सचिन मोहितेंना ‘तोलाराम कुकरेजा राज्यस्तरीय उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार’ पुरस्कार घोषित; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

नांदेड : वृत्तपत्र माध्यमात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या छायाचित्रकारांना दिला जाणारा राज्य शासनाचा ‘तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार’ हा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा लोकमतचे छायाचित्रकार सचिन मोहिते यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५१,००० रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे आहे.
या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सचिन मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडकर, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी श्रीनिवास भोसले, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “सचिन मोहिते यांच्या छायाचित्रातून उमटलेले वास्तव चित्रण केवळ सामाजिक भान जागवणारे नसून, शासनाच्या अनेक सकारात्मक बाजू देखील प्रभावीपणे उजागर करणारे ठरले आहे. त्यांच्या छायाचित्रणातून अनेक महत्त्वाचे सामाजिक परिणाम घडले आहेत, यामुळे शासनालाही दखल घेण्यास भाग पाडले गेले.”
आपल्या भावना व्यक्त करताना सचिन मोहिते म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे माझ्या सातत्यपूर्ण सामाजिक भान ठेवणाऱ्या कार्याची पावती आहे. या गौरवामुळे माझ्या कामाला नवी ऊर्जा आणि बळ मिळाले आहे. उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांचे जीवन वास्तवदर्शीपणे मांडण्याचे माझे कार्य अधिक जोमाने सुरू राहील.”