संगणक टंकलेखन व लघुलेखन क्षेत्रात रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध… डॉ. संदीप काळे

नांदेड, श्री नारायण संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थेच्या वतीने ‘करिअर गाइडन्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगणक टंकलेखन व लघुलेखनाच्या महत्त्वावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या विशेष मार्गदर्शनासाठी मुंबई येथील इंडस्ट्रियल डिपार्टमेंटच्या उच्च श्रेणी स्टेनोग्राफर सौ. संध्या प्रमोद हिवरे यांच्यासह ओझोन फाउंडेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा नेताजी सुभाषचंद्र बोस वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाचे प्रा. डॉ. संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीस सौ. संध्या प्रमोद हिवरे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी शासकीय नोकरीसाठी संगणक टंकलेखन व लघुलेखनाचे महत्त्व विषद करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले प्रा. डॉ. संदीप काळे यांनी आपल्या भाषणात बोलत असताना संगणक टंकलेखन (Computer Typing) आणि लघुलेखन (Shorthand) या दोन्ही कौशल्यांना शासकीय क्षेत्रात मोठी मागणी आहे तसेच विविध सरकारी विभागांमध्ये प्रशासकीय कामकाज सुरळीत चालवण्यासाठी या कौशल्यांची नितांत गरज आहे असे सांगून संगणक टंकलेखनाचे महत्त्व विषद केले ज्या मध्ये शासकीय कार्यालयांमध्ये दस्तऐवज तयार करण्यासाठी टंकलेखन आवश्यक आहे. टंकलेखनाचा वेग जितका जास्त, तितकी कार्यक्षमता अधिक असते. ई-गव्हर्नन्स, ऑनलाईन फाइल व्यवस्थापन, डेटा एंट्री, ई-मेल संप्रेषण यासाठी टंकलेखन अनिवार्य आहे. सरकारी कार्यालयांतील पत्रव्यवहार, अहवाल तयार करणे, दस्तऐवजीकरण, वित्त विभागातील कामांसाठी टंकलेखन आवश्यक आहे. तसेच लघुलेखनाच्या मदतीने अधिकारी, न्यायाधीश, मंत्री यांच्या भाषणांची नोंद लवकर घेता येते. आजघडीला न्यायालयीन लिपिक, सचिवालय, पोलिस खाते आणि इतर प्रशासकीय विभागांमध्ये लघुलेखनाची मोठी मागणी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलतांना त्यांनी या क्षेत्रात शासकीय नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत ज्यामध्ये संगणक टंकलेखन व लघुलेखन कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी लघुलेखक (Stenographer) पदे उपलब्ध आहेत ज्यामध्ये केंद्र सरकार अंतर्गत SSC मार्फत स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D पदांसाठी याचा फायदा होईल. राज्य सरकार अंतर्गत मंत्रालय आणि न्यायालयीन विभागांमध्ये याचा फायदा होईल. उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक पदे उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद (ZP) आणि महापालिकांमध्ये टंकलेखक व लिपिक पदांसाठी याचा फायदा होईल तसेच रेल्वे, बँक, पोस्ट ऑफिस आणि सरकारी कार्यालयांमध्ये टंकलेखक या पदासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत असे सांगून संगणक टंकलेखन व लघुलेखन हे शासकीय नोकरीसाठी महत्त्वाचे कौशल्य आहे त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेत या कौशल्यांची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कौशल्यांचा सराव करून स्वतःसाठी उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात अशे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. नारायण संगणक टंकलेखन व लघुलेखन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदिप नंदाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय काळे यांनी परिश्रम घेतले.