ताज्या घडामोडी

संगीत शंकर दरबारचे विसावे वर्ष : यावर्षी पद्मश्री सुरेश वाडकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ, भाग्येश मराठे, भुवनेश कोमकली अशा दिग्गज कलावंतांची मांदियाळी

नांदेड : (प्रवीणकुमार सेलूकर) भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक के. डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचे हे विसावे वर्ष असून सालाबादाप्रमाणे यावर्षीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पद्मश्री सुरेश वाडकर, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ, भाग्येश मराठे, भुवनेश कोमकली अशा दिग्गज कलावंतांची मांदियाळी आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे.

अवघ्या मराठवाड्यातील संगीत रसिक ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात अशा या संगीत महोत्सवाचे हे विसावे वर्ष असून यावर्षी २५ फेब्रुवारी (रविवार) रोजी सायंकाळी ६:०० वाजता कु. सुजया आणि कु. श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पूर्वसंध्येच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा ओंकार स्वरूपा’ हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंताला दरवर्षी संगीत शंकर दरबार जीवन गौरव पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार गानमहीं डॉ. अण्णासाहेब गुंजकर व पंडित जसराजजी यांचे शिष्य पंडीत शाम गुंजकर यांना प्रदान केला जाणार आहे.

२६ फेब्रुवारी (सोमवार) रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५:३० वाजता अभिषेक बोरकर यांच्या सरोद वादनाने होणार असून त्यानंतर ज्येष्ठ गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे (मुंबई) यांच्या हस्ते यावर्षीच्या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. याच कार्यक्रमात ‘संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार-२०२४’ प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर तसेच आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यानंतर भाग्येश मराठे (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यानंतर डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या दिवशीच्या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

२७ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी सायंकाळी ६:०० वाजता श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर यशस्वी सरपोतदार (पुणे) आणि नंतर भुवनेश कोमकली (देवास) यांचे शास्त्रीय गायन होणार असून ख्यातकीर्त सतार वादक पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ (पुणे) यांचे सतार वादन होणार असून मुकेश जायव हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. त्यांच्या सतार वादनाने या संगीत महोत्सवाचा समारोप होणार आहे.

हे वर्ष पंडित राम मराठे आणि पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या महान गायकांप्रती कृतज्ञता प्रकट करण्याच्या हेतूने त्यांचे नातू भाग्येश मराठे आणि भुवनेश कोमकली यांचे शास्त्रीय गायन यावर्षीच्या महोत्सवात आवर्जून ठेवण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवातील कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उभारण्यात येणाऱ्या भव्य स्वरमंचावर संपन्न होणार आहेत. रसिकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या आणि त्यांच्या उदंड प्रेमाच्या बळावर अवघ्या दोन दशकांत भारतातील अग्रगण्य संगीत महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झालेल्या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचा अधिकाधिक रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ. अमिताताई चव्हाण, सचिव श्री डी. पी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अॅड, उदयराव निंबाळकर, श्री संजय जोशी, श्री रत्नाकर आपस्तम्ब, श्री गिरीश देशमुख, प्रा. विश्वाधार देशमुख तथा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.