नांदेड प्रतिनिधी
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 3.3 व 4.5 इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावाजवळ असल्याचे समजते.
या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, भूकंपाचे धक्के जाणवल्यास तत्काळ सुरक्षितरीत्या घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
