विचारांवर आधारित मतदान झाल्यास संसदीय लोकशाही यशस्वी-प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

नांदेड:(दि.३१ जानेवारी २०२३)
मतदारांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये, सर्वेक्षणामध्ये, राज्य सरकार व केंद्र सरकारद्वारे मागविलेल्या प्रतिसादाकरिता आपले मत नोंदविणे आवश्यक आहे. आर्थिक सर्वेक्षणातही मतदान अवश्य करावे तसेच मतदारांनी राजकीय पक्षाचा जाहीरनामा पाहून मतदान करावे. भारताची प्रगती ही मतदानाद्वारे केलेल्या सक्रिय सहभागावर आधारित आहे. विचारांवर आधारित मतदान झाल्यास संसदीय लोकशाही यशस्वी होईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दि.२५ जानेवारी रोजी आयोजित व्याख्यानात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.
प्रमुख वक्ते शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव (बा.) येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बलभीम वाघमारे म्हणाले की,जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारत आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट संविधान भारताचे आहे. लोकशाहीमध्ये राजा हा मतपेटीतून जन्माला येतो. मतदारांमध्ये जागृती असल्यासच लोकशाहीची यशस्वीता शक्य आहे. जातिवाद, भाषावाद, प्रांतवाद लोकशाहीसाठी घातक असून लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गांचा जनतेने स्वीकार करावा.
याप्रसंगी विचार मंचावर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.वीरभद्र स्वामी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले, डॉ.दिगंबर भोसले,डॉ.मीरा फड यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ.बालाजी भोसले यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शासनाद्वारे निर्गमित शपथ उपस्थितांना दिली. यावेळी श्रीकांत गायकवाड या विद्यार्थ्यांद्वारे लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील भितीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ.अजय गव्हाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अस्मिता खंदारे आणि आभार कु.सुनीता निखाते यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
—