एम सी आर
Uncategorized

रेणुका महोत्सव: ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि पौष्टिकतेचा उत्सव!

नांदेड:
नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला. यंदाची थीम ‘Give & Gain’ (देण्यातूनच प्राप्ती) अशी होती. जेव्हा आपण महिलांना योग्य संधी आणि संसाधने उपलब्ध करून देतो, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम केवळ एका व्यक्तीवर न होता संपूर्ण समाजावर होतो, हाच यामागचा मुख्य विचार आहे. एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की संपूर्ण कुटुंब सक्षम होते.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे. जोवर ग्रामीण भागातील लोकांचे, विशेषतः महिलांचे सक्षमीकरण होणार नाही, तोवर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकणार नाही. शासनामार्फत यासाठी विविध प्रकारे साहाय्य केले जाते. सध्या ग्रामीण महिला अनेक क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत. ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ म्हणजेच ‘उमेद’ अंतर्गत महिला स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण केले जात आहे.
महिलांमधील कलाकौशल्याला प्राधान्य देऊन त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना, अन्नपदार्थांना, आकर्षक गृहसजावटीच्या वस्तूंना आणि वाळवणाच्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भर केले जाते.
याच पार्श्वभूमीवर, यंदा १३ मार्च ते १८ मार्च दरम्यान आयोजित ‘रेणुका महोत्सवात’ विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘भरड धान्यांपासून’ (Millets) तयार केलेले पदार्थ! सध्या आपण ‘मिलेट वर्ष’ साजरे करत आहोत. पारंपरिक पौष्टिकतेला आधुनिकतेची जोड देणारा हा रेणुका महोत्सव यंदा आगळावेगळा ठरणार आहे.
ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांनी विशेष प्रशिक्षण घेऊन पारंपरिक पदार्थांना आधुनिक रूप दिले आहे. यामध्ये:
* भरड धान्यांपासून बनवलेल्या कुकीज
* ज्वारीचे पौष्टिक लाडू
* नाचणीच्या चकल्या आणि नाचणीची आंबील
* लहान मुलांसाठी भरड धान्यांपासून तयार केलेला केक
* चविष्ट थालीपीठ
हे सर्व पदार्थ अत्यंत दर्जेदार, पौष्टिक मूल्ये जपणारे आणि सुबक पॅकेजिंगसह प्रदर्शनासाठी सज्ज आहेत.
आजच्या ‘फास्ट फूड’च्या जमान्यात आपल्या मुलांना पौष्टिक आहार देऊन त्यांचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. बाजारातील भेसळयुक्त आणि अपायकारक पदार्थांमुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक मातेने या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. आपल्या मुलांना पौष्टिक पदार्थ खायला दिल्याने मुले तर आनंदी होतीलच, पण एक आई म्हणून तुम्हालाही मोठे समाधान मिळेल.
या महिलांना केवळ मदतीची नाही, तर खंबीर पाठबळाची गरज आहे. ‘मिलेट मदर’ होऊन ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी सज्ज झालेल्या या ग्रामीण महिला उद्याच्या सोनेरी भविष्याची वाट पाहत आहेत. चला तर मग, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार्य करूया!
तर मग, प्रदर्शनाला नक्की येताय ना?
सो. योजना भिसे नांदेड

Share

Related posts

बंजारा आणि शीख गुरूंचे नाते: व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

Chief Editor

शांती ब्रह्म स्वरूप: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज

Chief Editor

यशवंत ‘ मधील डॉ.मदन अंभोरे यांना ६० लक्ष रुपये बृहद संशोधन प्रकल्प प्राप्त

Chief Editor

मालमत्तेच्या वादातून जीवघेणा हल्ला; पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप

Chief Editor

नांदेड जिल्हा रेशीम हब बनविणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले*

Chief Editor

हिंदी केवळ भाषा नव्हे, रोजगाराचे प्रभावी माध्यम -डॉ. एम. के. खाजी

Chief Editor

Leave a Comment