https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आंदोलन यशस्वी पार पाडले म्हणजे हे यश नव्हे ! जी.संदीप(गोणार,नांदेड)

मागील काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आपण दिनांक 06 ऑक्टोबर रोजी चा मोर्चा यशस्वी केला. त्याबद्दल सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन. या मोर्चासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप साऱ्या व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी, संघटनांनी मोलाचा संघर्ष केला. या संघर्षातून हा मोर्चा यशस्वी झाला. या मोर्चासाठी कोणत्याही एका व्यक्तीचं योगदान नक्कीच नाही, हे प्रत्येकजण जाणतोच त्यामुळं आपण जो संघर्ष करून लढा दिला आहे त्या लढयाच फलित आपणास मिळाले आहे का ? याचा विचार होणे आता गरजेचे आहे. कोणतेही आंदोलन करत असताना ते तीन मार्गातून जात असते. त्यात पाहिले आंदोलन पूर्व तयारी दुसरा टप्पा प्रत्यक्ष आंदोलन आणि तिसरा टप्पा आंदोलनोत्तर साध्य.
या काही दिवसातील आंदोलनांची स्थिती पाहता विद्यार्थी मित्रांकडून दोन आंदोलने झाली या आंदोलनात पाहिले दोन टप्पे यशस्वी रित्या पार पाडले गेले पण तिसऱ्या टप्प्याबदल आपण अनभिज्ञ आहोत. काहीजण तिसऱ्या टप्प्याबद्दल ज्ञात असतील सुद्धा पण त्यावर काय कार्यवाही करायची आणि कशी करायची हे विचार करण्यात ते मागेच राहून जाईल. असे जर घडले तर अशा छोट्या छोट्या आंदोलनातून नवीन विद्यार्थी नेते तयार होत जातील जे विद्यार्थी नेते पुढं येतील त्यांना एखाद्या राजकीय पक्षाकडून डिमांड दिली जाईल. ते विद्यार्थी नेते गरजेनुसार स्वतः च अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करतील जेव्हा स्वतः च अस्तिस्त्व निर्माण होण्यास वाव नाही असे दिसेल तेव्हा मात्र अशा छोट्या आंदोलनातून तयार झालेला विद्यार्थी नेता राजकीय पक्षाच्या गळाला अडकेल आणि तुमच्या हक्क अधिकारासाठी लढणे त्याचे कायमचे बंद होईल. राजकीय पक्ष जसा सांगेल त्याला त्या पद्धतीने वागावे लागेल. त्या पक्षाने घेतलेला निर्णय कसा योग्य आणि हितावह आहे हेच विद्यार्थ्यांना समजून सांगेल. असे होऊ द्यायचे नसेल तर तिसऱ्या टप्प्याकडे आपण सर्व विद्यार्थ्यांनी आणि आंदोलनात आपली बरीचशी वर्ष घालवलेल्या मित्रांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
तिसऱ्या टप्प्याचा विचार करताना आपण जे आंदोलन करत आहोत ते आंदोलन न्याय्य आहे का ? ते आंदोलन कशासाठी करत आहोत ? आंदोलन करण्याचा मार्ग कोणता आहे ? आंदोलन गैरसंविधनिक तर नाही ना ? या सर्व मुद्द्यांचा विचार करून आपल्याला आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. अन्यथा आपले श्रम मातीमोल ठरतील यात काही शंका नाही. आंदोलनात आपण जो मार्ग वापरणार आहोत या मार्गावरूनच आंदोलनोत्तर टप्पा आपल्याला निश्चित करता येतो.
