मूल्याधिष्ठित शिक्षण: नव्या शैक्षणिक धोरणाचा पाया – डॉ. संदीप काळे

नांदेड: जनप्रगती सेवाभावी संस्था, नांदेड संचलित संस्कृती पब्लिक स्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. संदीप काळे यांनी “मूल्याधिष्ठित शिक्षण: नव्या शैक्षणिक धोरणाचाल पाया” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनप्रगती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश बोडखे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. संध्याताई कल्याणकर आणि संस्कृती पब्लिक स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. पल्लवी राजेश उंबरकर उपस्थित होत्या.
डॉ. संदीप काळे यांनी आपल्या मनोगतात नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या महत्त्वावर विशेष भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की शिक्षण हे केवळ माहिती प्रदान करणारे साधन नसून, ते विद्यार्थ्यांच्या चारित्र्य, नैतिकता आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असले पाहिजे. त्यांनी शिक्षणातील मूल्यशिक्षणाच्या घटकांना महत्त्व देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आणि सांगितले की नैतिकता, सामाजिक जाणीव, सहकार्य, सृजनशीलता आणि जबाबदारीची भावना विकसित करणे हे शिक्षणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी विविध उदाहरणे दिली, जसे की शिक्षणसंस्थांनी केवळ अकादमिक गुणवत्तेवर भर न देता, विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे गरजेचे आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या शिक्षक, पालक आणि समाज यांची एकत्रित भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर त्यांच्या नैतिक आणि बौद्धिक प्रगल्भतेसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी, असेही त्यांनी सांगीतले. तसेच, मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षणसंस्थांनी अनुभवाधारित शिक्षणतंत्रांचा अवलंब करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या अंतःप्रेरणेला चालना देणारे आणि त्यांना समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण हेच खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते, असे ते म्हणाले. त्यांच्या या विचारांमधून केवळ ज्ञानाधारित नव्हे, तर जीवनमूल्यांवर आधारित आणि विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे शिक्षण कसे असावे, याबद्दल त्यांनी मार्मिक विवेचन केले.
स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक सत्रात गोंधळ, नाच रे मोरा, घुमर या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यांनी उपस्थित मान्यवर आणि पालकांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सदस्य डॉ. राजेश उंबरकर, श्री. प्रणव बोडखे तसेच शाळेच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्यास मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता, आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ कला सादरीकरणावर समाधान व्यक्त केले.