नांदेडात २१ रोजी ‘रिंगण’ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन* संत शिरोमणी सेना महाराजांच्या जीवनपटावर मान्यवरांचे भाष्य

*नांदेड*- गत १३ वर्षांपासून वारकरी सांप्रदायाचा वारसा ‘रिंगण’च्या माध्यमातून समृद्ध केला जात आहे. यंदा संत शिरोमणी सेना महाराज यांच्यावर अधारीत विशेषांकावर भाष्य करण्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा २१ जुलै रोजी नियोजन भवनात सायंकाळी ६ वाजता पार पडणार असल्याची माहिती आयोजक विठ्ठल पावडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संत बाब बलविंदरसिंघजी, ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, विशेष अतिथी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, रिंगणचे संपादक सचिन परब, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, निवृत्त सनदी अधिकारी एकनाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यापूर्वी संत नामदेव, चोखोबा, जनाबाई, निवृत्तीनाथ, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सावता माळी, सोपानदेव, नरहरी सोनार, मुक्ताबाई, परीसा भागवत, चांगदेव, महात्मा बसवेश्वर या विभूतींचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. यंदा संत शिरोमणी सेना महाराज यांच्या कार्यावर ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख, सचिन परब यांच्यासह उपस्थित मान्यवर विचारपुष्प गुंफणार आहेत. नांदेडकरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.