आंदोलनाबाबत भूमिका समजून घेत असताना काही मत मतांतरे आहेत त्यात, आंदोलन करणे म्हणजे आम्ही जिवंत असल्यालाचा तो पुरावा आहे, शासनाच्या निर्णयाविरुद्ध आम्ही आंदोलन केलेच नाही तर मग शासन आमच्यावर हवे ते निर्णय लादत जाईल. असा विचार असलेला खूप मोठा वर्ग इथ आहे. असा विचार करणाऱ्या व्यक्तींमुळे आणि त्यांच्या विचारातून आंदोलने जन्म घेतात. अशा आंदोलनामुळे आवश्यक ते यश प्राप्त होत नाही. मग यातून आंदोलनात सहभागी होण्याचं प्रमाण कमी होत जात. मागील काही आंदोलने जी झाली त्या आंदोलनात सहभागी व्यक्तींचा विचार करता सर्व आंदोलक हे नवीन जोश आणि अपेक्षा घेऊन रस्त्यावर उतरले होते. 06 ऑक्टोबर चे आंदोलन होण्यापूर्वी सुद्धा खाजगीकरणाच्या विरुद्ध आंदोलन झाले होते. त्या आंदोलनात किती आंदोलक सहभागी होते हे यातील काही मित्रांना माहीतच असेल. मग असे जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी फक्त आंदोलने होत असतील आणि उद्दिष्ट साध्य होण्यासाठी त्याचा काही संबंध नसेल, आम्ही पण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी च आंदोलन होत असतील तर त्या आंदोलनाचा सामान्य आंदोलकांना काय उपयोग ? सामान्य आंदोलक हा त्या आंदोलनातून ज्या मागण्या घेऊन पुढे येत असतो त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत एवढी प्रामाणिक अपेक्षा घेऊन ते सहभागी होत असतात. पण त्या मागण्यांच काय होते हे त्या सामान्य अंदोलकाला समजतच नाही. तो आंदोलक आंदोलनात मी सहभागी होतो या आनंदात सोशल मीडियावर अपडेट देऊन मोकळा होतो. पण त्या मागण्यांचे काय झाले हा विचार सोडून देऊन त्या अन्यायी नियमाचा अंमल स्वतःवर करून घेऊन शासनाचा गुलाम होऊन वागायला लागतो. शासनाचा नियम स्वीकारायचं च आहे तर मग हे आंदोलनाचा मार्ग स्वीकारून स्वतः चा वेळ वाया घालवण्यात तरी काय अर्थ ? राज्यभर लागू होणारा कायदा तुमच्या एका छोट्याशा आंदोलनाने बदलायला सत्तेत बसलेले काय मूर्ख आहेत काय ?
ही सर्व स्थिती पाहता मग आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात नेमक असावं तरी काय ? असा प्रश्न जर तुमच्या मनाला पडला असेल तर खरच तुम्ही आंदोलन करण्यास आवश्यक ती मानसिकता घेऊन वावरत आहात हे यातून निष्पन्न होते. पण जर हा प्रश्न मनाला पडला नसेल तर मग मात्र तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी सोबत जाण्यासाठी म्हणून त्या आंदोलनात सहभागी होत असता. असं कोणाच्या तरी आवाहनावरून जर तुम्ही आंदोलनात जाल तर त्यातील तुमची उपस्थिती म्हणजे फक्त एक डोकं वाढल एवढीच राहील बाकी काहीच नाही.
आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात काय असावे याचा विचार करत असताना, आंदोलनाचा उद्देश काय आहे ? आणि आंदोलनाचा मार्ग कोणता आहे यावरून तिसरा टप्पा ठरवता येतो. उदाहरणार्थ आंदोलन खाजगीकरनाच्या विरोधात असेल तर हे खाजगीकरण शासन करू शकते का ? त्याला कोणता विशेष अधिकार आहे ? ते कोणत्या परिस्थितीत असा निर्णय घेऊ शकतात ? या प्रश्नांची उत्तरे शोधून जर ती उत्तरे सामान्य नागरिकांच्या बाजून येत असतील तर मात्र आंदोलनाचा मार्ग मोकळा होतो. आंदोलन संविधानिक मार्गाने केलं पण त्या आंदोलनाची सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. तर मग ते आंदोलन तीव्र करावे लागेल. आंदोलन तीव्र करून सुद्धा शासन दखल घेत नसेल तर न्यायिक मार्गाचा वापर करून आपली मागणी कशी रास्त आहे हे न्यायालयात आपल्याला पटवून द्यावं लागेल. एवढे सारे प्रयत्न आपण कराल तरच हे खाजगीकरणाच भूत आपल्या मानगुटीवर बसणार नाही. अन्यथा हे खाजगीकरणाचं भूत आपल्या मानगुटीवरून उतरणार नाही एवढं मात्र नक्की. मग सरकार कोणतेही आले तरी त्यात काही बदल होणार नाही. कारण बघा ना, जे सरकार एस. टि. कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करत होते तेच सरकार आता सत्तेत असून सुद्धा त्यांच्या त्या मागण्या मान्य करत नाही. म्हणजे विरोधक हे विरोधातून सत्तेत गेले की त्यांना सुद्धा तीच बाब योग्य वाटते जी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी अवलंबली होती.
अशा स्थितीत एखाद आंदोलन करून आपण त्याचा सोशल मीडियावर बाऊ करतो. हे आंदोलन केलं ते आंदोलन केलं म्हणून आपण मिरवत बसतो पण त्या आंदोलनातून आवश्यक ते ध्येय साध्य झाल का ? हेच पहायला विसरतो. मग आपण जर एक दिवसाचे आंदोलन करून आपण आपल्यात गुंग राहणार असू तर मग अशा आंदोलनाचा फायदा काय होईल ? आपल्याला आवश्यक असलेलं बदल शासन करेल का ? आपल्याला आवश्यक ते बदल शासन करणार नसेल तर मग त्यांचे निर्णय गप्प गुमाण आपल्याला स्वीकारायचे असतील तर मग हे आंदोलनाचे पाऊल उचलायचे तरी का ? यातून काय साध्य करण्याचा आपला विचार असतो ? या सगळ्या प्रश्नाचा विचार सर्व मित्रांनी करणे गरजेचे आहे. कारण एखाद्या आंदोलनातून काही गैर घडले आणि त्यातून सहभागी आंदोलकांवर जर गुन्हे नोंद झाले तर त्या गुन्ह्याची दखल कोण घेणार आहे ?
