ताज्या घडामोडी

कथाकार भारत दाढेल यांच्या ‘किस्ना’ कथासंग्रहाला मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार घोषित

नांदेड | प्रतिनिधी
लोकमत नांदेडचे वरिष्ठ उपसंपादक तसेच कथाकार भारत दाढेल यांच्या ‘किस्ना’ या कथासंग्रहाला मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. नायगाव (जि. नांदेड) येथील मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार यंदाच्या वर्षी सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

साहित्यिक भारत दाढेल यांचा ‘किस्ना’ हा कथासंग्रह इसाप प्रकाशन, नांदेड यांच्यामार्फत प्रकाशित झाला असून, यंदाच्या पुरस्कारासाठी या ग्रंथाची निवड करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक कौतिक कोळी तसेच अक्षर गणगोतचे संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखालील परीक्षण समितीने हा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे.

पुरस्कार संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी या पुरस्काराची घोषणा मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या पुण्यस्मरण दिनी नायगाव येथे केली. लवकरच नायगाव येथे नांदेडचे खासदार मा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

‘किस्ना’ या कथासंग्रहाला याआधीही अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मराठी वाङ्मय परिषद बडोदा आयोजित अखिल भारतीय कथासंग्रह स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून, उज्वल प्रतिष्ठान कंधारतर्फे देण्यात येणारा उज्वल साहित्यरत्न पुरस्कार आणि डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मुक्ता साळवे राज्यस्तरीय लक्षवेधी साहित्य पुरस्कारदेखील या संग्रहाला प्राप्त झाला आहे.

भारत दाढेल हे गेली दोन दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विविध राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. लेखनासोबतच ते एक कुशल चित्रकारही असून, अनेक ग्रंथांची मुखपृष्ठे व अंतर्गत रेखाचित्रे त्यांनी साकारली आहेत.

या पुरस्काराबद्दल डॉ. जगदीश कदम, सुरेश सावंत, देविदास फुलारी, व्यंकटेश चौधरी, शिवा कांबळे, डॉ. अनंत राऊत, प्राचार्य माधव बसवंते, डॉ. राम वाघमारे, डॉ. भगवान सूर्यवंशी, रेणुका गुप्ता, प्रशांत कराळे, प्रा. डॉ. विजया उफाडे, अँड. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, श्रीनिवास भोसले, अविनाश चमकुरे, शिवराज बिचेवार, सचिन मोहिते, प्रा. डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, प्रा. शरद वाघमारे, डॉ. मारुती कसाब, कॉ. उज्वला पडलवार, अशोक उपाडे, सुनील लोंढे, अँड. अशोक गालफाडे, प्राचार्य किशन डहाळे, डॉ. अजय गव्हाणे यांच्यासह अनेकांनी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.