यशवंत महाविद्यालय रसायनशास्त्र विभागातील निवृत्त प्रा डॉ वसंत गुरव सर यांचे दि 3 ऑक्टोबर 2026 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले . त्यानिमित्ताने या एका आदर्श शिक्षकाविषयी लेख .
असे म्हणतात की,शिक्षक हा केवळ विषय शिकवणारा नसतो तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिल्पकार असतो. आपल्या ज्ञानाने, संस्कारांनी आणि व्यक्तिमत्त्वाने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळविणारा शिक्षक समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरतो. अशा ज्ञानयोगी शिक्षकांची परंपरा ज्या महाविद्यालयाला लाभलेली आहे, ते महाविद्यालय म्हणजे यशवंत महाविद्यालय, नांदेड . या महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक मिळवलेला आहे. या विभागाला अनेक विद्वान, संशोधक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक लाभले. संस्थापक प्राचार्य प्रा. गो रा म्हैसेकर, डॉ. गोस्वामी, डॉ. पाच्छापूरकर , डॉ. खोडसकर, डॉ. बी. के. पाटील, डॉ. सुरेश पुरी, डॉ. एस. व्ही. कुबेरकर,डॉ वाय बी विभुते यांसारख्या दिग्गजांनी या विभागाची समृद्ध परंपरा निर्माण केली. याच परंपरेतील एक अद्वितीय असा तेजस्वी शिलेदार म्हणजे प्रा. डॉ. वसंतराव मारोतराव गुरव.
डॉ. गुरव यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञानसाधना, संशोधन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निस्सीम प्रेमाचा आदर्श नमुना होय. जवळपास चार दशके त्यांनी यशवंत महाविद्यालयात अध्यापन करून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे. त्यांच्या अध्यापनातील नेमकेपणा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता यांमुळे ते विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत.एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.अतिशय कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाची जिद्द त्यांच्या अंगी होती. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयातून 1967 साली बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1969 साली रसायनशास्त्र विषयात एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. विशेष म्हणजे, यशवंत महाविद्यालयाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि अभ्यासू वृत्तीची दखल तेव्हाचे संस्थेचे अध्यक्ष, देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय डॉ. शंकररावजी चव्हाण आणि पद्मश्री शामरावजी कदम यांनी घेतली. त्यांच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून त्यांची यशवंत महाविद्यालयात लगेचच त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली.
महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मेहनती, शिस्तप्रिय, अभ्यासू आणि प्रामाणिक शिक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याची त्यांची शैली अत्यंत सोपी, प्रभावी होती. कितीही कठीण विषय असला तरी तो विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीला अनुरूप करून शिकविण्याची विलक्षण कला त्यांच्याकडे होती.तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. मात्र पदवी मिळाल्यानंतर त्यांची संशोधनयात्रा थांबली नाही. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण करून संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.त्यांच्या विषयातील गाढ अभ्यासाची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही घेतली. एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांच्या विद्वत्तेची आणि प्रामाणिकतेची पावती होती. याशिवाय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डायरेक्टर पदी सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती .परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली .स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या निवड समिती, परीक्षा मंडळ आणि विविध शैक्षणिक समित्यांमध्ये त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
