https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

गडचिरोली शहरात उजळली सुमधुर स्वरांची रम्य दिवाळी पहाट

स्वरसुधेने रसिक तृप्त : भजन, अभंग, गवळण, गझल, भावगीतांची भरजरी गीतमैफल

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

आकाशात अद्याप चकाकत असलेली त्रयोदशीची चंद्रकोर, काळोखाच्या कोंदणात जडविलेल्या रत्नांसारख्या लुकलुकणार्‍या तारका, गुलाबी थंडीचा गारवा, अशा रम्य वातावरणात भावविभोर करणार्‍या स्वरांची बहार, षडजाच्या ‘सा’पासून सुरू झालेला हा स्वरप्रवास ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषादाच्या माध्यमातून रसिकांवर स्वरसुधेची बरसात करत त्यांची ब्रह्मानंदी टाळी लावणारा ठरला. निमित्त होते अजब-गजब विचार मंचाच्या वतीने आयोजित पहाट स्वरांच्या दिव्यांची या सुरमयी मैफलीचे.

अजब-गजब विचार मंचाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवारी (ता. २२) स्वरांच्या दिव्यांची ही रम्य पहाट स्वरनक्षत्रांची उधळण करत उजळली. स्थानिक विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या स्वर मैफलीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक पूर्णा खानोदे, गायिका वाचस्पती चंदेल, संगीत सम्राट फेम लीलाधर पाटोळे, गायिका मनीषा वानखेडे, भाग्यश्री खानोदे यांनी सप्त स्वरांचे रंग भरले. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन चंद्रपूर आकाशवाणी केंद्रातील निवेदिका प्रज्ञा जीवनकर यांनी केले. तर तबलावादक अजय चव्हाण, बासरीवादक आकाश सैतवाल, संवादिनी (हार्मोनियम) वादक प्रवीण काळे, कीबोर्ड पवन भारस्कर, पॅड ज्ञानेश्वर धनभर, मंजिरीवादक सौरव ठमके यांनी गायकांच्या स्वरांना वाद्याची साथ दिली.

स्वरांसोबत स्वादिष्ट मेजवानी…

या स्वर मैफलीत कर्णमधुर स्वरांची मेजवानी देताना रसिकांना खास झाडीपट्टीत बनविले जाणारे कोहळ्याचे बोंड आणि दुधीच्या वड्यांची न्याहारीही देण्यात आली. स्वरांचा आनंद आणि अस्सल पारंपरिक खाद्यपदार्थांच्या स्वादामुळे ही मैफल अविस्मरणीय झाली. याशिवाय तबलावादक अजय चव्हाण आणि बासरीवादक आकाश सैतवाल यांची जुगलबंदीही रसिकांच्या मनात घर करून गेली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, विद्याभारती विद्यालयाच्या प्राचार्य वंदना मुनघाटे, समशेर खान पठाण, प्राचार्य लीना हकीम, भंडार्‍याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम, शांताबाई त्रिनगरीवार आदींची उपस्थिती होती. मैफलीचा प्रारंभ दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आला. त्यानंतर अजब-गजब विचारमंचाचे सदस्य दिवंगत मनोज (बाळू) अलोणी यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, अरविंद कात्रटवार, सचिन मून, सतीश विधाते, विश्राम होकम, प्रवीण खडसे, डॉ. प्रशांत चलाख, डॉ. अद्वय अप्पलवार, सुभाष धंदरे, राजेश इटनकर, दत्तू सुत्रपवार, मिलिंद उमरे, नंदू काथवटे, सूरज खोब्रागडे, राजेश गोहणे, उदय धकाते, अनिल पोहणकर,  प्रतीक बारशिंगे आदींनी सहकार्य केले.

मैफलीच्या प्रारंभीच गायक पूर्णा खानोदे यांनी तुझ्या कृपेने दिन उगवे हे भक्तिगीत गात वातावरण भावभक्तीमय केले. त्यानंतर वाचस्पती चंदेल यांनी प्रभात काळी, तर भाग्यश्री खानोदे यांनी श्रीरंगा कमला कांता हे गीत सादर केले. मनिषा वानखेडे यांनी श्री गुरू भजन गात गुरूंचे स्मरण केले. लीलाधर पाटोळे यांनी चक्क क्लॅरोनेट या वाद्यावर भेटी लागी जीवा हा अभंग सादर केला. वाचस्पती चंदेल यांनी सुरेश भटांनी लिहिलेले केव्हा तरी पहाटे हे प्रणयधुंद गीत सादर करत वातावरणात बहार आणली. मनिषा वानखेडे यांनी दीपावली मनाये सुहानी हे खास दिवाळी गीत सादर केले. या मैफलीत अशा एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण करत ही दिवाळी पहाट अविस्मरणीय करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान भंडारा येथे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर कार्यरत डॉ. दीपचंद सोयाम यांचा गडचिरोलीतील आरोग्यसेवेबद्दल सपत्निक सत्कार करण्यात आला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704