राज्य माहिती आयुक्त (खंडपीठ) छत्रपती संभाजीनगर पदावर मकरंद रानडे रुजू

छत्रपती संभाजीनगर दि.13 (जिमाका) :- मकरंद रानडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे राज्य माहिती आयुक्त पदी निवड झाली आहे. रानडे यांचा दि. 7 मार्च 2024 रोजी मंत्रालय 6 वा मजला मुंबई येथे शपथविधी झाला. दि. 11 मार्च रोजी राज्य माहिती आयुक्त छत्रपती संभाजी नगर खंडपीठ येथे पदभार स्वीकाराला. रानडे यांची 27 फेब्रुवारीच्या शासन आदेशाप्रमाणे राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
रानडे हे मुळचे छत्रपती संभाजीनगरचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण शिवाजी हायस्कुल गुलमंडी येथे झाले आहे . महाविद्यालयीन शिक्षण कला व वाणिज्य सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगपुरा येथे पूर्ण केले. तसेच मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एम. कॉमची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून 1986 साली झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 7 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1988 मध्ये पोलीस उपअधिक्षक नियुक्ती पदी निवड झाली. पोलीस अॅकडमी नाशिक येथे 1789 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. 31 मार्च 2022 रोजी पोलीस महानिरिक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून सेवानिवृत्त झाले होते.
औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत आठ जिल्हे येतात त्यात औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), त्यात जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव यांचा समावेश आहे.आगामी काळात जास्तीत जास्त माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत लोकाभिमुख कामकाज करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. विविध प्रकरणावरील सुनावणी प्रलंबित न राहता नागरिकांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले.
*****