ताज्या घडामोडी

शिक्षण क्षेत्रातील तरुणांसमोरील आव्हाने* यशवंत महाविद्यालयात विशेष व्याख्यान

नांदेड:( दि.२ सप्टेंबर २०२५)
यशवंत महाविद्यालयातील महिला सुरक्षा व सुधार समितीच्या वतीने ‘ शिक्षण क्षेत्रातील तरुणांसमोरील आव्हाने’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात तरुणांनी आत्मविश्वास, प्रामाणिकता आणि आवश्यक कौशल्ये आत्मसात करून यशाचा मार्ग शोधावा. आव्हाने ही संधी असतात, या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहण्याचे आणि सकारात्मक वृत्ती बाळगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या विशेष व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना कदम उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी, तरुणाईसमोरील शैक्षणिक, मानसिक व सामाजिक आव्हानांचा सखोल आढावा घेतला. करिअरविषयक संभ्रम, डिजिटल व्यसन, नोकरीतील अस्थिरता, तसेच कौशल्य विकासाचा अभाव यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत वेळेचे नियोजन, आत्मअनुशासन आणि सतत नवे कौशल्य शिकण्याची सवय जोपासावी, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात विशेष उपस्थिती उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे यांची लाभली. आपल्या भाषणात त्यांनी, स्त्री-पुरुष समानता, आत्मसुरक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देत विद्यार्थ्यांनी या बाबतीत जागरूक राहावे, असे सांगितले. अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी आणि आत्मजागर निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रारंभी महिला सुरक्षा व सुधार समितीच्या अध्यक्षा डॉ.एम.एस.कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करताना आपल्या प्रास्ताविकात समितीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती दरवर्षी विविध उपक्रम राबवते, ज्यामध्ये स्व-संरक्षण कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, मानसिक आरोग्य जनजागृती सत्रे, नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच लैंगिक संवेदनशीलतेवर आधारित चर्चासत्रे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे त्यांनी आनंदाने नमूद केले. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता आणि सामाजिक भान निर्माण होण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, त्यांनी या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा द्यावी आणि आत्मविकासासाठी प्रयत्नशील राहावे.
सूत्रसंचालन प्रा.भारती सुवर्णकर यांनी उत्साहपूर्वक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सोनाली वाकोडे यांनी करून दिला. शेवटी आभार प्रा.प्रियंका शिसोदिया यांनी मानले.
व्याख्यानास महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.