स्वारातीम विद्यापीठात ‘अमली पदार्थ प्रतिबंध, महिला सुरक्षा व वाहतूक नियम’ विषयावर विशेष व्याख्यान
नांदेड : दिनांक 10 सप्टेंबर 2026
आजच्या डिजिटल युगात अमली पदार्थांचे सेवन, सोशल मीडियाचा अतिवापर आणि सायबर गुन्हे ही तरुणांसमोरील गंभीर आव्हाने आहेत. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून स्वतःला दूर ठेवतानाच आपल्या मित्रपरिवारालाही त्यापासून परावृत्त करावे. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत ‘डायल ११२’ या सेवेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. नीलाभ रोहन (IPS) यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ‘स्वयंसिद्धा’ स्त्रीशक्ती उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने ‘अमली पदार्थ प्रतिबंध, महिला सुरक्षा व वाहतूक नियम’ या विषयावर विद्यापीठाच्या सभागृहात विशेष जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यापीठातील तसेच संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आणि झूमच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्रे, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दा. पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बाबासाहेब सुरवसे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी प्रभावी पीपीटी सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अमली पदार्थांचे सेवन केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर कुटुंब आणि संपूर्ण समाजाच्या भवितव्यावर परिणाम करते. तरुणाई ही देशाची सर्वात मोठी शक्ती असून तिच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर होणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा अतिवापर, सायबर गुन्हे आणि डिजिटल माध्यमांमधून निर्माण होणाऱ्या विविध धोक्यांबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केले.
रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी ‘डायल ११२’ ही महत्त्वाची सेवा असून संकटाच्या प्रसंगी तिचा योग्य आणि प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया केंद्रे यांनी महिलांच्या संरक्षणासाठी असलेले विविध कायदे, उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या कायदेशीर अधिकारांची जाणीव ठेवाव. विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याबरोबरच आपल्या परिसरातही महिला सुरक्षा आणि कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांनी केले, तर ‘स्वयंसिद्धा’च्या समन्वयिका डॉ. नीना गोगटे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्गत तक्रार समितीच्या समन्वयिका डॉ. संगीता माकोने, स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयिका डॉ. शालिनी कदम तसेच विद्यार्थी विकास कक्ष समितीचे सदस्य डॉ. योगिनी सातारकर, डॉ. बाबुराव जाधव, डॉ. राजकुमार मून, डॉ. नंदकुमार बोधगीरे आणि डॉ. रणजीत तेहरा यांनी विशेष परिश्रम घेतले.
————————-