रसायनशास्त्रातील स्पेक्ट्रोस्कोपी हा अत्यंत क्लिष्ट विषय समजला जातो.मात्र डॉ. गुरव यांच्या अध्यापनामुळे हा विषय विद्यार्थ्यांना अत्यंत सोपा आणि रंजक वाटू लागे. त्या काळात कुठल्याही सोयी सुविधा नसताना सर स्वतः पुण्याला जाऊन तिथून स्पेक्ट्रोस्कोपी चे वेगवेगळे पुस्तक घेऊन तसेच वेगळ्या प्रॉब्लेम्स असलेले प्रश्न पत्रिका घेऊन येत व विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त सोडवून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मला आजही आठवतात.आपला विद्यार्थी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणच्या विद्यार्थी पेक्षा कुठल्याही गोष्टीत कमी नाही असं त्यांचा मनोमन विश्वास होता व त्यासाठी ते स्वतः मेहनत घेत असत. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून असे म्हणावेसे वाटते की,त्याकाळात संपूर्ण मराठवाड्यात स्पेक्ट्रोस्कोपी विषय इतक्या प्रभावीपणे शिकविणारे प्राध्यापक कोणीच नव्हते.त्यांच्या अध्यापनातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही क्षमता दडलेली असते, या विश्वासाने ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहत. विद्यार्थी हुशार असो किंवा अभ्यासात मागे असो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्याला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन करणे हेच त्यांनी आपले कर्तव्य मानले. विशेषतः ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर ते वैयक्तिक लक्ष देत. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा किरण निर्माण केला.डॉ. गुरव सर यांच्याकडे विद्यार्थ्यांची मनःस्थिती ओळखण्याची विलक्षण क्षमता होती. निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, त्यांच्यातील भीती दूर करणे आणि त्यांना ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणे हे त्यांचे मोठे सामर्थ्य होते. त्यामुळेच विद्यार्थी त्यांना केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, पालक आणि मित्र म्हणूनही पाहत.सुमारे चाळीस वर्षांच्या अध्यापन सेवेत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडविले. आज त्यांचे विद्यार्थी केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर अमेरिका, जर्मनी, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, इटली यांसारख्या देशांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामध्ये गुरव सरांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. परदेशातून नांदेडला आलेला त्यांचा विद्यार्थी सर्वप्रथम गुरव सरांची भेट घेत असे. शिक्षकासाठी याहून मोठा गौरव कोणता?विध्यार्थ्यांना बोलताना सर काय साईन्टिस्ट , काय प्रोफेसर काय चालले आहे असे प्रेमाने बोलायचे.
डॉ. गुरव सर यांनी आयुष्यभर कधीही पद, प्रतिष्ठा किंवा पैशामागे धाव घेतली नाही. त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांचे यश, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणे आणि ज्ञानदान हेच सर्वोच्च ध्येय होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, प्राचार्य पदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची संधी असूनही त्यांनी ती स्वीकारली नाही. कारण त्यांना प्रशासकीय खुर्चीपेक्षा वर्गातील फळा अधिक प्रिय होता. विद्यार्थ्यांमध्ये राहून त्यांना घडविण्यातच त्यांनी खरे समाधान मानले. संस्थेप्रती आणि महाविद्यालयाप्रती असलेली त्यांची निष्ठा यावरून स्पष्टपणे दिसून येते.त्यांचे वैयक्तिक जीवनही तितकेच आदर्श आहे. घरी आलेल्या विद्यर्थ्यांना सर काही तरी खाऊ घातल्याशिवाय जाऊ देत नसत याची अनुभूती मला व सर्व विद्यार्थ्यांना अनेक वेळा आलेली आहे . सरांच्या पत्नी सौ गुरव मॅडम अतिशय प्रेमळ आहेत .सरांचे मोठे चिरंजीव माझे वर्गमित्र डॉ अभय यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक चांगला डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळविला आहे, तर धाकटे दोन्ही पुत्र संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यांची कन्याही रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून ते सगळे आपआपल्या संसारात सुखी आणि समाधानी आहेत. आपल्या मुलांमध्ये त्यांनी शिक्षण, संस्कार आणि कर्तृत्वाची जी मूल्ये रुजविली, तीच त्यांच्या जीवनकार्याची खरी संपत्ती आहे. सरांची स्मरणशक्ती, अभ्यासाची आवड आणि विद्यार्थ्यांविषयीचे प्रेम शेवटपर्यंत होते .नेहमी सर्व कॉलेज व विभागाविषयी खूप आत्मीयतेने विचारत. यशवंत महाविद्यालय, संस्था आणि आपल्या सहकाऱ्यांविषयी बोलताना त्यांच्या शब्दांत नेहमीच कृतज्ञता आणि आपुलकी जाणवत असे. यशवंत महाविद्यालयाशी त्यांचे नाते आयुष्यभराचे होते . आजच्या स्पर्धेच्या आणि व्यावसायिकतेच्या युगात डॉ. वसंत गुरव यांच्यासारखे शिक्षक समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ होते . ते केवळ रसायनशास्त्राचे प्राध्यापक नव्हते, तर अनेक पिढ्यांचे जीवन घडविणारे एक खरे अर्थाने ज्ञानयोगी होते.
अशा या आदर्श, कर्तव्यनिष्ठ, संशोधक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांचे दि 3 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले .त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना . सरांना भावपूर्ण श्रद्धांजली .🙏🙏
प्रा डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग ,यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो . 9403067252
