चाकोरीबाहेरील मैत्रीणी’ कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा
मनमुक्त फाऊंडेशनचा ऐतिहासिक उपक्रम; कर्तृत्वशाली महिलांचा गौरव

स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा २० सप्टेंबरला पनवेलमध्ये भव्य सोहळा
नवी मुंबई (प्रतिनिधी) सामान्यतेच्या चाकोरी मोडून अपार जिद्दीने स्वतःचा प्रवास घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे केवळ स्त्रीशक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे येत्या शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता सुरुची हॉल, पनवेल येथे ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी, कृतज्ञता सोहळा’ हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीच्या प्रवासाला नवा आयाम देणारा हा उपक्रम ठरणार आहे. स्थापनेपासूनच ‘मनमुक्त फाऊंडेशन’ने मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या ध्येयवाक्याने सुरू झालेली ही चळवळ समाजातील उपेक्षित घटकांना नवजीवन देत आहे. याच सामाजिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या कार्याने समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सामूहिक गौरव. घरगुती जबाबदाऱ्या, परंपरागत बंधने, आर्थिक मर्यादा आणि समाजातील दृष्टीकोन या साऱ्यावर मात करत या स्त्रियांनी स्वतःचा मार्ग निर्माण केला. अशाच दहा प्रमुख सन्मानार्थींमध्ये मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे-काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार या महिलांचा विशेष उल्लेख आहे. त्यांचे कार्य वैयक्तिक यशापलीकडे जाऊन समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहे. या कृतज्ञता सोहळ्याला राज्यातील नामांकित व्यक्तिमत्त्वे उपस्थित राहून महिलांच्या या यशगाथांना मानाचा मुजरा करणार आहेत. मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन, महाराष्ट्र), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट) आणि ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) या मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याचे वैभव अधिक वाढवेल. हा कार्यक्रम केवळ सन्मानापुरता मर्यादित नाही, तर समाजातील प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्त्री ही घरापुरती मर्यादित नसून समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी शक्ती आहे, हा संदेश या सोहळ्यातून दिला जाणार आहे. ‘मनमुक्त फाऊंडेशन’तर्फे सांगण्यात आले की, “हा सन्मान म्हणजे स्त्रीच्या प्रवासाला दिलेला मान आहे. तिच्या संघर्षातले अश्रू, ओठांवरील हास्य आणि समाजासाठी केलेले कार्य, या साऱ्याला कृतज्ञतेची आदरांजली वाहण्याचा हा सोहळा आहे. आपल्या उपस्थितीने हा सन्मान अधिक अर्थपूर्ण ठरेल.” पनवेल शहराला या दिवशी एका प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. स्त्रीशक्तीचा गौरव करणारा हा सोहळा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला अभिमान आणि आत्मविश्वासाची नवी दिशा देईल.
…. .. .. .. ..