अंनिसच्या “डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” पुरस्काराने बुक कल्चर, नांदेड व “आधारस्तंभ” पुरस्काराने डॉ. सारिका शिंदे सन्मानित.

नांदेड:
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात माहिती आणि संवादासाठी लोक मोबाईलकडे (भ्रमणध्वनीकडे) वळत असताना वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नांदेड येथील “बुक कल्चर” या संस्थेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या “डॉ नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अंनिसचे मुखपत्र असलेले “अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र” या मासिकास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे व त्यास पाठबळ देणे यासाठी नांदेड येथील डॉ. सारिका शिंदे यांना “आधारस्तंभ” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंनिसच्या लातूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश देवशेटवार व शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एन. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बुक कल्चर संस्था किशोरवयीन मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत—सर्वांच्या गरजा, आवडी आणि बौद्धिक विकास लक्षात घेऊन पुस्तके संग्रही ठेवते. तसेच मराठीतील महत्त्वपूर्ण आणि विचारप्रवर्तक ग्रंथ ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर वाचकांपर्यंत पोहोचवत असते. सामाजिक परिवर्तनासाठी वाचनसंस्कृतीचा दीर्घकालीन प्रभाव लक्षात घेऊन काम करते, या प्रेरणादायी उपक्रमासाठी “बुक कल्चरला” सन्मानित करण्यात आले आहे. अंनिसचे मुखपत्र असलेले “अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र” अंधश्रद्धा, करणी, भानामती, जादूटोणा, बुवाबाजीस विरोध करते तसेच विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवते, त्याचा प्रचार प्रसार करते. कार्यकर्ते वार्तापत्रस पाठबळ देणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे वर्षातील विविध उपक्रम राबविण्याचे काम करत असतात.
या राज्य कार्यकारणी बैठकीसाठी अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, राजू देशपांडे, राहुल थोरात, सम्राट हटकर, फारुख गवंडी, प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, डॉ. अशोक कदम, निळकंठ जिरगे, मुंजाजी कांबळे, विनोद वायंगनकर, रामभाऊ डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश गादगीणे यांनी केले तर रमेश माने यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले 265 कार्यकर्ते उपस्थित होते.