ताज्या घडामोडी

अमरनाथच्या गुहेतून…* भाग ११ वा *लेखक :धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

नांदेड:

वैष्णोदेवीचे दर्शन व्हावे ही माझ्यासोबत आलेल्या सर्वच भाविक यात्रेकरुंची मनोमन इच्छा होती. ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे सर्वच यात्रेकरू आनंदात व खुशीत होते. ३२ किलोमीटरची पैदल यात्रा करून वैष्णोदेवीचे दर्शन घेणारे भाविक परिश्रमाने प्रचंड थकले असून देखील त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती.आज निघण्याचे शेड्युल सकाळी ११ चे असल्यामुळे सर्व आरामात चालले होते.एकूणच काय तर अमरनाथ यात्रेच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्यामुळे मी देखील थोडा निवांत झालो आहे.हॉटेल देवी ग्रँड मधील सुसज्ज रूममध्ये असलेल्या बाथटब मध्ये गरम पाण्यात बराच वेळ मनसोक्त स्नान केले. सर्व थकवा दूर झाल्यानंतर सकाळी नाश्ता ऐवजी पूर्वी अमरनाथ यात्रेला आलेले नांदेडचे हृदयनाथ सोनवणे यांच्या तर्फे देण्यात आलेल्या रुचकर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला.

सकाळी ११ वाजता आम्ही अमृतसर साठी निघालो. पंजाब मधील उष्ण वातावरणाची जाणीव असल्यामुळे आता मी गाड्या बदलल्या होत्या. या दोन्ही गाड्यांमध्ये सेमी स्लीपर ची व्यवस्था होती.गाड्या संपूर्णतः एअर कंडिशन अशा स्वरूपाच्या होत्या.कटरा ते अमृतसर व्हाया जम्मू असा आमचा प्रवास असल्यामुळे ड्रायवरांना प्रत्येकी ₹ १००० देऊन जम्मू बायपासला दोन तासासाठी थांबविण्याची विनंती केली.आता पर्यंत ४४ किमी अंतर पूर्ण झाले होते.मोठया गाड्यांना शहरात इंर्टी नसल्यामुळे छोट्या गाड्यातून प्रत्येकी ₹ १०० येण्या जाण्यासाठी दर ठरविला आणि आम्ही निघालो ऐतिहासिक रघुनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी.

रघुनाथ मंदिर हे सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे. महाराजा गुलाब सिंग आणि त्यांचा मुलगा महाराज रणबीर सिंग यांनी १८५३-१८६० या काळात मंदिर बांधले. मंदिरात अनेक देवता आहेत, परंतु प्रमुख देवता भगवान राम आहे, जो भगवान विष्णूचा अवतार आहे. २४ नोव्हेंबर २००२ मध्ये जेव्हा मंदिरात पूजा करत असताना दहशतवादी फिदाईन हल्ला झाला. तेव्हा मंदिरात झालेल्या चकमकीमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला .अनेक भाविक जख्मी झाले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मात्र जम्मू रघुनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या कितीतरी पटीने वाढली.

अवाढव्य रघुनाथ मंदिरात सात बुलंद शिखर आहेत.मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारावर महाराणा रणबीरसिंग यांचे चित्र आणि भगवान हनुमानाची प्रतिमा लावलेली आहे.मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतर देवस्थानांमध्ये भगवान विष्णूच्या विविध अवतारांचा समावेश आहे. भगवान सूर्याच्या मंदिरामध्ये परमेश्वराची विविध रूपे आहेत. इतर देवी-देवतांच्या प्रचंड मूर्ती आहेत. मंदिराच्या आतील भिंतींवर सोन्याचे पत्रे मढवलेले आहेत. गॅलरी मध्ये देखील आहे, जिथे विविध ‘शीव लिंगम’ आणि ‘सालिग्राम’ ठेवलेले आहेत. पाऱ्याचे भव्य शिवलिंग भाविकांना आवडले. हिंदू पँथिऑनच्या जवळजवळ सर्व प्रतिमांचा येथे समावेश आहे. त्यामुळे मंदिराच्या वास्तुकलेतील एक असामान्य मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.रघुनाथ मंदिराच्या स्थापत्य वैभवात कोरीव काम आणि कमानी कमालीची देदीप्यमान असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या परिसरात एक वाचनालय आहे, ज्यामध्ये दुर्मिळ संस्कृत पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत.

