नेसुबो महाविद्यालयात विद्यापीठ स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन

नांदेड : नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथे इंग्रजी विभागाच्या वतीने “Building the Skills of Comprehension” या विषयावर विद्यापीठ स्तरावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी भूषविले, तर उद्घाटन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) समन्वयक डॉ. एम. आर. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. ओमप्रभा लोहकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यशाळेचा शुभारंभ झाला. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. जीवन मसूरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी सांगितले की, “Building the Skills of Comprehension” या कार्यशाळेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये आकलन कौशल्यांची जडणघडण घडवणे हा आहे. सध्याच्या काळात केवळ भाषेचे ज्ञान पुरेसे नसून तिच्या अर्थाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचण्याची क्षमता विकसित होणे अत्यावश्यक आहे. वाचन, ऐकणे आणि समजून घेणे — ही तीनही कौशल्ये कोणत्याही भाषेच्या आत्म्याशी जोडलेली असतात. ‘Comprehension’ म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नव्हे, तर विचार, विश्लेषण आणि अर्थनिर्णय यांचा सुंदर संगम आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात इंग्रजी भाषेच्या अध्यापनातील आकलन कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, “वाचन समज ही केवळ भाषिक क्रिया नसून विचार प्रक्रियेचा विस्तार घडवणारी साधना आहे.”
उद्घाटक डॉ. मनीष देशपांडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन, चिंतन आणि विश्लेषण कौशल्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली. उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन आकलन, भाषिक सजगता आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा निश्चितच विकास होईल.
मुख्य सत्रात संसाधन व्यक्ती डॉ. ओमप्रभा लोहकरे यांनी दिलीप चित्रे लिखित “Father Returning Home” या कवितेवर सखोल आणि मनोवेधक विवेचन केले. त्यांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि प्रश्नोत्तर सत्रात आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. संजय कुलकर्णी यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख — डॉ. बिभीषण करे, डॉ. सुग्रीव फड, डॉ. इर्शाद खान आदींसह द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. गीता भोजने आणि इंग्रजी विभागातील सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.