https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला पावसाळा..”.एक आनंददायी ऋतू”‘:.लैलेशा भुरे

*पावसाळा…एक आनंददायी ऋतू*
**************************
पावसाळा म्हटला की अलौकिक सौंदर्य आणि आनंदाचा झरा.पावसाळा बहुतेक सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे.सर्व सृष्टी पावसाळ्यात आनंदाने न्हाऊन निघते.माणसाच्या मनाचेही तसेच आहे.हा आल्हाददायक ऋतू आला की निसर्गावर हिरवी चादर पसरते.उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा संपून पावसाळा सर्वांच्या जीवनात उत्साह आणि आशा घेऊन येतो.लहान मुलांच्या उत्साहात तर अगदी उधाण येते.पाण्यात कागदी नाव करून सोडणे, मनसोक्त पावसात भिजणे हा लहान मुलांचा आवडता छंद असतो.
एकीकडे पावसाळा आनंद घेऊन येतो, तर दुसरीकडे काही ठिकाणी भयंकर पूर येतात.त्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती असते.आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे.
त्यामुळे शेतकरी प्रामुख्याने पावसाच्या आगमनाच्या प्रतिक्षेत असतात.भारतात पावसाची सुरूवात जून पासून होते आणि सप्टेंबरपर्यंत हा पाऊस सर्वांना शीतलता देतो.पावसाळ्यात नद्या,नाले,तलाव भरून वाहतात.उंच डोंगरांवर धबधबे तयार होतात.कधीकधी अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे फार मोठे नुकसान होते.काही लोकांची घरेही वाहून जातात.पावसाळा आला की सण आणि उत्सव सुरू होतात.नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे अनेक सण पावसाळा आपल्यासोबत घेऊन येतो.त्यामुळे पावसाळ्यात एक प्रकारचा उत्साह सर्वांमध्ये पाहायला मिळतो.मात्र वाढत्या प्रदूषणामुळे प्रकृतीचे संतुलन बिघडते आहे.त्यामुळे आपण निसर्गाला जपणे खूप गरजेचे झाले आहे.
पावसाळ्यात झाडेवेली फारच मोहक दिसतात.सर्व झाडेवेली पक्ष्यांच्या चिवचिवाटाने जिवंत होतात.कोकीळेचा कहूकुहू आवाज, भुंग्याचे आवाज,बेडकाचे टर्र-टर्र ऐकू येत असते.कधी ढगांचा गडगडाट आपल्याला घाबरेघुबरेही करतो.ढगांची गर्जना तोफेच्या आवाजासारखी भासते.माळरानात पाऊस कोसळताना त्याचा होणारा विशिष्ट आवाज आणि मातीशी होणारी भेट आनंद देऊन जाते.पाऊस चराचर आपल्या सरींनी धुवून काढतो.छतावर जेव्हा टपटप पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा आवाज होतो, त्यावेळी एक लयबद्ध संगीत उमटतं.अशा वेळी कुणी आवाज दिला तरी या टपटपणा-या थेंबांतून तंद्रीभंग होत नाही.ही खरं तर पावसाची किमया आहे.पाऊस पडून गेला की रस्त्यावरून छोट्या-छोट्या वाटांतून तो चालू लागतो.त्यावेळी संथ,शांत होणारा पावसाचा आवाज मनाला शांतता देतो.दूर डोंगरावरून अखंडपणे पडणा-या पांढ-याशुभ्र झ-याचा आवाज गोड भासतो.डबक्यात साचलेल्या पाण्यात एक छोटा दगड टाकल्यावर होणारा ‘टुबुक’ आवाजही किती सुंदर संगीत आहे.
प्रेमीजनांना तर पाऊस खूपच खास वाटतो.त्या पावसात झालेली भेट आणि हृदयामध्ये चालू असलेला ठोक्यांचा आवाज त्यावेळी सुंदर प्रेमसंगीत निर्माण करतो.पावसाच्या आगमनाने धरती आणि आकाश आनंदाने फुलून जाते.ग्रामीण भागात झाडांना झोके बांधण्यात येतात.त्यावर झोके घेत गाणी म्हणणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो.या ऋतूचे स्वरूप खूपच मोहक आहे.म्हणूनच वर्षा ऋतूला ऋतूंची राणी म्हटले जाते.निसर्गाच्या हिरवळीचे श्रेय वर्षाऋतूला जाते.पाऊस सा-या विश्वाला मिळालेले वरदान आहे.पाणी म्हणजे जीवन असे आपण म्हणतो ते काही उगाच नाही.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704