श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण:एक अढळ प्रकाशस्तंभ

भारताच्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशभर आनंदाची लाट उसळली होती. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला गेला, आणि एक नवे युग सुरू झाले. पण त्या दिवशीही काहींच्या घरात अंधारच होता, त्यांच्या अंगणात तिरंगा नव्हता. कारण हैदराबाद संस्थान अजूनही निजामशाहीच्या काळोखात गडप झालं होतं. त्या काळोखाला भेदून प्रकाशाची एक एक ज्योत तयार करत होते काही निडर सैनिक — न प्रसिद्धीच्या झोतात, न गौरवाच्या मिरवणुकीत — पण अत्यंत निष्ठेने, झिजत, जळत. अशाच ज्योतांपैकी एक होते श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण.
निजामाच्या जुलमी राजवटीत सामान्य जनतेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. रझाकारांची छायाच लागली, की गावात मृत्यूची चाहूल लागायची. सामान्य माणसाच्या जीविताला, संपत्तीला, आणि सर्वात भयावह म्हणजे त्यांच्या स्त्रियांच्या सन्मानाला कोणतही संरक्षण नव्हतं. या अराजकतेविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणे.
पण याच वेळी शंकररावांनी निर्धाराने पाऊल टाकलं. तेव्हा नुकतेच त्यांच्या आयुष्यात लग्नाचा नवा टप्पा आला होता. पण त्यांनी वैयक्तिक सुखाचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि राष्ट्रकार्यासाठी अज्ञातवास पत्करला. याच्यातच त्यांची देशभक्ती दिसते – जिथे प्रेम, लग्न, संसार यांचाही त्याग केला जातो, तिथे राष्ट्रासाठीचं प्रेम अधिक मोठं ठरतं.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र परिषदेकडून सुरू झालेल्या चळवळीचा शंकरराव चव्हाण साहेब एक महत्त्वाचा आधारस्तंभ होते. त्यांनी उमरखेड परिसरात चळवळीचं बस्तान बसवलं. हा भाग केवळ नकाशावरच नव्हे, तर संघर्षाच्या नकाशावरही ठळकपणे उभा राहिला. रात्री-अपरात्री पत्रकं छापली जायची, वाटली जायची. कार्यकर्त्यांच्या गुप्त सभा घडवून आणायच्या. कुठे धाडसी घोषणा, कुठे संयमित संवाद. सगळ्या प्रकारचं नेतृत्व शंकररावांनी आपल्या खांद्यावर घेतलं.
त्यांचा आवाज कधी जोरात नव्हता, पण परिणामकारक होता. त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे चळवळीचा गाभा तळागाळापर्यंत पोहोचला. त्यांनी केवळ कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं नाही, तर त्यांच्या जीवनाला एक नवा अर्थ दिला.
त्यांच्या कॅम्पमध्ये प्रत्येक गोष्ट नियमशीर चालायची – जमाखर्चाची नोंद असो वा बैठकींची वेळ, पत्रकांचं छपाईचं नियोजन असो वा नवोदित कार्यकर्त्यांच्या प्रेरणेचं काम. शिस्त, निष्ठा आणि प्रेम – या त्रिसूत्रीवर त्यांनी आंदोलन उभं ठेवलं.
शंकरराव चव्हाण साहेबांच्या कामाने इतका प्रभाव टाकला, की स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यांना ‘निष्ठावंत सैनिक’ म्हणून गौरविलं. एखाद्या गुरूच्या मुखातून असा शब्द निघणं, ही त्या शिष्याच्या कार्याची जणू संमतीमुद्रा असते.
विद्यार्थ्यांचं नेतृत्व करताना शंकररावांनी तरुणाईला क्रांतीच्या वाटेवर आणलं. त्यांनी दाखवलं की पाठीवर दप्तर असलेले हातही एक दिवस समाजपरिवर्तनाचं शस्त्र बनू शकतात.
त्यांचा लढा केवळ निजामविरुद्ध नव्हता; तो असहिष्णुतेविरुद्ध होता, अन्यायाविरुद्ध होता, माणूसपणासाठी होता. म्हणूनच त्यांच्या कार्याला मर्यादा नव्हती. त्यांनी आंदोलन संपल्यावरही कार्य सोडलं नाही. त्यांनी समाजाच्या पुनर्रचनेचं व्रत घेतलं – शिक्षण, शेतकरी हक्क, ग्रामीण स्वावलंबन यासाठी ते झिजले. आज त्यांच्या कार्याचं स्मरण करणं ही केवळ औपचारिकता नाही – ती एक नैतिक जबाबदारी आहे. कारण अशा व्यक्तींच्या कार्यामुळेच आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो. त्यांच्या विस्मृतीत जाण्याचा अर्थ आपल्या मूळांची विस्मृती होणे होय.
शंकरराव चव्हाण साहेब हे मराठवाड्याच्या इतिहासाच्या पानांपेक्षा लोकांच्या मनात अधिक कोरले गेले आहेत. त्यांच्या कार्याची झळाळी आजही अनेकांच्या आयुष्याच्या प्रेरणास्थानी आहे.
अशा लढवय्या कार्यकर्त्यांना कधी शासकीय गौरव मिळतो, तर कधी मिळत नाही. पण ते काळाच्या कसोटीवर टिकतात – स्मृतीरूपानं, प्रेरणारूपानं. आज, हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देताना, शंकरराव साहेबांचे नाव पुन्हा एकदा उजळून निघावं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
*डॉ. संदीप पाईकराव*
*हिंदी विभागप्रमुख*
*यशवंत महाविद्यालय, नांदेड*