मंदिर पाहण्यासाठी एक तासाचा वेळ दिला होता. वेळ संपल्यानंतर देखील अनेक जण छोट्या बसेसमध्ये आलेले नसल्यामुळे टूर मॅनेजर अमोलने सर्वांना शोधून काढले. बहुतेक जण रघुनाथ मंदिर च्या आजूबाजूला असलेल्या भव्य बाजारपेठेत खरीदी मध्ये गुंतलेले आढळून आले.
बायपासला आम्ही आलो तेव्हा तिथे रस्त्यावरच टेबले मांडून जेवण ठेवलेले आढळले. नांदेड जवळील महिपाल पिंपरी चे मूळ रहिवाशी ज्ञानोबा जोगदंड ज्यांनी जम्मूला लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून जम बसविला होता ते दरवर्षी भोजनाची व्यवस्था करतात. पण ते लुधियानाला आजारी भाच्याला दाखवण्यासाठी गेलेले असल्यामुळे त्यांनी मुद्दामहून आम्ही आल्याचे कळाल्यानंतर आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती.त्यांचे मित्र पवनजी आणि अनुराधादीदी यांनी जेवणात स्वादिष्ट कश्मीरी पदार्थ आणले होते. आमचे जेवण संपले आणि पाऊस सुरू झाला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही जम्मू सोडले.

जम्मू ते अमृतसर २१२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी आम्हाला साडेचार तास लागले. या बस प्रवासात मला एक नवीन गेम सुचला. गेले दहा दिवस आम्ही सर्वजण एकत्र मिळून मिसळून राहत होतो. त्यामध्ये सर्वात जास्त सहप्रवाशांची नावे सांगेल त्याला पाचशे रुपयांचे बक्षीस मी जाहीर केले. नियम असा होता की, जो सुरुवातीला स्पर्धेत भाग घेईल त्याने प्रत्येकाच्या समोर जाऊन एकेकाचे नाव सांगायचे. नाव आणि आडनाव सांगितले तर १ गुण. जर फक्त नाव किंवा आडनावच घेतले तर मात्र अर्धा गुण. एकूण अचूक घेतलेल्या नावाची बेरीज करून त्याचा स्कोर जाहीर करायचा. दुसऱ्या क्रमांकावर स्पर्धेत उतरलेल्याला थोडी जास्त माहिती समजल्यामुळे त्याच्या स्कोर मधून एक गुण कमी करायचा. तिसऱ्या स्पर्धेकाच्या स्कोर मधून २ गुण कमी करायचे. म्हणजे तुम्ही जितक्या उशिरा स्पर्धेत भाग घ्याल तितके गुण तुमचे कमी होणार. त्यामुळे जो धाडस करेल त्याचा फायदा होतो. काहींना तर आपल्या शेजारी बसलेल्यांची पूर्ण नाव घेता आली असल्यामुळे या गेम मध्ये भरपूर मजा आली. एका बस मधून रूपाली कवानकर ह्या विजयी ठरल्या. तर दुसऱ्या बस मध्ये अतिशय अतितटीच्या लढतीत स्वाती दरक या परभणीच्या महिलेने ५०० रुपयाचे बक्षीस मिळविले. यामध्ये अमृतसर कधी आले ते कळाले सुद्धा नाही.

अमृतसर मध्ये आमचा दोन दिवस मुक्काम गोल्डन अवेन्यू परिसरातील हॉटेल सॅलो रॉयल सुट मध्ये होता. तेथील व्यवस्था पाहून सर्वजण खुश झाले. आमच्या सोबत असलेली टिक टॉक स्टार पुण्याची सृष्टी जैस्वाल ने कबुली दिली की, ” या टूरचे १३ दिवसाचे दर इतके कमी असल्याचे पाहून व्यवस्था चांगली होणार नाही असे गृहीत धरून तिने सुरुवातीला आई वडिलांसोबत यायला नकार दिला होता. पण दिलीप अंकलने माझे सर्व अंदाज चुकीचे ठरवले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन ” तिच्या म्हणण्याला सर्वांनी दाद दिली. दोघांमध्ये एक रूम देण्यात आल्यामुळे सर्वजण नऊ वाजता तयार झाले. पाचव्या मजल्यावर लिफ्ट ने जाऊन नांदेड येथील माझे जवळचे मित्र तथा प्रतिष्ठित व्यापारी नागेश शेट्टी यांच्या तर्फे दरवर्षीप्रमाणे दिलेले भोजन घेऊन आपापल्या रूम मध्ये विश्रांती घेतली.
(क्रमश 🙂

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.