शब्द तुझाच आहे” या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याने साहित्यप्रेमी, रसिक, अधिकारी, मित्रपरिवार आणि मान्यवरांची मने जिंकली. शब्द, भावना, संस्कार, मैत्री आणि साहित्य यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला . हा सुंदर सोहळा सायन्स कॉलेज, नांदेड येथील स्व. पूर्णमलजी लाहोटी सभागृहात आयोजित केला होता. सभागृहातील आकर्षक सजावट, नियोजनातील नेटकेपणा ,बारकावे आणि उपस्थितांचे आत्मीयतेने करण्यात आलेले स्वागत यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, साहित्यिक, लेखक आणि व्याख्याते श्री इंद्रजित भालेराव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चांगले वक्ते, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले नांदेडचे उपक्रमशील जिल्हाधिकारी श्री राहुल जी कर्डिले, निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरक उपस्थित होते.

प्रास्ताविकात श्री. निलेश शेवाळकर यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव, साहित्याशी जुळलेले नाते आणि कवितेच्या निर्मितीमागील भावविश्व अत्यंत आत्मीयतेने उलगडून सांगितले तसेच शीर्षकातील ‘तु’ झाच चा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला व पुस्तक प्रक्रियेतील सहभागी सर्व मित्र, नातेवाईक यांचे आभार मानले. त्यानंतर ग्रंथाली प्रकाशनाच्या श्री सुदेश हिंगलासपूरकर यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश टाकला व ग्रंथाली प्रकाशाच्या वाटचालीबद्दल उपस्थित त्यांना माहिती दिली.

गड किल्ल्याचे अभ्यासक व संवर्धक असलेले व फार कमी काळात अतिशय विद्यार्थी प्रिय झालेल्या ‘विद्यार्थी धर्म’ या पुस्तकाचे लेखक तथा श्री निलेश शेवाळकर यांचे मित्र नांदेडचे सहाय्यक पोलीस उपाधीक्षक श्री सूरज गुरव यांनी आपल्या अतिशय ओघवत्या भाषणात श्री निलेश शेवाळकर यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या कविता लेखनाविषयी, आई-वडिलांबद्दल असलेल्या निस्सीम सेवाभाव प्रेमाबद्दल तसेच मित्रपरिवारातील किस्से सांगत कार्यक्रमाला रंगत आणली.

आपल्या उद्घाटकीय भाषणात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी कवीचे अभिनंदन करत वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “चांगला वाचकच चांगला लेखक, चांगला वक्ता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगला माणूस होऊ शकतो,” हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला.

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून कवितेची निर्मिती प्रक्रिया, शब्दांचे सामर्थ्य आणि भाव यांचा वेध घेतला.दीर्घ कविता, चारोळी यातील फरक सांगुन श्री. शेवाळकर यांचे
गड-किल्ल्यांविषयीचे प्रेम आणि संवर्धनासाठीचे कार्य यांचे विशेष कौतुक केले. साहित्याचा सखोल अभ्यास असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे हे भाषण रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरले. यावेळी त्यांनी काही मुखोद्गत कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख डॉ रामकृष्ण सोळुंके यांनी श्री निलेश शेवाळकर यांचे कौतुक करून चारोळी या काव्यप्रकाराविषयी भाष्य केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

निवृत्त न्यायमूर्ती सुनील वेदपाठक यांनी आपल्या हजरजबाबी आणि मिश्किल शैलीत उपस्थितांना खळखळून हसवले. स्वतः उत्तम लेखक आणि चित्रकार असलेल्या वेदपाठक यांनी साहित्य आणि जीवनातील अनुभवांचे सुंदर मिश्रण आपल्या भाषणातून सादर केले. क्रिकेटमधील टेस्ट मॅच ते ट्वेन्टी ट्वेन्टी मॅच त्यांनी कविता व चारोळीची तुलना करत त्यांनी दोन्हीचे महत्व सांगितले. तसेच श्री सूरज गुरव व कवी श्री नीलेश शेवाळकर यांचे अभिनंदन करत भावी साहित्य लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण,ओजस्वी शैलीत अणि बहारदार अशा अध्यक्षीय भाषणात श्री इंद्रजित भालेराव यांनी कवितेचा ऐतिहासिक प्रवास उलगडून सांगितला. चारोळी हा काव्यप्रकार नवा नसून संत साहित्य, महाभारत आणि लोकपरंपरेत त्याची बीजे आढळतात, हे त्यांनी प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांतील तत्त्वज्ञानाचा वेध घेत त्यांनी मराठी साहित्याची समृद्ध परंपरा रसिकांसमोर जिवंत केली तसेच श्री शेवाळकर यांनी पहिली कविता आईवर लिहिली असून त्यांनी स्त्रीप्रधान लेखन केले आहे तसेच पुस्तकाचा समारोप ही आई संबंधित कविता करूनच केला याचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये संपूर्ण पुस्तकाचा सार उलगडण्याचा प्रयत्न केला. श्री. निलेश शेवाळकर यांच्याविषयी बोलताना भालेराव यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशीलता, अभ्यासू वृत्ती, वाचनाची ओढ आणि आई-वडिलांप्रती असलेली निष्ठा यांचा उल्लेख केला. “निलेशचा प्राथमिक शिक्षकापासून जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी होईपर्यंतचा प्रवास मी जवळून पाहिला आहे,” असे सांगत त्यांनी अनेक भावस्पर्शी आठवणी उपस्थितांसमोर उलगडल्या. त्यांच्या भाषणाने सभागृहातील प्रत्येकजण भारावून गेला.

कार्यक्रमाचे अतिशय नेटक आणि प्रभावी निवेदन श्रीमती मृण्मयी भजक यांनी केले. त्यांच्या मुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. आभारप्रदर्शन श्री धनंजय पांडे यांनी समर्पक शब्दांत केले.
“शब्द शब्द तुझाच आहे” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा हा केवळ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नव्हता तर तो साहित्यप्रेम, मैत्री, संस्कार, कुटुंबमूल्ये आणि शब्दांच्या सामर्थ्याचा उत्सव होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि शब्दांच्या वैभवाचा प्रत्यय देणारा हा अविस्मरणीय सोहळा ठरला. याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक नदिष्ट कार श्री मनोज बोरगावकर तसेच पुस्तक निर्मिती व प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण योगदान बद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या शानदार सोहळ्यास उपस्थितांमध्ये त्यांचे भाग्यवान आई-वडील ,नदिष्ट कार श्री मनोज बोरगावकर श्री वसंत मैया,तेहरा मॅडम,जोगदंड मॅडम,सौ शेवाळकर मॅडम, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लक्ष्मण शिंदे,श्री भार्गव राजे, डॉ केदार सोळुंके,, डॉ विजय भोसले, डॉ गणपत डक तसेच नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी,महाराष्ट्रातील विविध विभागांतील २० ते २५ वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. उपस्थित होते. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

डॉ. विजय नागोराव भोसले,
रसायनशास्त्र विभाग,
यशवंत महाविद्यालय,नांदेड .
मोबाईल क्र 9403067252

Share

Related posts

लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६ : आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

Chief Editor

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात मॉडेल सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

व्यायाम करणे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एक महत्त्वाचा उपाय आहे.:मीरा धुंळगुडे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाचा मान उंचावला; डॉ. सिंकू कुमार सिंग एआययूमध्ये जॉईंट सेक्रेटरी

Chief Editor

Leave a Comment