कवी पी. विठ्ठल यांना म.सा.प.चा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार

छत्रपती संभाजीनगर १३: मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा कवयित्री
लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार यंदा नांदेडचे कवी श्री. पी. विठ्ठल यांना देणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. रोख अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९६० च्या दशकात उदयाला आलेल्या, मराठवाड्यातील पहिल्या पिढीच्या कवयित्री लीला धनपलवार यांच्या नावाने गेल्या बारा वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येत असतो. हा पुरस्कार सातत्याने कवितालेखन करणाऱ्या व कवी म्हणून स्थिर झालेल्या कवीस देण्यात यावा अशी साहित्य परिषदेची भूमिका आहे. २०२५ च्या ह्या काव्यपुरस्कारासाठी साहित्य परिषदेने नियुक्त केलेल्या पुरस्कार समितीने नांदेड येथील सुप्रसिद्ध कवी पी. विठ्ठल यांची एकमताने निवड केली आहे.
श्री. पी. विठ्ठल हे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक असून त्यांचे आतापर्यंत ‘माझ्या वर्तमानाची नोंद’, ‘शून्य एक मी’, ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ हे तीन कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. काव्यसमीक्षक म्हणूनही त्यांची काव्यप्रांतात ओळख आहे. कवितेशिवाय इतर वाङ्मयप्रकारांतही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांच्या ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ या संग्रहाला मराठवाडा साहित्य परिषदेच्या कुसुमावती देशमुख काव्यपुरस्काराशिवाय इतरही पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य परिषदेचा लीला धनपलवार हा विशेष काव्यपुरस्कार श्री. पी. विठ्ठल यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पुरस्कार निवड समितीने ही निवड केली असून सुप्रसिद्ध कवी श्रीधर नांदेडकर व प्रा. दासू वैद्य हे या समितीचे अन्य सदस्य होते अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज दिली. यावेळी उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, श्री. रामचंद्र तिरुके, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते हे उपस्थित होते.
y