कॅम्पस फिल्म क्लबतर्फे माध्यमशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभिजात चित्रपटाचे प्रदर्शन
नांदेड प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातील कॅम्पस फिल्म क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विल्यम वायलर दिग्दर्शित जागतिक कीर्तीचा अभिजात चित्रपट ‘रोमन हॉलिडे’ (1953) हा नुकताच दाखविण्यात आला.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी या चित्रपटाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन प्रदर्शनानंतर माध्यमनीती आणि व्यक्तीच्या खासगीपणाच्या अधिकाराच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. चित्रपटातील अमेरिकन पत्रकार जो ब्रॅडली याला राजकुमारी ॲनची खरी ओळख समजल्यानंतर तिच्यासोबत घालवलेल्या एका दिवसाची सनसनाटी बातमी करण्याची मोठी संधी मिळते. या बातमीमुळे त्याला व्यावसायिक लाभ आणि पत्रकार म्हणून प्रसिद्धी मिळू शकते. मात्र तिच्या खासगी आयुष्याशी जोडलेल्या अनुभवांचा व्यावसायिक वापर करायचा की तिच्या गोपनीयतेचा सन्मान करायचा, असा नैतिक पेच त्याच्यासमोर निर्माण होतो.
‘रोमन हॉलिडे’ ही केवळ प्रेमकथा नसून व्यक्तिस्वातंत्र्य, प्रेम आणि जबाबदारी यांच्यातील नात्याचा संवेदनशील वेध घेणारी कथा आहे. राजघराण्याच्या बंधनातून एका दिवसासाठी मुक्त झालेल्या ॲनचा प्रवास हा केवळ रोम शहरातील भटकंती न राहता स्वतःच्या अस्तित्वाचा आणि स्वातंत्र्याचा शोध बनतो. प्रेमाची जाणीव झाल्यानंतरही व्यक्तिगत इच्छेपेक्षा जबाबदारीची निवड करण्याचा तिचा निर्णय चित्रपटाला अधिक प्रगल्भ आशय प्राप्त करून देतो.
याच संदर्भातून विद्यार्थ्यांशी ‘एखादी माहिती प्रसिद्ध करण्याचा अधिकार पत्रकाराकडे आहे म्हणून ती प्रसिद्ध करणे नेहमीच योग्य ठरते का?’, ‘व्यक्तीचा गोपनीयतेचा अधिकार आणि माध्यमांचे स्वातंत्र्य यांची सीमा कुठे असावी?’ अशा पत्रकारितेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर संवाद साधण्यात आला.
चित्रपटातील पत्रकार जो ब्रॅडली आणि छायाचित्रकार इर्विंग यांच्या भूमिकांच्या माध्यमातून स्कूप, एक्सक्लुझिव्ह स्टोरी, छायाचित्रांचा वापर, स्रोताशी निर्माण होणारे व्यक्तिगत संबंध आणि पत्रकाराची व्यावसायिक नैतिकता यांसारख्या मुद्द्यांकडेही डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. जवळपास सात दशकांपूर्वीचा हा चित्रपट आजच्या सोशल मीडिया, पापाराझी संस्कृती आणि वेगवान डिजिटल पत्रकारितेच्या काळातही माध्यमनीतीविषयक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो, यावर चर्चा झाली.
माध्यमशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये जागतिक चित्रपटांविषयी अभिरुची निर्माण करणे तसेच चित्रपटांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता समाज आणि मानवी मूल्यांच्या चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी विकसित करणे, हा कॅम्पस फिल्म क्लबच्या उपक्रमामागील उद्देश आहे.
यावेळी माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सुहास पाठक, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. सचिन नरंगले, कवयित्री सारिका उबाळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
—————–