नेसुबो महाविद्यालयात “मास्टरिंग इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम” प्रमाणपत्र कोर्सचा यशस्वी समारोप
स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी कौशल्य वृद्धीला चालना

नांदेड : इंग्रजी विषयातील कौशल्य वृद्धी घडवून स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने “मास्टरिंग इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम” हा पंधरा दिवसांचा प्रमाणपत्र कोर्स आयोजित करण्यात आला होता. या कोर्सच्या यशस्वी पूर्णतेनंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
प्रमाणपत्र वितरणप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जीवन मसूरे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रशेखर येंगडे, तसेच उर्दु विभाग प्रमुख प्रा. डॉ. इर्शाद खान आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या पंधरा दिवशीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसूरे, डॉ. संजय कुलकर्णी, कोर्स समन्वयक डॉ. संदीप काळे व डॉ. गीता भोजने यांनी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इंग्रजी विषयाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे व त्या संदर्भात काही महत्त्वाच्या युक्त्या या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. कोर्समुळे मिळालेल्या अनुभवाबाबत विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राधिका कोकुलवार, संभाजी तोटरे, सिमरन बेगम यांनी या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वासात वाढ झाली असून, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन मिळाले असल्याचे सांगून कोर्स समन्वयक प्रा. डॉ. संदीप काळे यांचे सर्व विद्यार्थ्यांनी आभार मानले. या प्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसूरे यांनी “अशा कोर्समुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयावरील पकड मजबूत होते. स्पर्धा परीक्षांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरते,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कोर्स समन्वयक प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.



