एम सी आर
Uncategorized

फोंडाघाट: एमसीआर न्यूज नेटवर्क

मराठी भाषा संवर्धन पंधराव्यानिमित्त फोंडाघाट महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात सौ. आर्या भोगले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन या वेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी प्रभावी प्रास्ताविक केले. त्यांनी मराठी भाषेची ऐतिहासिक परंपरा, तिची सांस्कृतिक महती आणि समृद्ध वारसा यांचा उल्लेख करताना मराठी भाषेचा प्रचार–प्रसार करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व समाज यांनी कोणकोणत्या भूमिका बजावल्या पाहिजेत, याबाबत सूचक मांडणी केली. मराठी भाषेचा इतिहास अत्यंत थोर असून तो जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. मराठी भाषेची कीर्ती अधिकाधिक वाढवण्यासाठी मराठी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ. आर्या भोगले यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी प्राचार्यांचे स्वागत केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सौ. आर्या भोगले यांनी मराठी भाषा संवर्धन ही काळाची गरज असल्याचे ठामपणे सांगितले. जागतिक स्तरावर मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून प्रत्येक मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान असायलाच हवा, असे त्या म्हणाल्या. दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्यामुळे आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. इतर भाषांचा सन्मान राखत असतानाच मराठी भाषा अधिक समृद्ध करणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात मराठीतून संवाद साधावा, मराठी साहित्य वाचनाची सवय वाढवावी आणि बोली भाषेत बोलण्याची कोणतीही लाज बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. बोलीभाषांनाही तितकाच दर्जा मिळायला हवा. भाषा ही विचारांची देवाणघेवाण करणारे प्रभावी माध्यम असून ती आपल्या संस्कारांवर प्रभाव टाकते. भाषा टिकवणे, जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपल्या हातात आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पुरंदर नारे म्हणाले की, भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाची सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक स्मृती आणि वैचारिक परंपरा जतन करणारे प्रभावी माध्यम आहे. भारतीय भाषांच्या परंपरेत मराठी भाषेला अत्यंत मानाचे स्थान लाभले आहे. तिची प्राचीनता, समृद्ध साहित्यपरंपरा, स्वतंत्र भाषिक रचना आणि सामाजिक-सांस्कृतिक योगदान यांमुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी कु. नीता धुरी या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जगदीश राणे यांनी अत्यंत संयत व प्रभावीपणे केले. सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, जागरूकता आणि संवर्धनाची प्रेरणा निर्माण होण्यास मदत झाली.

Share

Related posts

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट अक्षय बागल यांची सीआयएसएफ मध्ये निवड

Chief Editor

तांत्रिक कौशल्य ही काळाची गरज – डॉ. सचिन नरंगले

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन

Chief Editor

नांदेड महापौर चषक स्पर्धांचे आयोजन व क्रीडा शिष्यवृत्ती योजनेसाठी महापौरांना निवेदन

Chief Editor

सब-ज्युनिअर राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी महाराष्ट्र संघाचा ओव्हरऑल चॅम्पियनशिपवर कब्जा

Chief Editor

शब्दांच्या उत्सवात न्हालेला अविस्मरणीय सोहळा “शब्द शब्द तुझाच आहे” कविता संग्रहाचे दिमाखदार प्रकाशन.

Chief Editor

Leave a Comment