एम सी आर

अण्णा भाऊ साठे जागतिक कीर्तीचे महान मानवतावादी लेखक : डॉ. शरद गायकवाड*

Uncategorized

*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
नांदेड: प्रतिनिधी
कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि श्रमिकांच्या रक्त, अश्रू व घामाची महती आपल्या लेखणीतून मांडणारे लोकलेखक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे महान मानवतावादी लेखक होते, असे प्रतिपादन पुरोगामी विचारवंत डॉ. शरद गायकवाड, कोल्हापूर यांनी केले.
येथे अण्णा भाऊ साठे यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने अधिसभा सभागृहात आयोजित ‘अण्णा भाऊ साठे लेखन प्रेरणा दिन’ व जयंती कार्यक्रमात डॉ. गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते.
डॉ. शरद गायकवाड म्हणाले की, अवघ्या दीड दिवसांच्या अत्यल्प औपचारिक शिक्षणाच्या बळावर नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, संघर्ष, वेदना आणि सामाजिक वास्तव यांना गाठीशी बांधून अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर साहित्यनिर्मिती केली. चळवळीतील २७ वर्षांच्या कालखंडात त्यांनी तब्बल ७७ ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या साहित्याचे जगभरातील २० हून अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले असून, त्यांच्या साहित्याचा अभ्यास आजही जगभर सुरू आहे.
अण्णाभाऊंनी सर्वसामान्य माणसाला साहित्याचा नायक बनविले. साहित्यनिर्मिती ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हे नवे मूल्य त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडले. त्यांनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदूच बदलून टाकला. त्यांच्या साहित्यामध्ये सत्यशोधकी, मार्क्सवादी, आंबेडकरी, स्त्रीवादी आणि साम्राज्यवादविरोधी विचारांचा अपूर्व संगम आढळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्गव्यवस्था आणि जातिव्यवस्था बदलली पाहिजे, हा परिवर्तनवादी विचार अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून मांडला. त्यांचा जीवनप्रवास हा संघर्षाचा होता. ‘एक पाय तुरुंगात आणि एक पाय चळवळीत’ असे त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीही अण्णाभाऊंनी संघर्ष केला. तत्कालीन काळात तमाशावर बंदी घालण्यात आली असताना त्यांनी तमाशाला ‘लोकनाट्य’ हे नवे स्वरूप देत या साहित्यप्रकाराला सामाजिक आशय आणि परिवर्तनवादी दिशा दिली. त्यांच्या साहित्याने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि सामाजिक परिवर्तनाची मशाल तेवत ठेवली.
मानवतेच्या व्यापक दृष्टिकोनातून निर्माण झालेले अण्णाभाऊंचे साहित्य हे ज्ञानपीठाच्या तोलाचे आणि भारतरत्नाच्या मोलाचे कार्य आहे, असे ठाम प्रतिपादन डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील विविध अनुभवांचा संदर्भ देत, अण्णाभाऊंनी कष्टकरी आणि सामान्य माणसाचा चेहरा आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडला. समाजातील वास्तवाचे दर्शन घडवून ते जगासमोर सत्य मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनीता पाटील यांनी केले, तर आभार डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी मानले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. मारुती गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
यावेळी डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. प्रमोद लोणारकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. बाबुराव जाधव यांच्यासह संशोधक विद्यार्थी, विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————-

Share

Related posts

भगवान रजनीश सक्रिय ध्यान अभियान अंतिम टप्प्यात

Chief Editor

प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे सागरी जलतरण स्पर्धेतील सुयश आनंददायी -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

Chief Editor

नेसुबो महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Chief Editor

वारी पर्यावरणाची उपक्रमातून अध्यात्म संतवाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Chief Editor

सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात समाजशास्त्र अभ्यास मंडळ स्थापना व अतिथी व्याख्यानाचे आयोजन.

Chief Editor

Leave a Comment