06 तारखेचे जे आंदोलन झाले त्या आंदोलनातून काय साध्य होईल हे आपल्या सर्वांसमोर आहे. मग या पुढील दिशा ठरवून आपल्याला मार्ग क्रमन करावे लागणार आहे. ही पुढील दिशा ठरवत असताना आपला मार्ग हा संविधानिक असणे खूप गरजेचं आहे. त्या आंदोलनासाठी आवश्यक ती प्रत्येक गोष्ट आपल्याला योग्य मार्गाने मिळवावी लागणार आहे. मागणी योग्य आहे त्यामुळं ही मागणी मान्य होईपर्यंत कोणतीच भरती केली जाणार नाही. कोणतीच खाजगीकरणाची प्रक्रिया केली जाणार नाही यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागणार आहे.
हे शासन सत्तेवर राहण्यासाठी कोणत्याही थराला गेले आहे. सगळे राजकारणी एका माळेत जाऊन बसले आहेत त्यामुळं सत्ताधाऱ्यांना विरोध करायला कोणताच विरोधक सुद्धा सक्षम नाही. त्यामुळं या निर्णयाविरुद्ध जो लढा द्यायचा आहे तो आपणालाच द्यावा लागणार आहे. हा लढा नाही दिला तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला दोष देतील वैगरे भ्रामक कल्पना जरा बाजूला ठेवूया. थोडस वेगळ्या बाजूने विचार करूया काही वर्षात तुमचे मूल जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांच्या खाजगी शाळेतील शिक्षणासाठी चा खर्च लागेल तो खर्च या खाजगीकरणाच्या रेट्यात तुम्ही कमवू शकाल का ? या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला पेटून उठून हा लढा तीव्र करावाच लागणार आहे.
हा लढा देत असताना या लढयात पुढे येणाऱ्या तरुणांनी काही नीतीनियम आणि काही बंधने पाळावे लागतील. पुढे येत असताना स्वतः च्या शिलासोबत आर्थिक सक्षम असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. जर आर्थिक सक्षम नसाल तर तुम्ही कोणत्याच अमिषाला बळी पडणार नाहीत एवढी कठोर मानसिकता तुम्हाला तुमच्यात निर्माण करावी लागेल. आपण आपल्या ठिकाणी प्रामाणिक असणे किती गरजेचं आहे आपण जर प्रामाणिक नसू तर आपण चालवत असलेल्या चळवळीची काय स्थिती होईल याबद्दल यापूर्वी एका कवितेच्या माध्यमातून ती स्थिती मांडलेली आहेच.
आंदोलनासारख्या सगळ्या गोष्टीद्वारे आपल्याला शासनावर दबाव आणायचा असेल तर त्यासाठी वेळ खर्च करण्याची कुवत आपल्याला निर्माण करावी लागेल. त्यात आंदोलनाला पुढे नेण्यासाठी जी कोणती व्यक्ती पुढाकार घेणार आहे ती व्यक्ती स्वतः साठी आर्थिक सक्षम असावी लागेल. सोबतच निरपेक्ष भाव त्या व्यक्तीत असावा लागेल.ती व्यक्ती जर आर्थिक सक्षम नसेल आणि निरपेक्ष भाव नसेल तर आंदोलन यशस्वी होण्याची अपेक्षा धूसर होईल. कारण एखाद्या मोठ्या मागणीसंदर्भात आंदोलन असेल आणि ती मागणी मान्य करायची नसेल तर आंदोलनाच्या प्रमुखाला काही अमिषे देऊन मागण्यांना बगल देऊन, मागण्या मान्य केल्याचे भासवले जाईल आणि आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले जाते. मागील काही आंदोलनाचा उपोषनांचा तुम्ही अभ्यास केलात तर त्यातून तुम्हाला ही बाब नक्कीच लक्षात येईल.
म्हणजेच आंदोलन हे होत राहतील, त्यातून कोणी मोठा होईल कोणी नष्ट होईल पण मागणी मात्र तिथेच राहील. मागणी मान्य करून घ्यायची असेल तर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले आणि ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून हुरळून जाऊ नये.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704