आर्थिक विकास हा शाश्वत असावा: डॉ. डी.बी.रोडे

नांदेड: प्रतिनिधी
मानवाने विकास प्रक्रिया राबवत असताना नैसर्गिक घटकांचा विचार केला नाही त्यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. दारिद्र्य, आरोग्य, राहणीमान, कुपोषण, भूकबळी इत्यादी संदर्भात निर्माण झालेल्या समस्या या आपण राबविलेल्या चुकीचा आर्थिक विकास प्रक्रियामुळे झाल्या आहेत. शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे, पर्यायी साधने शोधणे, साधनांचा पुनर्वापर करणे, पुनर्निर्मिती करणे, टाकाऊ पदार्थ कमी करणे इ. महत्त्वाचे बदल करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.असे मत शिवाजी महाविद्यालय, परभणी येथील अर्थशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. डी. बी. रोडे सर यांनी व्यक्त केले. ते ‘अर्थशास्त्र अभ्यास मंडळ 2024-25’ च्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यशवंत महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत अर्थशास्त्र अभ्यास मंडळ (2024-25) चे उद्घाटन डॉ डी. बी. रोडे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय, परभणी यांच्या हस्ते करण्यात आले. अर्थशास्त्र विभागा मार्फत चालवल्या जाणार ‘अर्थनीती’ उपक्रमांतर्गत एम.ए. द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी गायत्री सोळंकीने तयार केलेल्या ‘शाश्वत विकास ध्येये’ आणि किरण गादेवार हिने तयार केलेल्या ‘मृदा संवर्धन’ या भित्तीपत्रकांचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ हरिश्चंद्र पतंगे सर हे लाभले होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पी.आर. मुठ्ठे अर्थशास्त्र विभागप्रमुख यशवंत महाविद्यालय, नांदेड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.डी. आवाळे यांनी केले. अभ्यास मंडळाचे संयोजक प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड होते कार्यक्रमात डॉ. डी. डी. भोसले, प्रा. नयना देशमुख, प्रा. राहुल लिंगमपल्ले, प्रा. डॉ. संतोष पाटील. प्रा. योगिता पवार, इत्यादी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक तसेच पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.