विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधान रेमिडियल क्लासेसमध्ये होईल – डॉ. कल्पना कदम

नांदेड : नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने एक आठवडाभर रेमिडियल क्लासेस चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश महाविद्यालयातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट करण्यास मदत करणे हा आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित त्यांच्या सर्व शंकांचे निरसन या विशेष मार्गदर्शन सत्रांमधून होईल, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे यांच्या प्रास्ताविकाने झाले. आपल्या भाषणात त्यांनी या उपक्रमाचे स्वरूप स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य, निबंध लेखन, अहवाल लेखन, ई-मेल लेखन, नोकरीसाठी अर्ज लेखन, सूचना लेखन, मिनिट्स लेखन यासारख्या व्यावहारिक बाबींवर विशेष मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून नव्हे, तर भविष्यातील करिअरसाठीदेखील याचा मोठा उपयोग होणार आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप काळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या शंका समजून घेऊन त्यांचे निरसन करणे आणि त्यांना इंग्रजी भाषेतील लिखाण कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संजय कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले. या वेळी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि असे क्लासेस नियमितपणे आयोजित करण्याची विनंती केली.
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वासाने इंग्रजी भाषा आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात त्याचा मोठा फायदा होणार आहे असे प्रतिपादन डॉ. कल्पना कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गीता भोजणे, प्रा. छाया कोंगेवाड यांनी परिश्रम घेतले.