एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात छायाचित्रकार सचिन मोहिते यांचा सत्कार

नांदेड : राज्य शासनाचा ‘तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लोकमतचे छायाचित्रकार सचिन मोहिते यांचा एमजीएम पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
यावेळी प्रा. डॉ. प्रवीणकुमार सेलुकर, प्रा.डॉ. भगवान सूर्यवंशी, प्रा. राज गायकवाड, तसेच लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक भारत दाढेल हे प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने सचिन मोहिते यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. गणेश जोशी म्हणाले, “सचिन मोहिते यांचे छायाचित्र हे केवळ दृश्य टिपणारे नाही, तर त्यामागे सामाजिक संवेदना, विचार आणि प्रतिबद्धता आहे. त्यांनी छायाचित्राच्या माध्यमातून उपेक्षित घटकांचे वास्तव समोर आणले आहे. त्यांच्या कार्याची ही राज्यस्तरीय दखल हे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी गौरवाचे आहे.”
सचिन मोहिते यांनीही या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, “महाविद्यालयीन स्तरावर माझ्या कार्याची दखल घेणे ही भावनिक बाब आहे. हा पुरस्कार केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून, समाजातील दुर्लक्षित वर्गांच्या कहाण्यांचा स्वीकार आहे.”
कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले होते. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या कार्यक्रमात छायाचित्रण आणि पत्रकारितेतील व्यावसायिक जबाबदारीवरही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रवीणकुमार सेलुकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी केले.