नेसुबो’उर्दू विभाग प्रमुख प्रा. डॉ. इर्शाद अहमद खान यांच्या तीन संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन संपन्न…

नांदेड- येथील अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील उर्दू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. ईशाद अहमद खान यांच्या असनाफ -ए- उर्दू अदब, निगारी शात-ए- उर्दू अदब भाग -३ व भाग-४ या तीन संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन हे प्रा. डॉ. मजीद बेदार, माजी उर्दू विभाग प्रमुख उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित पाहुण्यांमध्ये प्रा. डॉ. सय्यद सुजात अली, मा. प्राचार्य एच.जे. थीम कॉलेज जळगाव, प्रा. डॉ. सज्जाद अहमद खान, माजी उर्दू विभाग प्रमुख नेसुबोस महाविद्यालय नांदेड, डॉ.काझी नवीद अहमद सिद्दीकी, उर्दू विभाग प्रमुख आझाद महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, डॉ. मोहम्मद अनवरउद्दीन , उर्दू विभाग प्रमुख शासकीय महिला महाविद्यालय हैदराबाद, तसेच प्रा.डॉ. सय्यद नुरूल अमीन, उर्दू विभाग, शारदा महाविद्यालय परभणी हे उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.एम वाय कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रा. डॉ. एम. वाय. कुलकर्णी म्हणाले की, आमच्या महाविद्यालयासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे की, उर्दू विषयातील एक अभ्यासू व तज्ञ प्राध्यापक म्हणून प्रा. डॉ. ईशाद अहमद खान ओळखली जातात. त्याचबरोबर त्यांची एकूण उर्दू विषयातील संदर्भ ग्रंथ म्हणून दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून अतिशय सोप्या भाषेमध्ये उर्दूचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पुस्तक उपलब्ध करून दिली आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रा. डॉ. इर्शाद अहमद खान यांच्या कार्याचा व त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले. तसेच या पुस्तकांची सेट नेट व स्पर्धात्मक परीक्षेकरिता असणारी उपयोगिता याबद्दल उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उर्दू विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सय्यद नुरूल अमीन यांनी तर आभार महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जीवन मसुरे यांनी मांडले.